लौंगी भुइंया: 30 वर्ष डोंगर फोडून त्यांनी तयार केला कालवा

फोटो स्रोत, NEERAJ PRIYADARSHI/BBC
बिहारमधल्या एका दुर्गम भागात लौंगी भुइंया यांनी तीस वर्षांपूर्वी कालवा खणायला सुरुवात केली. त्यांचं हे काम आता पूर्ण झालं आहे.
बिहारची राजधानी पाटण्यापासून 200 किलोमीटरवर गया जिल्ह्यातील बांकेबाजार इथल्या बहुतांश लोकांसाठी शेती हेच उदरनिर्वाहाचं मुख्य साधन. पण इथली माणसं गहू किंवा धान्याची शेती करू शकत नाही कारण पाण्याची टंचाई.
या कारणामुळेच इथली तरुण मंडळी कामधंद्यासाठी शहरांची वाट धरतात.
कोठिलवा गावचे लौंगी भुइंया यांची मुलंही कामधंदा शोधण्यासाठी घराबाहेर पडली होती. गावाजवळच्या बंगेठा डोंगरावर बकऱ्यांना चरायला घेऊन गेलेलं असताना भुइंया यांच्या मनात एक विचार आला. गावात पाणी आलं तर तरुण मुलांचं उदरनिर्वाहासाठी शहरात जाणं कमी होईल. पीकं घेता येतील.
पाऊस पडतो तेव्हा बंगेठा डोंगराच्या कुशीत साठवलं जातं. त्यातूनच त्यांना आशेचा किरण दिसला.
त्यांनी सगळा परिसर पालथा घातला. साठलेलं पाणी शेतापर्यंत कसं नेता येईल याचा नकाशा त्यांनी तयार केला. डोंगर फोडून कालवा बनवण्याच्या कामाला ते लागले.
एक दोन वर्ष नव्हे, पाच नव्हे, दहा नव्हे तर तब्बल तीस वर्ष हे काम चाललं. तीस वर्षांच्या अथक परिश्रमानंतर डोंगरातलं पाणी त्यांनी गावातल्या तलावात आणलं. एकट्याने फावडं चालवत त्यांनी तीन किलोमीटर लांबीचा कालवा खणला. 5 फूट रुंद आणि 3 फूट खोल कालवा त्यांनी खोदला.
यंदा ऑगस्ट महिन्यात भुइंया यांचं काम पूर्ण झालं. पावसाळ्यात त्यांच्या मेहनतीला अर्थ प्राप्त झाला आहे. आजूबाजूच्या तीन गावांना भुइंया यांच्या मेहनतीचा फायदा होत आहे. लोकांनी यावेळी गहू-तांदळची पेरणी केली आहे.
बीबीसीशी फोनवर बोलताना भुइंया यांनी सांगितलं की, "एकदा एखादी गोष्ट ठरवली की आम्ही मागे हटत नाही. कामातून जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा कालवा खोदण्याचं काम करत असे. तुमच्या एकट्याने होणार नाही असं बायको सांगत असे पण मला विश्वास होता एकदिवस हे काम पूर्ण होईल".
नवा 'माऊंटन मॅन' म्हणून प्रसिद्धी
माऊंटन मॅन म्हणून दशरथ मांझी सगळीकडे प्रसिद्ध आहेत. त्यांनी डोंगर फोडून रस्ता बनवला होता. आता लौंगी भुइंया यांनाही 'माऊंटन मॅन' ही बिरुदावली मिळाली आहे.
लौंगी त्याविषयी सांगतात, "दशरथ मांझी यांच्याबद्दल नंतर कळलं. जेव्हा कालवा खोदायचं ठरवलं तेव्हा माहिती नव्हतं. माझ्या डोक्यात एवढंच होतं की पाणी आलं तर शेती बहरेल. तरुण मुलांना कामधंद्याकरता बाहेर जावं लागणार नाही. धनधान्य असलं की पोटापाण्याची सोय होऊन जाते".

फोटो स्रोत, NEERAJ PRIYADARSHI/BBC
लौंगी यांना चार मुलं आहेत. यापैकी तीन गावाबाहेर असतात. घरी बायको, एक मुलगा, सून आणि त्यांची मुलं असं कुटुंब आहे. कालव्याचं कळल्यावर बाकी मुलंही गावी परततील अशी त्यांना आशा आहे. मुलांनी त्यांना तसं आश्वासन दिलं आहे.
गावकऱ्यांना आनंद
डोंगर फोडून गावात पाणी आणणाऱ्या लौंगी यांच्या कामाला यश आल्याने गावकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे. भुइंया यांच्या प्रयत्नांमुळे सर्व प्रकारची शेती करू शकतो असा विश्वास गावकऱ्यांना आहे.
उमेश राम हे स्थानिक सांगतात की, "लौंगी भुइंया यांनी केलेलं काम चमत्कारापेक्षा कमी नाही. अतिशय कठीण असा डोंगर फोडून त्यांनी कालवा बनवला. येणाऱ्या पिढ्या त्यांना दुवा देतील. आम्ही त्यांचे ऋणी राहू".

फोटो स्रोत, NEERAJ PRIYADARSHI/BBC
जीवन मांझी सांगतात की, "लौंगी भुइंया यांनी जेव्हा कामाला सुरुवात केली, तेव्हा त्यांची मेहनत पाहून स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना इथल्या समस्यांची कल्पना दिली होती. पण आम्हाला कोणीही वेळ दिला नाही. कोणीही मदत केली नाही. आम्ही लौंगी यांना हे काम अशक्य असल्याचं सांगितलं. त्यांनी आम्हाला चुकीचं सिद्ध केलं".
लौंगी भुइंया यांच्या कामाची आता गावाबाहेरही होऊ लागली आहे. आता रोज भुइंया यांना भेटायला अनेक माणसं येतात अशी गावातली माणसं सांगतात. लौंगी भुइंया अतिमागास अशा मुसाहिर समाजाचे आहेत. गावातली बहुतांश माणसं याच समाजाची आहेत.
प्रशासनाला प्रश्न पण मदत का नाही?
डोंगरातलं पाणी शेतात आलं याचा आनंद भुइंया यांच्यासह गावकऱ्यांना आहे. मात्र अनेकदा मदत मागूनही प्रशासनाने काहीही केलं नसल्याचा रागही आहे. लौंगी सांगतात, "इतक्या वर्षात कोणी आलं नाही. आता माणसं येतात आणि आश्वासनं देऊन जातात. मला आता काही नको. माझ्या घरात आणखी एक शौचालय असावं अशी माझी इच्छा आहे. माझं घर मातीचं आहे. ते ढासळतं आहे. मी डोंगर फोडायचं काम केलं नसतं तर आतापर्यंत पक्कं घर बांधलं असतं. मला कोणतंही पदक, पुरस्कार नको. मला ट्रॅक्टर हवा आहे जेणेकरून मी शेती करू शकेन".

फोटो स्रोत, NEERAJ PRIYADARSHI/BBC
उमेश राम सांगतात की, "भुइंया यांच्या कामाची माहिती कळल्यावर या भागाचे एसडीओ गावात आले होते. लौंगी यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे".
लौंगी भुइंया यांचं काम पूर्ण झाल्याचं कळताच प्रशासनाला जाग आली आहे. आता त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित होणार आहे.
गया जिल्ह्यातील इमामगंज भागाचे बीडीओ ज्यांच्या कार्यकक्षेत लौंगी भुइंया यांचं काम येतं ते म्हणाले, "लौंगी यांनी वीरपुरुषाचं काम केलं आहे. ते कौतुकास पात्र आहेत. लोकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. अशा नागरिकांचा सन्मान करायला हवा. लौंगी यांचं काम या परिसरात शेती आणि त्यावर आधारित जैवव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे".
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








