कंगना-शिवसेना वादात राज ठाकरे शांत का बसले आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"मुंबईतून 'ठाकरे ब्रँड'ला नष्ट करून महाराष्ट्रावर ताबा मिळवण्याचे कारस्थान उघडे पडले आहे. राज ठाकरे हे सुद्धा या ठाकरे ब्रँडचे घटक आहेत आणि भविष्यात याचा फटका त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात पण महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा."
या शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत प्रकरणावरुन राज ठाकरेंना साद घातली आहे.
गेल्या काही दिवसांत अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध शिवसेना हा वाद देशभरात गाजतोय. कंगनाने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केल्यापासून ते तिने मुंबईला पीओके आणि नंतर पाकिस्तानाची उपमा देईपर्यंत या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मौन बाळगले.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईत येण्यास मला नकार देण्यासाठी मुंबई कुणाच्या बापाची नाही, असे खुले आव्हान कंगनाने शिवसेनेला दिले. तेव्हा मुंबई मराठी माणसाच्या बापाची आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले.
भारतीय जनता पार्टीने कंगनाचे सातत्याने समर्थन केले. तर महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून कंगनाच्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यात आला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या सर्व घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मात्र मौन बाळगले. कंगना आणि शिवसेनेच्या संघर्षात राज ठाकरेंनी सोयिस्कररित्या मौन बाळगले आहे का ? नवीन राजकीय समीकरणांमुळे राज ठाकरे शांत आहेत का? मुंबई आणि मराठी माणसाच्या मुद्यावर उभी राहिलेली मनसे मुंबईला पीओके आणि पाकिस्तान म्हटल्यावरही शांत कशी अशी चर्चा सोशल मीडियावरही रंगली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी 'मुंबईचे खच्चीकरण कुणासाठी! जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची !! या मथळ्याखाली लेख लिहिला आहे.
या लेखात त्यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख करत मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी होत असताना ते शांत का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
संजय राऊत म्हणतात, " महाराष्ट्राची राजधानी मुंबईला ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ग्रहण 'उपरे' लावत आहेत. मुंबईला पाकिस्तान आणि बाबर म्हणणाऱ्यांच्या मागे भारतीय जनता पार्टी उभी राहते हे दुर्देवच म्हणावे लागेल."
"सुशांत आणि कंगनाच्या मागे उभे राहून भाजपला बिहार निवडणुका लढायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय रजपूत आणि क्षत्रिय मते मिळवण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल."
"ठाकरे आणि पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे ब्रँड आहेत. मुंबईतून या ब्रँडला नष्ट करायचे व महाराष्ट्रावर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हे सुद्धा याच ठाकरे ब्रँडचे घटक आहेत आणि भविष्यात याचा फटका त्यांनाही बसणार आहे."
"शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात पण महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवशी मुंबईचे पतन होण्यास सुरुवात होईल."
कंगनाच्या मुद्यावर राज ठाकरे कात्रीत सापडले आहेत का?
संजय राऊत यांनी या विषयात राज ठाकरे यांना खेचून त्यांना चांगलंच कात्रीत पकडलं आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हा प्रश्न सामनातून संजय राऊत यांनी विचारला असला तरी सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा आहे.
संजय राऊतांच्या वक्तव्यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देत जेव्हा जेव्हा मनसेला गरज होती तेव्हा शिवसेना कशी गप्प होती याची आठवण करुन दिलीय.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "मनसेची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील, पण 2008 मध्ये मनसे परप्रांतियांच्या विरोधात लढत होती तेव्हा राज ठाकरेंच्या बाजूने बोलायला लोकसभेत खासदार शांत होते. मनसेचे रातोरात सहा नगरसेवक चोरले तेव्हा शिवसेनेने डाव साधला. 2014-17 मध्ये बाहेरच्या लोकांशी लढण्यासाठी राज ठाकरेंनी साद घातली तेव्हा शिवसेना शांत होती."
संदीप देशपांडेंनी हे आपले वैयक्तिक मत आहे असंही स्पष्ट केलंय. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी काही दिवसांपूर्वी कंगना राणावतच्या मुंबई पोलिसांच्या वक्तव्याबाबत निषेध व्यक्त करणारे पत्र प्रसिद्ध केले होते.

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर सांगतात, "या सर्व प्रकरणावर राज ठाकरे यांनी मौन बाळगण्याचे कारण म्हणजे कंगनाला विरोध करणं याचा अर्थ भाजप आणि मोदींना विरोध करणं असे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे राज ठाकरेंची कोंडी झालीय."
2019 विधानसभा निवडणुकांनंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकांमध्ये अनेक बदल केले. लोकसभेच्या प्रचारावेळी मोदी-शहा जोडीवर सडकून टीका करणारे राज ठाकरे अचानक भाजप आणि मोदींचे कौतुक करू लागले.
मनसेच्या वर्धापनदिनी हिंदुत्वावादाचा नारा देत पक्षाचा अधिकृत झेंडा भगवा केला. कंगना राणावत मुंबई, महाराष्ट्राला पाकिस्तानची उपमा देत असली तरी देशभरातले भाजप नेते कंगनाला पाठिंबा देत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तर शिवसेनेच्या आव्हानानंतर कंगनाला मुंबईत सुरक्षा मिळावी यासाठी वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली.
अशा परिस्थितीमध्ये भाजप समर्थन करत असणाऱ्या कंगनाला विरोध करताना मनसेची कोंडी होतेय असाही एक मतप्रवाह आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे यांना मात्र तसे वाटत नाही. ते सांगतात, "राज ठाकरेंना बोलायचे असते तर आतापर्यंत ते बोलते असते. ते अजूनही बोलले नाहीत याचा अर्थ ही त्यांची राजकीय रणनीती असावी."
"शिवसेना बदनाम होत असेल किंवा सत्ताधाऱ्यांवर टीका होत असेल तर विरोधी पक्ष म्हणून मनसेला ते हवेच आहे. त्यामुळे हे सोयिस्कर मौन असू शकते."
संजय राऊत यांनी राज ठाकरेंना साद घालण्याची दोन कारणे असू शकतात असं वैभव पुरंदरे सांगतात, " उद्धव ठाकरेंवर कंगनाकडून केली जात असलेली टीका वैयक्तिक नसून ती कार्यपद्धती आणि निर्णय क्षमतेवर आहे. त्यामुळे वैयक्तिक संबंधाचा राज ठाकरे विचार करत नसावेत."
"दुसरा मुद्दा म्हणजे शिवसेनाला या प्रकरणात मनसेची खरच गरज असू शकते. वैयक्तिक पातळीवर अपेक्षाही असू शकते."
राज ठाकरे संभ्रमात आहेत का ?
महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती सध्या अस्थिर आहे. परस्पर विरोधी विचारधार असूनही तीन पक्ष एकत्र सत्तेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सर्वाधिक मताधिक्य असलेला भाजप सत्तेबाहेर आहे. याच परिस्थितीत मनसे आपले अस्तित्व चाचपडून पाहते आहे.
महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली नव्हती तोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या. तेव्हापासून ते आता कोरोना काळात लॉकडॉऊनच्या अंमलबजावणीवर टीका करेपर्यंत सर्वच बाबतीत मनसेने ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

फोटो स्रोत, Getty Images
उद्धव ठाकरे सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा नऊ प्रश्नांचा सर्व्हेही नुकताच मनसेने केला.
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा भाजपने व्यक्ती केंद्रीत केला अशी टीका शिवसेनेने केली असता राज ठाकरेंनी मात्र नरेंद्र मोदींचे कौतुक केले.
पत्रकार सचिन परब सांगतात, " राज ठाकरे यांना याप्रकरणी भूमिका घेता येत नसावी अशीही एक शक्यता आहे. कारण कंगनाच्या प्रकरणात त्यांनी उडी घेतली तरी मनसेला यात काही विशेष फायदा होणार नाही हे त्यांना कळून चुकलंय."
भविष्यात मनसेकडे भाजपसोबत जाण्याचा एक पर्याय आहे. त्यासाठी मनसे तयारी करतेय असंही म्हटलं जाते. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मनसे भाजपला मदत करेल याची शक्यताही नाकारता येत नाही.
"तेव्हा या मुद्यात हात घालून मनसे भाजपला का नाराज करेल? कंगना राणावतला विरोध करून त्यांना भाजपला दुखवायचे नाही असेही दिसून येते." असं सचिन परब सांगतात.

मनसेला पुन्हा जनतेच्या जवळ जाण्यासाठी प्रभावी नॅरेटीव्हची आवश्यकता आहे. प्रकाश अकोलकर यांच्या मते मुंबईच्या मुद्यावर मनसेने शांत राहणं लोकांना अपेक्षित नाही.
ते सांगतात, " मनसे संभ्रमावस्थेत असणं हे त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे यात शंका नाही. त्यांनी कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने मनसेचे नेमके मुद्दे काय हे लोकांपर्यंत पोहचत नाहीत."
'राजा' 'दादू'च्या पाठीशी उभा राहणार का?
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके असणाऱ्या राज ठाकरेंनी 2005 मध्ये नाराज होऊन शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला.
वर्षभरातच त्यांनी आपला नवा राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि उद्धव विरुद्ध राज असे नवे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात जन्माला आले.

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्षही अनेकदा पहायला मिळाला. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र येण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. शिवाय, वैयक्तिक पातळीवर दोघंही एकमेकांसोबत आल्याचंही अनेकदा दिसून आले.
- राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी या चिमण्यांनो परत फिरा रे ... अशी भावनिक साद राज ठाकरेंना घातली होती.
- राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी 'माझी चळवळ' ही मोहीम काही शिवसैनिकांनी हाती घेतली होती. याला बाळासाहेब ठाकरेंचाही पाठिंबा होता.
- 2012 मध्ये लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍन्जिओग्राफीसाठी गेलेल्या उद्धव ठाकरेंना सोबत म्हणून राज ठाकरे गेले. त्यावेळी राज ठाकरेंनी स्वत:गाडी चालवून उद्धव ठाकरे यांना घरी नेले.
- तर 2013 मध्ये राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंना टाळीसाठी हात पुढे केला पण उद्धव ठाकरेंनी त्याची खिल्ली उडवली होती.
- 2014 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी राज आणि उद्धव एकाच व्यासपीठावर दिसले.
- 2014 मध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोनवरुन चौकशी केली होती. त्यावेळी शिवसेना-मनसे एकत्र निवडणूक लढणार अशीही चर्चा होती. दोन्ही पक्षाने जागा वाटपासाठी बैठकही केल्याचे समजते.
- 2017 मध्ये महानगरपालिका निवडणुकीत जेव्हा शिवसेना-भाजप युती तुटली तेव्हा शिवसेना-मनसे एकत्र येण्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. आपण उद्धव ठाकरेंना फोन केला असता त्यांनी फोन घेतले नाहीत अशी माहिती राज ठाकरे यांनी सभेत सांगितली होती.
- उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीलाही राज ठाकरे उपस्थित होते.
- राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाला उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते.
आता कंगनाने आपल्या वक्तव्यातून ठाकरे सरकारवर केवळ टीकाच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला.

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेनेला 'बाबरसेना' म्हणत तिने एकप्रकारे उद्धव ठाकरेंना बाबरची उपमा दिली.
त्यामुळे आता अभिनेत्री कंगना राणावतच्या प्रकरणात राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहणार का ? याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.
मनसेकडून महापालिका निवडणुकांची तयारी?
लॉकडॉऊनच्या काळात विरोधी पक्ष म्हणून भाजपने महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. यासाठी त्यांना मनसेचीही साथ लाभली.
अवाजवी वीज बिल, जिम आणि प्रार्थना स्थळे खुली करण्याबाबत, शालेय शुल्क कमी करण्यासाठी आणि राज्याची कोलमडलेली अर्थव्यवस्था अशा अनेक मुद्यांवर राज ठाकरेंनी गेल्या काही आठवड्यांमध्ये सरकारवर टीका केली.

फोटो स्रोत, Getty Images
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसेने पूर्व तयारी सुरू केल्याचे दिसते. तसेच लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी सर्व्हेही केले.
कोरोना आरोग्य संकटात मनसेचे इंजिन रुळावर आणण्याचा प्रयत्न आहे. याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे मनसेचे प्रमुख लक्ष्य आहे. त्यासाठीची तयारी मनसेने सुरू केलीय. त्यामुळे स्थानिक मुद्यांवर मनसेकडून राजकारण होताना दिसत आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








