You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पदवीधर निवडणूक निकाल: महाविकास आघाडीच्या मुसंडीचा अर्थ काय?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील 5 जागांवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे.
मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे, तर पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे.
नागपूर पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. तर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर आहेत.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांनी पहिल्यांदाच एकत्र येत ही निवडणूक लढवली. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली. आता महाविकास आघाडीची बहुतेक जागांवर सरशी होताना दिसत असल्यामुळे या विजयाचा अर्थ काय, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
'एकत्र येऊन लढल्यास भाजपचा सामना करणं शक्य'
महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवली तर भाजपला टक्कर देणं शक्य आहे, हा या निकालाचा अर्थ आहे. कारण, हे तीन पक्षांचं सरकार पायात पाय घालून पडणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते. त्यांचा हा युक्तिवाद आता निकाली निघाला आहे, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई व्यक्त करतात.
"दुसरं म्हणजे पदवीधर मतदार म्हणजे ज्यांना डोकं आहे, ते मतदार आपल्या हक्काचे आहेत असा भाजपचा समज होता. तोसुद्धा या निकालामुळे मोडित निघाला आहे. महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृत राजकारण करत आहे, असंही मतदारांना वाटल्याचं या निकालातून दिसून येत आहे. यामुळे येणारी मुंबई महापालिकेची निवडणूकही हे तिन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे," असंही देसाई पुढे सांगतात.
'गांभीर्यानं लढल्यास विजय शक्य'
भाजप ज्या गांभीर्यानं ही निवडणूक लढत होता, त्याच गांभीर्यांना महाविकास आघाडीनं ही निवडणूक लढवली. राजकीय नेते, मंत्र्यांचे दौरे काढण्यात आले आणि त्यात त्यांना यश आलं, असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे व्यक्त करतात.
सकाळच्या पुणे आवृत्तीचे संपादक स्रमाट फडणीस यांच्या मते, "या निवडणुकीमुळे पदवीधर मतदारांचा भाजप विरोधात असलेला असंतोष दिसून आला आहे. भाजप महाविकास आघाडी सरकार पडेल या अपेक्षेनं वर्षभरापासून काम करत आलं आहे, विरोधी पक्ष म्हणून काम करताना दिसत नाही, त्याचाच प्रत्यय या निकालातून दिसून आला आहे."
आता मतदारसंघनिहाय कोणते फॅक्टर उमेदवारांच्या विजयास कारणीभूत ठरले ते पाहूयात.
नागपूर पदवीधर मतदारसंघ
नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. हा मतदारसंघ तयार झाल्यापासून इतर कोणत्याही पक्षाचा उमेदवार याठिकाणी निवडून आला नाही. गेल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ या मतदारसंघातून भाजपचेच उमेदवार निवडहून जायचे.
यावेळी नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली. अॅड. अभिजीत वंजारी यांच्यासमोर संदीप जोशी यांचा टिकाव लागू शकला नाही.
यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रित येत भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे.
"नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अॅड. अभिजीत वंजारी यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली होती. पण प्रतिस्पर्धी उमेदवार संदीप जोशी यांना केवळ पंधरा दिवसांपूर्वी ऐनवेळी तिकीट देण्यात आलं. हे अॅड. वंजारी यांच्या पथ्यावर पडलं," असं मत ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर हे नोंदवतात.
जानभोर सांगतात, "पूर्वी काँग्रेस या निवडणुकीकडे फारसं लक्ष द्यायची नाही. आपला उमेदवार विजयी होत नाही म्हणून त्यांनी अपेक्षा सोडलेली होती. एकदा तर गडकरी या मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले होते. मात्र, यंदाची निवडणूक काँग्रेसने गंभीरपणे घेतल्याचं दिसून आलं. वंजारी हे मतदारसंघात गेली तीन-चार वर्षे कार्यरत होते. भाजपने पारंपारिक पद्धतीने विजय गृहीत धरून निवडणूक लढवली. मात्र काँग्रेस यंदा विधानसभा स्टाईलने मैदानात उतरली होती. एरवी पक्षात दिसणारे गट-तट यंदा दिसले नाहीत. शिवाय, विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणाचा लाभ काँग्रेसला मिळाला. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांच्या ताकदीच्या बळावर विजय मिळवण्यात काँग्रेसला यश आलं,"
पुणे
पुण्यातील निकालाविषयी सम्राट फडणीस सांगतात, "यावेळेस पुण्याव्यतिरिक्त सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतून पदवीधर मतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली. सतेज पाटील यांनी कोल्हापूर आणि सांगली भागात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांचं काम केलं.
"या निवडणुकीत महाविकास आघाडीतल्या पक्षांनी एकत्र काम केलं, एकमेकांच्या पायात पाय घातले नाही. खरं तर ही निवडणूक एकत्र लढून दाखवायची संधी या तिन्ही पक्षांकडे होती. ती या पक्षांनी अजमावून पाहिली आणि त्यात यश आलं."
अमरावती
अमरावती शिक्षक मतदारसंघातील निकाल सगळ्यांसाठीच धक्कादायक असल्याचं सांगितलं जात आहे.
या निकालाविषयी अमरावतीतील ज्येष्ठ पत्रकार मोहन अटाळकर सांगतात, "अमरावती शिक्षक मतदारसंघातील निकाल सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. इथं भाजपचा उमेदवार शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना टक्कर देईल असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी थेट शिक्षक मतदारांसोबत संपर्क ठेवला. विनाअनुदानित शाळांचा प्रश्न गंभीर बनला असताना शिक्षकांपर्यंत ते पोहोचले. याचा त्यांना फायदा झाला."
औरंगाबाद
औरंगाबादमध्ये सतीश चव्हाण यांचं व्यक्तिगत नेटवर्क जबदरस्त आहे. त्यांनी पुन्हा एकदा तिथं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे, असं विजय चोरमारे सांगतात.,
धुळे-नंदुरबार भाजपकडे
दरम्यान, धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला. अमरिश पटेल यांना 332 तर उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)