You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाळ जिवंत नव्हतं, गर्भाशय फाटलं होतं; पण तिचा नवरा आणि नणंद थंडच होते...
- Author, डॉ. शैलजा चंदू
- Role, बीबीसीसाठी
गुरुवारचा दिवस होता, सकाळचे 10 वाजले होते.
तिचं नाव - अमीना. पेशाने विज्ञान शिक्षिका.
हे तिचं तिसरं बाळंतपण. तिची सात वर्षांची मुलगी आईची बॅग हातात धरून शेजारी उभी होती. तिच्या आईला तपासण्यासाठी मी जागेवरून उठले आणि नंतर पुन्हा माझ्या जागी जाऊन बसले. दोन्ही वेळी तिने बॅग हाताने घट्ट कवटाळून माझ्यापासून दूर नेली. तिच्या चेहऱ्यावर संशय होता.
"तुला एक-दोन दिवसांत ॲडमिट व्हावं लागेल. कळा सुरू होण्यासाठी आपण तुला औषध देऊ."
अमीना माझ्या बाजूलाच बसली होती. तिचं ब्लडप्रेशर तपासताना तिच्या हातावर आणि गालावर काळे वळ असल्याचं माझ्या लक्षात आलं.
मी नर्सला त्या लहान मुलीला बाहेर न्यायला सांगितलं.
"अमीना, मला तुला काही खासगी प्रश्न विचारायचे आहेत. तुला अवघडल्यासारखं होईल कदाचित, पण मला हे विचारायलाच हवं. घरी सगळं ठीक आहे ना? तू आनंदात आहेस का?"
काही न बोलता तिने फक्त मान डोलवली.
"तू प्रेग्नंट आहेस. तुला कोणी शारीरिक त्रास देतंय का? तुला घरी सुरक्षित वाटतं ना?"
"अय्यो! का नाही मॅडम! सगळं ठीक आहे. ते खूप चांगले आहेत. आणि या खुणा...माझ्या लेकीने अचानक खिडकी उघडली आणि ती मला लागली."
पण खिडकी लागल्याने होणाऱ्या जखमांसारख्या त्या खुणा दिसत नव्हत्या.
"तुला एकच सांगायचंय, अमीना....प्रत्येकाला सुरक्षितपणे रहायचा हक्क आहे. कोणाकडूनही होणारी मारहाण सोसण्याची गरज नाही. तुला तक्रार करायची असेल, तर आम्ही तुला मदत करू."
"प्रेग्नंट बाईसोबत कौटुंबिक हिंसाचार झाला, तर त्याचा परिणाम फक्त आईवरच नाही तर तिच्या पोटातल्या बाळावरही होतो."
"इतर सगळ्या घरांसारखं आहे की आमच्याकडे... मी उलट उत्तर दिलेलं त्यांना आवडत नाही. माझा राग आला त्यांना. मी माघार घ्यायला हवी होती. चूक माझीच आहे."
तिची चूक होती! आपल्या जखमा कशा योग्य आहेत, हे ती मला सांगत होती.
"अमीना, असं बोलू नकोस. हात उगारणं चुकीचं नाही का? हे पहिल्यांदा घडलंय, असं मला वाटत नाही. विचार कर. मी तुला मदत करीन. किंवा हेल्पलाईनवरून मदत घे."
"तसं काहीही नाही, डॉक्टर!" तिने मान खाली घातली.
"तुला तक्रार करायची नसेल, तर ठीक आहे. पण तू सुरक्षित ठिकाणी असायला हवंस. सगळ्यांत आधी तू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट हो."
"मी उद्या सकाळी येऊन ॲडमिट होते मॅडम. मी आता कपडे वगैरे सोबत आणलेले नाहीत."
"तुला खरंच घरी सुरक्षित वाटतंय का अमीना, विचार कर पुन्हा."
"मॅडम, तुम्ही जास्त विचार करताय. तसं काहीही नाही."
"ठीक आहे, जर तुला काही प्रॉब्लेम असेल, तर मदतीसाठी आम्ही आहोत. नक्की फोन कर. उद्या ये आणि ॲडमिट हो. मी तुला कळा सुरू होण्यासाठी औषध देईन."
शुक्रवार. सकाळी 10 वाजता.
"मॅडम, अमीना आलीय."
"हो, मीच तिला ॲडमिट होण्यासाठी यायला सांगितलं होतं."
"ती खूपच थकलेली वाटतेय."
तिच्या घरची परिस्थिती मला माहीत होती. घरातल्या अडचणींमुळे कदाचित तिने काही खाल्लं नसावं.
"ठीक आहे, तिला सलाईन लावा."
"नाही मॅडम, तिला रक्तस्राव होतोय. CTG चांगला नाही. बाळाच्या हृदयाचे ठोके मंदावताय. तिला सर्जरीसाठी हलवण्यात येतंय."
आतापर्यंत शेकडो सिझेरियन डिलीव्हरी केलेले डॉक्टर्स ड्युटीवर होते. पण असा रक्तस्राव होणं, बाळाच्या हृदयाचे ठोके मंदावणं नेहमीचं नाही. मी तिथे जायला निघाले, पण तेवढ्यात बातमी आलीच.
तिथे जाऊन मी पेशंटला पाहिलं. जन्माला आलेलं बाळं जिवंत नव्हतं. इतकंच नाही तर गर्भाशय फाटलेलं होतं आणि रक्तस्राव होत होता.
तिला रक्त चढवण्यासाठीची तयारी करण्यात येत होती.
बाळाचा मृत्यू आणि तिचं गर्भायश फाटणं या सगळ्यामुळे मला शंका येत होती.
"तुम्ही उपचार करा. मी कुटुंबियांशी बोलून येते."
मी बाहेर आले. तिचा नवरा आणि नणंद तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. मी त्यांना बोलवून परिस्थितीची कल्पना दिली. बाळाचा मृत्यू झाल्याचं आणि गर्भाशयाला दुखापत झाल्याचं आम्ही त्यांना सांगितलं. गरज पडल्यास त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती.
सहसा अशी बातमी सांगितल्यानंतर कुटुंबियांच्या तीव्र प्रतिक्रिया येतात. ते व्यथित होतात, चिडतात. डॉक्टर्सवर प्रश्नांची सरबत्ती करतात.
पण इथे अशा कोणत्याच भावना नव्हत्या. त्यांनी थंडपणे सगळं ऐकून घेतलं.
माझा संताप वाढत होता.
"मी तिला कालच तपासलं होतं. आई आणि बाळ दोघेही ठीक होते. या दरम्यानच्या काळात काय घडलं?"
अमीनाचा नवरा गप्पच होता.
तिची नणंद बोलू लागली. अमीनाने सकाळी उठून थोडा वेळ गप्पा मारल्या. ब्रेकफास्ट केला आणि एक डुलकी काढली.
झोपून उठल्यावर तिने आपल्याला वेदना होत असल्याचं सांगितलं म्हणून ते तिला हॉस्पिटलला घेऊन आले, अमीनाच्या नणंदेने सांगितलं.
"तिला दुखापत झाली होती का?"
"ती पायऱ्यांवरून घसरली का?"
"इथे येताना कारला अपघात झाला का?"
गर्भाशयाला इतकी मोठी इजा होऊन ते फाटण्यामागे काही कारण नक्कीच असणार. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा पुन्हा विचारूनही ते दोघंही तसेच शांत आणि थंड राहिले.
पुन्हा पुन्हा त्यांना प्रश्न विचारण्यात काही अर्थ नसल्याचं आमच्या लक्षात आलं.
गर्भाशय शिवल्यानंतरही रक्तस्राव सुरूच होता. म्हणून मग आम्ही गर्भायशाची पिशवी काढण्याचा निर्णय घेतला.
गर्भाशय काढल्यानंतर सुरुवातीला सगळं ठीक वाटलं. पण पाच मिनिटांनंतर पुन्हा पोटाच्या वरच्या भागातून रक्तस्राव सुरू झाला. तपासल्यानंतर लक्षात आलं, तिची प्लीहा फाटली होती आणि तिथून रक्त वाहात होतं.
सर्जरी विभागाचे प्रमुख आणि रक्तवाहिन्यांचे सर्जन आले. खरंतर हॉस्पिटलमधल्या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्ती त्यावेळी तिथे उपस्थित होत्या.
हळुहळू सुरू झालेला तो रक्तस्राव आता वाढला होता. आम्ही एकीकडे तिला रक्त चढवत होतो, दुसरीकडे रक्तस्राव थांबवण्याचे प्रयत्न सुरू होते. पण काही केल्या रक्त वहायचं थांबत नव्हतं.
ऑपरेशनच्या वेळी असा रक्तस्राव होणं आणि तो थांबवण्यासाठी विविध उपाय करावे लागणं, हे नेहमीचं आहे. पण इतका प्रचंड रक्तस्राव मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. जवळपास 8 कुशल डॉक्टर्स तो रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण आम्ही ती लढाई हरलो.
सकाळी 10 वाजता सुरू झालेला तो लढा मध्यरात्री 12 वाजता तिच्या शेवटच्या श्वासासोबत थांबला.
आम्ही बाहेर आलो. काही बायका घोळक्याने उभ्या होत्या. अमीनाच्या बहिणीचं 10 दिवसांनी लग्न होतं. सगळे नातेवाईक आलेले होते. अमीनाची 7 वर्षांची लेक कालच्यासारखीच बॅगेला घट्ट कवटाळून बाजूला उभी होती.
सगळ्यांच्या हातावर रंगलेली मेंदी होती.
माझेही हात रंगलेले होते... पण दुसऱ्याच कशाने.
त्या आमच्याकडे आशेने पहात होत्या. आम्ही त्यांना बातमी सांगितल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आक्रोश झाला.
संशयास्पद मृत्यू म्हणून आम्ही सगळ्या तपशीलांसह याची तक्रार केलेली आहे.
हिंसाचार जितका सहन केला जातो, त्यासोबत तडजोड केली जाते, तितका तो वाढतो, हे लक्षात घ्यायला हवं.
अशा हिंसाचाराला बळी पडणाऱ्यांना हेल्पलाईनची मदत घेता येऊ शकते.
गर्भवती महिलांसोबतच्या कौटुंबिक हिंसाचाराविषयी एक पाहणी करण्यात आली. भारतातल्या 30 टक्के गर्भवती महिलांना शारीरिक हिंसेला सामोरं जावं लागत असल्याचं यात आढळलंय.
आपण जर याविषयी बोललो, तर अधिक मारहाण होईल या भीतीने याविषयीची तक्रार केली जात नाही. म्हणूनच मारहाणीची तक्रार करणाऱ्या महिलांपेक्षा ती लपवणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
अशा प्रकारचा हिंसाचार हा समाजाच्या सगळ्या थरांमध्ये आढळलाय. याला कोणताही सामाजिक वा आर्थिक अपवाद नाही.
अशा प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक हिंसाचाराचा परिणाम त्या आईच्या आरोग्यावर तर होतोच, पण सोबतच अजून जन्मालाही न आलेल्या तिच्या पोटातल्या बाळाच्या वाढीवरही होतो.
कौटुंबिक हिंसाचार होणाऱ्या महिलांची वेळेआधीच प्रसूती होण्याची शक्यता असते.
तुम्ही अशा परिस्थिती आहात का, हे स्वतःच तपासून पहा :
गेल्या 12 महिन्यांत कुटुंबातल्या कोणी तुमच्यासोबत शारिरीक हिंसा, मारहाण केली आहे का?
- मारणं, लाथ मारणं, ढकलून देणं, थोबाडीत मारणं, जमिनीवरून फरफटत नेणं, चटका देणं, असं काही घडलंय का?
- चाकू किंवा बंदूक रोखत किंवा इतर कोणतं हत्यार दाखवत धमकी दिली आहे का?
- तुम्हाला घराबाहेर पडण्यापासून वा वैद्यकीय मदत घेण्यापासून रोखलं आहे का?
यातल्या एकाचं जरी उत्तर 'हो' असं असेल, तर मदत घ्या, सुरक्षित रहा.
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये तुम्ही या नंबरवर फोन करून मदत मागू शकता.
- पोलीस हेल्पलाईन : 1091 / 181 / 103
- राष्ट्रीय महिला आयोगाची व्हॉट्सॲप हेल्पलाईन : 7217735372
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)