You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्मिता झगडे: कोरोनाने नोकरी गेली पण त्या खचल्या नाहीत त्यांनी टॅक्सी चालवली
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी
कोरोनाचे आकडे वाढत होते. कोरोना रुग्णांच्या सर्वांत जास्त केसेस मुंबईमध्ये सापडल्या होत्या. संपूर्ण मुंबईत कडक लॉकडाऊन होता. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे शासनाचे आदेश होते.
याचा फटका मुंबईतल्या स्मिता झगडे यांनाही बसला. स्मिता झगडे यांची नोकरीही गेली. अशा परिस्थितीत खचून न जाता स्मिता यांनी टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला आणि त्या घराबाहेर पडल्या.
मुंबईतील काळाचौकी परिसरात राहणाऱ्या स्मिता एकल माता आहेत. स्मिता त्यांचे आई-वडील आणि भाऊ वहिनी यांच्यासोबत एका छोट्या घरात राहतात. स्मिता यांचे वडीलही ड्रायव्हर होते. स्मिता यांना एक मुलगी असून तिच्या शिक्षणाचा खर्च आणि उदरनिर्वाहासाठी त्यांना घराबाहेर पडणं भाग होतं.
चालक शिकत आहे...
स्मिता सांगतात, " मी 2010 मध्ये गाडी शिकले.. त्यानंतर मी नोकरी शोधायला सुरुवात केली. मला याच क्षेत्रामध्ये नोकरी करायची होती. योगायोगाने मला एका ठिकाणी नोकरी मिळाली. तीसुद्धा ही फोर व्हिलर ट्रेनर म्हणून. मी ती नोकरी सात वर्षं केली. मात्र आता कोरोनामुळे जे लॉकडाऊन लागलं, त्यामध्ये माझी नोकरी गेली. जवळजवळ 3 महिने मी घरातच होते. कंपनीनेही माझा पगार बंद केला होता. हातात काहीच शिल्लक राहत नव्हतं. मग विचार केला की, घर तर चाललं पाहिजे. बऱ्याच जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत. माझी मुलगी शिक्षण घेत आहे. तिच्याही भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे बसून चालणार नाही. "
"आपल्याकडे एक कला आहे ड्रायव्हिंगची. आपण आतापर्यंत लोकांना प्रायव्हेट गाडी शिकवत होतो, ती गाडी फक्त आता आपल्याला टॅक्सीच्या रुपात चालवायची आहे. माझ्या भावाने गाडी घेऊन जवळ जवळ अडीच वर्ष झाली होती. तेव्हा मला वाटलं की ही अडीच वर्ष का वाया घालवली?" स्मिता सांगतात.
मुंबईसारख्या शहरात टॅक्सीचा व्यवसाय आणि तो ही एका महिलेने करावा हा विचारच त्यांच्या घरच्यांना पटेनासा होता. त्यांच्या घरच्यांनी सुरूवातीला स्मिता यांना नकार दिला. मात्र स्मिता यांनी त्यांचा विचार घरच्यांना पटवून दिला आणि मग भावाची गाडी घेऊन स्मिता टॅक्सी व्यवसायात उतरल्या.
मुलीच्या धाडसाचं पालकांना कौतुक
स्मिता यांचे वडील अशोक झगडे यांना त्यांच्या मुलीच्या धाडसाचं कौतूक वाटतं आहे. तिच्याबद्दल सांगताना त्यांच्या डोळ्यातील अभिमान आणि चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत होता.
ते सांगतात "माझी मुलगी असून, जे मुलगा करू शकत नाही ते करायचं धाडस दाखवते... याचा मला अभिमानही आहे आणि आनंदही आहे. मी ड्रायव्हर आहे, म्हणून मी तिला ट्रेनिंग दिलं अथवा तिला सपोर्ट केला, असं मी काहीच केलं नाही. तिने तिच्या जिद्दीने या व्यवसायात पाऊल ठेवलं आहे."
मुंबईत लॉकडाऊन असल्याने अनेकजण घरून काम करत आहेत. शिवाय लोकल ट्रेन्सही बंद आहेत. या सर्वांचा परिणाम टॅक्सी व्यवसायावरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. परंतु लवकरच हे चित्र बदलेल असा विश्वास स्मिता व्यक्त करतात.
त्या सांगतात " ज्या मानाने आपल्या मुंबईत मुंबईकर राहातात. त्यातले निम्मे काय पाव भाग ही बाहेर नाहीयेत. तरीही एवढा बिझनेस आहे. तेव्हा स्वाभाविक आहे, जेव्हा आपली पूर्ण मुंबई कामावर जाण्यासाठी बाहेर पडेल, तेव्हा नक्कीच यापेक्षा तिप्पट व्यवसाय होईल."
"मी इतर महिलांना सांगू इच्छिते की, जर तुम्हाला टॅक्सी चालवायची असेल तर हा टॅक्सीचा व्यवसाय कमीत कमी तुम्हाला महिन्याला 25 ते 30 हजार रुपये मिळवून देईल. यामुळे आपल्या संसारामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात हातभार लावू शकाल. आपण आपल्या घरच्यांना, मुलाबाळांना अधिक सुख देऊ शकतो.
स्मिता यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केल्यावर त्यांना सुरूवातीला काही विचित्र अनुभव आल्याचं स्मिता सांगतात, मात्र त्यासोबतच चांगली लोकं ही भेटल्याचं सांगायला त्या विसरल्या नाहीत.
स्मिता म्हणतात, "सुरूवातीला जी जेव्हा टॅक्सी रस्त्यांवरून चालवायला लागते तेव्हा काही जण आश्चर्याने बघायचे. तर काही जण कुतूहलाने पाहायचे. एवढंच नाही तर, मला एकदा एक ट्रॅक्सीवाला बोलला की, 'अहो ताई आम्हाला कुठेतरी जागा ठेवा. का सगळीकडे महिलाच वर्ग येणार आहे?'
"एकदा गाडीत एक पॅसेंजर होते. ते उतरताना मला म्हणाले की, प्लीज काहीही झालं तरी तुम्ही हे क्षेत्र सोडू नका. तुमच्यामुळे अधिक महिलांना प्रेरणा मिळेल. तसंच जर महिला ड्रायव्हर असेल तर त्यांच्यासाठीसुद्धा हा प्रवास सुरक्षित असेल," स्मिता सांगतात.
मात्र या यशाने स्मिता हुरळून गेलेल्या नाहीत. स्मिता यांना स्वतःचं घर घ्यायचं आहे. तसंच त्यांना एक महिला चालक ठेवायची आहे. असं केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढेल असं त्यांना वाटतं.
ज्या महिलांना या व्यवसायात यायचं असेल त्यांनी आवश्य या. कारण या व्यवसायात चांगला नफा आहे, हातात चार पैसे खेळतात. त्यामुळे महिला आपल्या कुटुंबाच्या खर्चात हातभार लावू शकतात असा सल्लाही त्या देतात.
कोरोनाच्या अत्यंत कठीण, निराशेच्या, तणावाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. धंदे बुडाले. परंतु अशा हार न मानता, खचून न जाता, आलेल्या संकटाचं संधीत रुपांतर स्मिता यांनी केलं. स्मिता यांचं धाडस, त्यांची इच्छाशक्ती ही अनेकांना प्रेरणा देत आहे.
बीबीसी मराठीने स्मिता झगडे यांच्या बातमीचा व्हीडिओ प्रकाशित केल्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही त्यांची दखल घेतली आणि स्मिता यांच्या कामाचं कौतुक केलं.
कोरोनाच्या काळात जगभरातील अनेक लोकांना विचित्र संकटांना सामोरं जावं लागलं. काहींनी या संकटावर मात करत नवीन मार्ग शोधला. स्मिता झगडे त्यापैकीच एक.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)