कुस्तीपटू सोनम मलिकची नजर आता ऑलिंपिक पदकावर

सोनम मलिक. तब्बल दोन वेळा ऑलिंपिक पदकविजेत्या खेळाडूला मात देण्याची कामगिरी सोनमच्या नावावर आहे. त्यामुळेच सोनम मलिकला कुस्तीतील 'जायंट किलर' असं संबोधलं जातं.
देशभरात आपलं नाव गाजवल्यानंतर आता सोनमची नजर टोकियो ऑलिंपिक पदकावर असणार आहे.
सोनम मलिकने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये सहभाग नोंदवलेला नाही. पण ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या साक्षी मलिक हिला एक नव्हे तर सलग दोन वेळा हरवण्याची किमया तिने करून दाखवलेली आहे.
हरियाणाच्या सोनम मलिकचं लहानपण मोठ-मोठ्या खेळाडूंच्या सहवासातच गेलेलं आहे.
तिचा जन्म हरयाणाच्या सोनिपत जिल्ह्यात मदिना गावात 15 एप्रिल 2002 रोजी झाला. या भागात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू वास्तव्याला आहेत.
त्यामुळे या खेळाडूंसोबत क्रीडाविषयक चर्चा, सराव, त्यांच्याकडून खेळाचे धडे घेणं या गोष्टी तिने लहानपणापासूनच अनुभवल्या.
या खेळाडूंच्या सहवासातच तिला ऑलिंपिक पदक जिंकण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे यासाठी ती सातत्याने प्रयत्न करताना दिसते.
स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल
सोनमचे वडील आणि तिची चुलत भावंडं कुस्तीपटू आहेत. त्यांना पाहतच ती या खेळाकडे आकर्षित झाली.
सोनमच्या वडिलांच्या मित्राने गावातच एक कुस्ती प्रशिक्षण केंद्र उघडलं होतं. इथं जाऊन कुस्तीचे धडे घेण्यास सोनमने सुरुवात केली.
सुरुवातीला या प्रशिक्षण केंद्रात कुस्तीसाठी आवश्यक असणारं मॅट उपलब्ध नव्हतं. त्यामुळे सर्वांना जमिनीवरच सराव करावा लागत असे.
पावसाळ्यात या मैदानात सगळा चिखल व्हायचा. पण सराव सुटू नये यासाठी इथले खेळाडू रस्त्यावर येऊन कुस्ती खेळायचे.

अशा प्रकारे सुरुवातीच्या काळातच सोनमला कठोर प्राथमिक प्रशिक्षण मिळालं. या काळात सोनमच्या कुटुंबीयांनीही तिच्या खेळाला पाठिंबा दिला.
2016 मध्ये झालेल्या नॅशनल गेम्समध्ये सोनमने सुवर्णपदक पटकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या पदकाने तिच्या आत्मविश्वासात भर पडली.
या स्पर्धेदरम्यान तिने आपल्या आणि इतरांच्या खेळाचं सूक्ष्म निरीक्षणही केलं. या काळात आपल्याकडून घडलेल्या चुकांवर तिने काम केलं. तसंच सुयोग्य सरावाने आपल्या खेळात सुधारणा होऊ शकते, ही बाबही सोनमच्या लक्षात आली.
2017 मध्ये तिने पुन्हा जागतिक कॅडेट चँपियनशीप स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरून आपल्यातील क्षमता सिद्ध केली. या स्पर्धेतील तिच्या कामगिरीबद्दल तिला आऊटस्टँडींग परफॉर्मन्स अवार्डनेही गौरवण्यात आलं.
या विजयाने तिच्या भविष्याची वाट सुकर केली. या स्पर्धेनंतर तिला स्पॉन्सरशीप मिळाले शिवाय ऑलिंपिक चाचणी स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधीही तिला मिळाली.
हरयाणातील आघाडीच्या कुस्तीपटूंमध्ये सोनमचं नाव घेतलं जाऊ लागलं.
दुखापतींवर मात
2017 मध्ये सोनमची कुस्तीतील कामगिरी उंचावत असतानाच दुखापतीने तिच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण केला होता.
अथेन्स वर्ल्ड कॅडेट चँपियनशीपमध्ये अंतिम लढतीत तिला ही दुखापत झाली होती. दुखापतीमुळे तिच्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
त्यामुळे तिचं करिअर संपतं की काय, असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. मात्र सोनमने मोठ्या धीरोदात्तपणे आपल्या दुखापतीवर मात केली.

फोटो स्रोत, SAT SINGH/BBC
या काळात ती तब्बल दीड वर्ष मैदानापासून लांब होती. पण तिने संयम ढासळू दिला नाही. उलट, कठीण परिस्थितीशी लढण्याचं धाडस तिने आपल्यात निर्माण केलं.
दुखापतींवर मात करून तिने पुन्हा खेळांमध्ये सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली.
2020 मध्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात झालेल्या 62 किलो वजनी गटातील एका स्पर्धेत तिने यशस्वी पुनरागमन केलं.
या स्पर्धेत सोनमने रिओ ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावणाऱ्या साक्षी मलिक हिला दोनवेळा पराभूत केलं.
या विजयामुळे सोनम मलिक टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या चाचणी फेरीसाठी पात्र ठरली आहे.
आता या स्पर्धेत विजय मिळवून ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा विश्वास सोनमला आहे. केवळ स्पर्धेसाठी पात्र होऊन आपण थांबणार नसून पदक मिळवल्याखेरीज आपण परतणार नसल्याचं सोनमला वाटतं.
क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी सोनमला तिच्या वडिलांचा तसंच इतर कुटुंबीयांचा संपूर्ण पाठिंबा लाभला. तिच्या मते, मुलींनी खेळांमध्ये यश मिळवायचं असेल तर कुटुंबाचा पाठिंबा असणं महत्त्वाचं असतं. प्रत्येकाने मुलींना क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं ती म्हणते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








