#FarmersProtest : शेतकरी आंदोलनाबाबत पसरवण्यात येत आहेत हे दिशाभूल करणारे फोटो

फोटो स्रोत, Getty Images
- Author, श्रुती मेनन
- Role, बीबीसी रिअॅलिटी चेक
"केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत. हे कायदे सरकारने तात्काळ रद्द करावेत," या मागणीसाठी पंजाब-हरियाणातील शेतकरी गेले आठ दिवस राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून आहेत.
मोदी सरकारविरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. केंद्रासोबत तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. पण शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चा निष्फळ ठरतेय.
दुसरीकडे, शेतकरी आंदोलनाबद्दल सर्वच राजकीय पक्षांकडून दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली जात आहे. शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणारे आणि या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांकडूनही चुकीची माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली जात आहे.
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. मात्र, तरीही फेसबुकवर अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा बनावट फोटो व्हायरल होत आहे.

फोटो स्रोत, Social Media
या ट्वीटमध्ये म्हणण्यात आलंय, "शेतकरी आंदोलनाला दडपण्याचा भारत सरकार प्रयत्न करतंय. हे पाहून धक्का बसला. शेतकरी कृषी कायद्यांविरोधात लढत आहेत. अश्रुधुर आणि पाण्याचा मारा करण्यापेक्षा भारत सरकारने शेतकऱ्यांची चर्चा केली पाहिजे."
पण फेसबुकने या पोस्टवर 'फेरफार' करण्यात आल्याचा इशारा दिला आहे.
कमला हॅरिस यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर त्यांच्या खासगी किंवा सरकारी ट्विटवर (सोशल मीडिया) अकाउंटवरून काहीही वक्तव्य केलेलं नाही.
आम्ही विचारलेल्या प्रश्नाला कमला हॅरिस यांच्या टीममकडून फक्त "होय, हे बनावट आहे," असं उत्तर आलं.
कॅनडातील खासदार जॅक हॅरिस यांनी 27 नोव्हेंबरला भारतातील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं. यांचा कमला हॅरिस यांच्याशी काहीही संबंध नाही. जॅक हॅरिस यांनी आपल्या ट्विटमध्ये केलेलं वक्तव्य, खोटेपणाने कमला हॅरिस यांच्या नावाने वापरण्यात आलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काही दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रु़डो यांनी शेतकऱ्यांविरोधात केल्या जाणाऱ्या पोलीस कारवाईबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. भारत सरकराने जस्टिन ट्रुडो यांचं वक्तव्य "कमी माहितीच्या आधारे" असल्याचं म्हणत यावर नाराजी व्यक्त केली होती.
जुन्या फोटोचा वापर
एका ट्विटर पोस्टमध्ये शीख बांधव अनुच्छेद 370 आणि 35A बद्दलचं एक पोस्टर हातात घेऊन आंदोलन करताना दाखवण्यात आले आहेत. हा फोटो सद्यस्थितीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील असल्याचा दाखला दिला जातोय.
या ट्विटला 3000 रिट्विट आणि 11 हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

फोटो स्रोत, Social Media
हा फोटो भाजप महिला आघाडी सोशल मीडिया सेलच्या प्रमुख प्रिती गांधी यांनी रिट्विट केला.
या फोटोवर अनेक लोकांनी कॉमेंट केली. शेतकरी आंदोलनाचा फायदा इतर गोष्टींसाठी घेतला जात असल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे. उदाहरणार्थ : काश्मीरचा मुद्दा आणि पंजाबमध्ये शीखांना स्वातंत्र्य मिळण्याची मागणी.
आम्ही चौकशी केली तर कळलं की, ही पोस्ट 2019 च्या ऑगस्ट महिन्यात शिरोमणी अकाली दलाच्या फेसबुकवर होती.
जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 आणि 35A रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा शिरोमणी अकाली दलाने विरोध केला होता. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट की, हा फोटो कृषी कायद्यांच्या मुद्यावरून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही.
फक्त भाजपचे नेते दिशाभूल करणाऱ्या पोस्ट करत नाहीत.
यूथ कॉंग्रेस आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या ट्विटर अकाउंटवरून जुने फोटो शेअर करण्यात आले आहेत. 2018 मधील या फोटोमध्ये पोलीस आंदोलनकर्त्यांवर पाणी आणि अश्रुधुराचा मारा करत असल्याचं दिसून येत आहे. हे फोटो सद्य स्थिती सुरू असलेल्या आंदोलाचे असल्याचं वर्णन करण्यात आलंय.

एका पोस्टमध्ये सरकार शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखं वागवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला. अश्रुधुराचा वापर करण्यात आला. पण सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले फोटो शेतकऱ्यांच्या आंदोलनातील नाहीत. हे फोटो दोन वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनातील असल्याचं स्पष्ट झालं.
सोशल मीडियावर पोस्ट केले जाणारे हे फोटो उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचे आहेत. कर्जमाफी आणि इतर मुद्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन केलं होतं.
उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर रोखण्यात आलं होतं. सद्यस्थितीत पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या उत्तरेला सीमेवर आंदोलन करत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








