'मृत जनावरांचे डोळे माझ्याकडे रोखून पाहताहेत असं वाटायचं'

कत्तलखान्यात काम करणाऱ्या महिलेची गोष्ट

कत्तलखान्यात काम करणाऱ्या लोकांबद्दल इतरांना फारसं माहिती नसतं. आपण जे मटण खातो ते याच कत्तलखान्यातून येत असतं. तरीही तिथं काम करणाऱ्या लोकांविषय़ी आपल्याला फारसं माहिती नसतं.

कत्तलखान्यात काम करणाऱ्या एका महिलेने तिच्या कामाची आणि त्या कामाचा मनावर होणाऱ्य़ा परिणामाची माहिती बीबीसीला दिली.

सूचनाः या अनुभवांमुळे काही वाचकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.

लहान होते तेव्हा आपण जनावरांचे डॉक्टर व्हावं असं मला वाटायचं. मी कुत्र्याच्या पिलांबरोबर खेळतेय, मांजराच्या घाबरलेल्या पिलाला मी शांत करतेय, जवळच्या शेतांमध्ये जाऊन आजारी गुरांना तपासतेय अशा कल्पना सतत मनात यायच्या.

पण हे स्वप्नातच राहिलं. प्रत्यक्ष आयुष्यात असं काही झालं नाही आणि मला थेट कत्तलखान्यात काम करावं लागलं.

कत्तलखान्यात काम करणाऱ्या महिलेची गोष्ट

कत्तलखान्यात मी 6 वर्षं काम केलं. जनावरांची काळजी घेण्याच्या माझ्या स्वप्नाच्या बरोबर उलट ते काम होतं. दररोज 250 जनावरांचे प्राण गेलेच पाहिजेत हे पाहण्याची जबाबदारी माझी होती. तुम्ही शाकाहारी असा की मांसाहारी बहुतांश लोक कधी कत्तलखान्यात गेलेलच नसावेत.

एक घाणेरडी, किळसवाणी जागा

ती एक घाणेरडी आणि एकदम किळसवाणी जागा असते. आणि तिथली दुर्गंधी.... तुम्ही मेलेल्या जनावरांच्या दुर्गंधीतच असता.

ती जागा एखाद्या वाफेने भरलेल्या खोलीसारखी असते, अशी खोली की ज्यातून वाफ बाहेरच पडत नाही.अशा खोलीत कामच काय कोणाला आत जावंसंही वाटणार नाही.

मी अनेक वर्षं फूड इंडस्ट्रीमध्ये काम केलं होतं म्हणून मी इथं आले.

अन्न शिजवणाऱ्या एका कारखान्यात मी काम केलं होतं. त्यामुळे मला कत्तलखान्यात क्वालिटी कंट्रोल मॅनेजरची नोकरी मिळाली. मला तेव्हा त्यात काहीच तोटा दिसला नाही. तेव्हा मी 40 वर्षांची होते.

नोकरीच्या पहिल्या दिवशी त्यांनी मला सगळी जागा दाखवली आणि तिथं काय काय कामं होतात ते सांगितलं. तेव्हा सतत तुम्हाला बरं वाटतंय का असं ते विचारत होते.

तिथं येणारे लोक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे असं त्यांनी सांगितलं.

कत्तलखान्यात काम करणाऱ्या महिलेची गोष्ट

तिथं सगळं ठीक वाटत होतं. ते काम पाहून थोडंसं घाण वाटलं पण सवय होऊन जाईल असा मी विचार केला.

पण असं काही होणार नसल्याचं मला काही दिवसांतच लक्षात आलं.

'दिवसा पाहिलेल्या घटना आणि रात्री पडणारी वाईट स्वप्नं'

सगळे कत्तलखाने एकसारखेच असतील असं नाही. पण मी जिथं काम करत होते ती जागा एकदम क्रूर आणि भयंकर होती.

जनावरांना बेशुद्ध करण्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही त्यांना मारण्यासाठी मशीनमध्ये ढकलण्याआधी गायींनी कसायांवर अनेकदा हल्ला केला आहे.

मला कधीच दुखापत झाली नाही पण त्या जागेचा माझ्या मनावर परिणाम झाला. त्या बिनखिडकीच्या मोठ्या खोक्यासारख्या कत्तलखान्यात दिवस जाऊ लागले तसं माझ्यावरचं दडपण वाढत गेलं. डोळ्यासमोर अंधःकार येऊ लागला.

दिवसा पाहिलेल्या घटना रात्री वाईट स्वप्नातून दिसू लागल्या.

मृत्यू आणि वेदनांप्रती असंवेदनशील झाल्याची भावना कत्तलखान्यात तुम्हाला येते.

गायीला एका जिवंत प्राण्याऐवजी तुम्ही तिला विकण्यासाठी आणि तिच्या अवयवांना खाण्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने पाहू लागताय

कत्तलखान्यात काम करणाऱ्या महिलेची गोष्ट

यामुळे फक्त काम सोपं होऊन जातं असं नाही तर ते जिवंत राहाण्यासाठी आवश्यक आहे.

'मला रोखून पाहाणारे डोळे'

परंतु या असंवेदनशीलतेला भेदणाऱ्याही काही गोष्टी तिथं होत्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे डोकी.

तिथं एक मोठी जागा होती. तिथं शेकडो गायींची डोकी पडलेली असत. त्यांची कातडी आणि विक्रियोग्य मांस काढलं जात असे आणि फक्त डोळे शिल्लक राहात.

तिथून गेलं की ते डोळे माझ्याकडे रोखून पाहात आहेत असं वाटे. त्यांच्या मृत्यूला मलाही जबाबदार ठरवत आहेत असं वाटे, कारण मी त्या कत्तलखान्याचा भाग होते.

काही डोळे माझ्यासमोर आर्जवं करत असायचे, वेळ मागे सरकवून त्यांना वाचवलं जाईल का असं ते विचारायचे. जेव्हा मी पहिल्यांदा ती मुंडकी पाहिली तेव्हा त्यांनी माझ्या शरीरातली सगळी ताकदच शोषून घेतली. या गोष्टी इतर कर्मचाऱ्यांनाही तितक्याच त्रासदायक वाटत असतात हे मला माहिती आहे.

गर्भार गायीची हत्या

मी तो दिवस विसरू शकत नाही. माझ्या कामाला सुरुवात होऊन काहीच महिने झाले होते. काम करणाऱ्या एका मुलाने नुकत्याच मेलेल्या गायीची आतडी बाहेर काढण्यासाठी पोट फाडलं. जसं ते पोट फाडलं तसं अचानक त्यातून एक भ्रूण खाली पडलं. ती गाय गर्भवती होती.

तो मुलगा किंचाळू लागला. त्याला शांत करण्यासाठी आम्हाला त्याला एका मीटिंग रुममध्ये न्यावं लागलं.

'हे योग्य नाही, हे योग्य नाही' असं तो सारखं ओरडत होता.

आपल्या भावना प्रदर्शित न करणारे अनेक पुरुष तेथे होते. पण मी त्यांच्याही डोळ्यांमध्ये अश्रू पाहिले होते.

तसं पाहायला गेलं तर कत्तलखान्यात भावनांना थारा नाही. तिथं कोणीही आपल्या भावनांबद्दल बोलत नाही. 'आपण कमजोर नाही' हे दाखवणारी भावनाच तेथे जास्त दाखवली जाते.

पूर्व युरोपातून आलेल्या मजुरांना इंग्रजीतून आपल्या मनातल्या गोष्टी सांगता येत नसे. इंग्रजी नीट येत नसल्यामुळे ते मदतीसाठी विनंतीही करू शकत नव्हते.

ठरलेल्या वेळेपेक्षा कामगार जास्त काम करत. काही लोकांना दारुचं व्यसन होतं. अनेक लोकांना एनर्जी ड्रिंकचं व्यसन होतं. एकाला त्यामुळे हृद्यविकाराचा झटकाही आला होता.

कत्तलखान्यात एनर्जी ड्रिंकचं व्हेंडिंग मशीन असे. काही लोक घरातून एनर्जी ड्रिंक घेऊन येत आणि गाडीतच पिऊन टाकत असत.

कत्तलखान्यात काम करणाऱ्या महिलेची गोष्ट

कत्तलखान्यात काम करणाऱ्यांच्या मानसिक समस्याही असतात. या कामाच्याताणावाला काही संशोधक पीटीएसडी म्हणतात.

माझंच सांगायचं झालं तर मला नैराश्य आलं होतं. फारवेळ काम करणं आणि मृत्यू सर्वत्र पाहून ते आलं होतं.

एकावेळेस तर आत्महत्येचे विचार मनात येत होते.

हे कत्तलखान्यामुळेच होत होतं असं सांगता येणार नाही पण ही नोकरी एकटेपण निर्माण करणारी आहे हे मात्र नक्की.

मी लोकांना या कामाबद्दल सांगायचे तेव्हा काही लोक पूर्णपणे विरोध करायचे तर काही लोकांनी कुतुहलापोटी त्याची माहिती घेतली.

पण मी फारशी लोकांशी बोलूच शकले नाही. त्या कामाचा कसा ताण येतो हे सांगताच येत नसे. एका सहकाऱ्याशी बोललल्यावर मलाही मदतीची गरज असल्याचं मला जाणवलं.

किळसवाण्या गोष्टी पाहिल्यामुळे माझी विचार करण्याची क्षमता संपली आहे. विचित्र विचार येतात आणि नैराश्य वाढलं आहे हे मला जाणवलं.

कत्तलखान्याची नोकरी सोडल्यानंतर चांगल्या गोष्टी आयुष्यात घडू लागल्या.

मी ते काम सोडलं आणि मानसिक आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांबरोबर काम सुरू केलं.

लोकांच्या भावना जाणून घेऊन नैराश्यावर व्यावसायिक मदत घेणं उपयोगी आहे हे पटवून देऊ लागले.

नोकरी सोडल्यावर कत्तलखान्यातल्या एका सहकाऱ्याने मला फोन केला की तिथं कातडी उतरवण्याचं काम करणाऱ्या एका सहकाऱ्यानं आत्महत्या केली.

आजही ते लोक माझ्या डोळ्यासमोर आहे. ते न थकता अनेक तास काम करत. एखाद्या महासागरातून बाहेर पडण्याची धडपड करताहेत असं वाटणारे... जे त्यातून वाचू शकले नाहीत ते लोक आजही माझ्या स्मरणात आहेत.

रात्री झोपण्यासाठी डोळे बंद करते तेव्हा हजारो डोळ्यांचा समूह मला रोखून पाहात आहेत असं दिसतं.

(या चर्चेचं शब्दांकन एशिथा नागेश यांनी केलं आहे आणि केटी होरविच यांनी चित्र काढली आहेत.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)