BDSM सेक्स म्हणजे काय? वेदना आणि सेक्सचं काय नातं आहे?

फोटो स्रोत, Getty Images
एखाद्या व्यक्तीच्या हातांना बांधणं, त्यावर पूर्ण नियंत्रण मिळवून तिच्याशी जे हवं ते करणं, थपडा लगावणं, कधी चाबूक किंवा चामडी पट्ट्यानं मारणं, प्लॅस्टिक पिशवीनं तोंड दाबून श्वास न घेऊ देणं हे सगळं ऐकायला विचित्र वाटत असलं तरी काही लोकांना यातून कामोत्तेजना मिळत असते.
नागपूरमध्ये सेक्स करताना काहीतरी विचित्र प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात घडल्याचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर या परपिडेतून आनंद मिळवण्याच्या किंवा वेदना सहन करून कामसुख मिळवण्याच्या प्रकारावर चर्चा सुरू झाली.
नागपूरची घटना हे एक निमित्त झालं, पण कोणत्याही प्रकारे मनातील शंकांना, प्रश्नांना आपण अर्धवट सोडता कामा नये.
वैयक्तिक आयुष्यात कोणताही प्रश्न, सेक्समधील त्रास-अडचण, मनात येणाऱ्या विचित्र कल्पना यांच्याबाबतीत तज्ज्ञांची, डॉक्टरांची, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे.
आपल्यामुळे जोडीदाराला त्रास होत असेल किंवा जोडीदाराचा त्रास होत असेल तरीही वेळीच मदत मागितली पाहिजे. चुकीच्या माहितीच्या आधारे गोंधळ वाढून प्रश्न आणखीच गंभीर होण्याची शक्यता असते.
BDSM म्हणजे काय?
पाश्चात्य समाजात बीडीएसएम या कल्पनेचा उच्चार आता रुळला असला तरी अनेक देशांमध्ये हे नाव कमी प्रमाणात ऐकायला मिळतं. बीडीएसएमचे पूर्ण रुप 'बाँडेज, डिसिप्लिन, डॉमिनन्स, सबमिशन, मॅसोकिजम' असं आहे.
वेदना देऊन किंवा वेदना सहन करून कामोत्तेजना मिळत असते. याचा समावेश बीडीएसएम या सेक्सप्रकारात किंवा सेक्सपद्धतीत होतो.

फोटो स्रोत, Getty Images
यामध्ये वेदना देणाऱ्या बळजबरी करणाऱ्या व्यक्तीला डॉमिनंट आणि ते सहन करणाऱ्या व्यक्तीला सबमिसिव्ह असं म्हटलं जातं.
बळजबरी करणाऱ्या आणि ती सहन करणाऱ्या व्यक्तीलाही या प्रक्रियेतून आनंद मिळत असतो. एखाद्या व्यक्तीचे गुलाम असल्यासारखे वागणे किंवा एखाद्या व्यक्तीला गुलामासारखे वागवणे यांचाही यात समावेश होतो.
'झाडूने मार तरंच सेक्स करेन'
भारतामध्ये कोणत्याच प्रकारे आणि कोणत्याही प्रकारच्या सेक्सबद्दल खुलेपणाने चर्चा होत नाही. यामुळे लोकांना सेक्सबद्दल अत्यंत अपुरी माहिती असते आणि गैरसमजही असतात.
यामुळेच सेक्सबद्दलच्या अनेक शंका, प्रश्न मासिकांमध्ये विचारले जातात आणि सेक्सॉलॉजिस्ट त्याला उत्तर देतात. महेंद्र वत्स तज्ज्ञांपैकी एक होते. नुकतंच त्यांचं निधन झालं.
महेंद्र वत्स यांनी बीडीएसएमबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबद्दल बीबीसीला माहिती दिली होती. ते जवळपास 35 वर्षं अशा प्रश्नांची उत्तर देत होते.

फोटो स्रोत, Getty Images
बीडीएसएमबद्दल बीबीसीशी बोलताना ते एकदा म्हणाले होते, एका व्यक्तीने त्यांना प्रश्न पाठवला होता. "जोपर्यंत माझी पत्नी मला झाडूने मारत नाही तोपर्यंत माझ्यामध्ये कामोत्तेजना निर्माण होत नाही. पण नुकतेच माझ्या पत्नीचे निधन झाले. आता मला झाडूने मारून माझ्यामधील कामभावना जागृत करेल अशी पत्नी मी कोठे शोधू?" असा तो प्रश्न होता.
डॉक्टर वत्स यांनी तेव्हा सांगितलं होतं, "यात चुकीचं काहीच नव्हतं. लोक यावर खुलेपणाने बोलत नसायचे हे चूक होतं. आता भारतातले लोक हळूहळू सेक्ससंदर्भातील इच्छा बोलून दाखवत आहेत. विशेषतः शहरी भागात हे प्रमाण दिसून येतं."
फिफ्टी शेडस् ऑफ ग्रे
एक कॉलेज विद्यार्थीनी आणि उद्योगपती यांच्यातील विचित्र सेक्स संबंधांवर 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' कादंबरी 2012 साली प्रसिद्ध झाली होती. ही कादंबरी अचानक वेगाने लोकप्रिय झाली आणि कोट्यवधी लोकांनी ती वाचली.
ही कादंबरी लाखो भारतीयांनीही वाचली आहे. त्यावर 2015 साली सिनेमा प्रसिद्ध झाला.

फोटो स्रोत, Getty Images
या सिनेमाच्यावेळेस भारतासह अनेक देशांमध्ये सेक्स टॉय किंवा तत्सम वस्तूंच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं होतं.
हा सिनेमा भारतात प्रकाशित होण्यापूर्वी सेक्स संदर्भातील वस्तू विकणाऱ्या एका वेबसाइटने 2015 साली फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे नावाने एक किट बाजारात आणले होते. त्यात हातकडी, चाबूक, पट्टा, डोळ्यांवर बांधायची पट्टी अशा वस्तू होत्या. हे किट लाँच झाल्यावर काही दिवसांमध्येच त्याच्या मागणीत प्रत्येक आठवड्याला 80 टक्के वाढ झाल्याचं त्या वेबसाईटचे समीर सरैया यांनी बीबीसीला सांगितलं होतं.
2015 साली बीबीसीशी बोलताना ते म्हणाले होते, "या चित्रपटाच्या चर्चेमुळे या नावाच्या उत्पादनाला फायदा झाला. वेबसाईटवर येणारे लोक साधारणतः सरासरी 4600 रुपये देऊन वस्तू, किट विकत घेत होते."
2015 च्या फेब्रुवारी महिन्यात अशाच एका वेबसाईटचे सीइओ राज अरमानी बीबीसीशी बोलले होते. ते म्हणाले होते यासिनेमा संदर्भातील उत्पादनांची मागणी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात 122 टक्क्यांनी वाढली होती.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "आपल्या कामभावनांशी संबंधित प्रयोगांना संधी मिळेल, ते प्रत्यक्षात आणता येतील असं युग भारतीय समाजात सुरू झालं आहे. त्यातही तरुण आणि ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आहे अशा लोकांना या वस्तूंवर खर्च करायला काहीच वाटत नाही."
सावध ऐका 'पुढल्या' हाका
या अनुभवावंरून भारतीय समाजातील बदल हळूहळू होताना दिसून येतात.
भारतातील सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. नारायण रेड्डी यांच्याकडेही अशा प्रकारचे रुग्ण उपचाराला आल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं होतं.
आपल्याकडे आलेले रुग्ण 30 ते 50 या वयोगटातले आणि ते मध्यमवर्ग किंवा उच्च वर्गातले होते असं त्यांनी सांगितलं होतं.
त्यांच्याकडे जे लोक आले होते ते बहुतांश आपल्या जोडीदाराच्या हिंसेची तक्रार घेऊन आले होते. सिगारेटने चटके देणे, चावणे, सुई टोचणे, साखळदंडाने बांधणे, कुत्र्याचा पट्टा गळ्यात घालून फिरवणे, हीन वागणूक देणे.
म्हणजेच जोडीमध्ये एकाला याची आवड होती आणि दुसऱ्या व्यक्तीला ते आवडत नव्हतं म्हणून ते मदत मागायला आले होते.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. रेड्डी सांगतात, "कोणत्याही नात्यात कामोत्तेजना फक्त वेदना आणि जखमा करून मिळत असतील तर त्याला सेक्शुअली प्रॉब्लमॅटिक बिहेवियर म्हणता येईल. कारण दीर्घकाळाचा विचार करता ही समस्या त्रासदायक ठरू शकते.
यातलं नवेपण रोमांचित करू शकेल, पण काही काळाने शारीरिक वेदना सुरू होऊ शकतात आणि मनावरही आघात होऊ शकतो."
हिंसेचं 'सामान्यीकरण'
स्टेव्हन पोप हे सेक्स आणि रिलेशनशीप विषयात स्पेशलायझेशन केलेले सायकोथेरपिस्ट आहेत.
बीबीसी रेडियोच्या 5 Live कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की अशा कृत्यांचा नकारात्मक परिणाम झालेली अनेक प्रकरणं त्यांच्याकडे जवळपास रोजच येतात.
ते पुढे म्हणतात, "ही एकप्रकारची सायलंट साथ आहे. लोक हे करतात कारण त्यांना वाटतं हे असंच करायचं असतं. मात्र, हे खूप घातक ठरू शकतं. अशा प्रकारांमुळे नातेसंबंधाचं अवमूल्यन होत आहे. मात्र, त्याहूनही वाईट म्हणजे हिंसेला मान्यता मिळत आहे."

फोटो स्रोत, Getty Images
अशा प्रकारची कृत्यं करणाऱ्यांना त्याच्या संभाव्य धोक्याची कल्पना नाही, असंही ते सांगतात.
ते म्हणतात, "लोक माझ्याकडे अगदी शेवटच्या क्षणी येतात. म्हणजे गळा आवळण्याची कृती धोक्याच्या पातळीच्याही पुढे गेल्यावर आणि बराच वेळ बेशुद्ध राहिल्यानंतर लोक माझ्याकडे येतात."
"गळा आवळणे या प्रकारात हाय-रिस्क असते. मात्र, लोक त्याचा अगदी शेवटी विचार करतात."
ही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








