महेंद्रसिंग धोनी: 'तुझ्या बॉलिंगवर फटके पडले तर जबाबदारी माझी'

फोटो स्रोत, BCCI
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
'तुझ्या बॉलिंगवर फटके पडले तर जबाबदारी माझी असेल. तू बिनधास्त बॉलिंग कर', असं महेंद्रसिंग धोनीने केदार जाधवला सांगितलं होतं. धोनीचा सल्ला मानून त्याने बॉलिंगला सुरुवात केली आणि दुसऱ्याच ओव्हरमध्ये विकेट मिळाली.
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. 7 जुलै हा महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस. धोनीच्या वाढदिवसाच्या दिवशी टीम इंडियाचा शिलेदार केदार जाधवने धोनीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारं पत्र लिहिलं होतं.
त्यानिमित्ताने बीबीसी मराठीने केदारशी संवाद साधला. दीपस्तंभ म्हणून धोनीचं स्थान, त्याचं मराठीत बोलणं, युवा खेळाडूंशी संवाद, कँडिड फोटो याबाबत केदारने सांगितलं.
धोनीशी पहिली भेट
महेंद्रसिंग धोनीशी पहिली भेट कधी झाली यावर केदार सांगतो, "प्रतिस्पर्धी खेळाडू म्हणून अनेकदा त्यांच्याविरुद्ध खेळलो. परंतु महेंद्रसिंग धोनी यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची संधी 2016 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यासाठी माझी निवड झाली तेव्हा मिळाली. या दौऱ्यापूर्वी बेंगळुरूत कॅम्प होता.

फोटो स्रोत, Getty Images
ब्रेकफास्ट टेबलवर माहीभाई आधीच बसलेले होते. आधीच्या झिम्बाब्वे दौऱ्यात मी शतक झळकावलं होतं. त्यावेळी मी सलमान खानची एक डान्स स्टेप केली होती. मी सलमान खानचा फॅन आहे हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे मला बोलतं करण्यासाठी त्यांनी हीच क्लृप्ती वापरली.
सलमानला कधी भेटला आहेस असं त्यांनी विचारलं. अजून सलमानची भेट झाली नसल्याचं सांगितलं. हे आमचं पहिलं संभाषण होतं. त्या झिम्बाब्वे दौऱ्यात आम्ही 15-20 दिवस एकत्र होतो. त्याकाळात त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं. त्यांचा स्वभाव कसा आहे याचा अंदाज आला. आमचे जे ऋणानुबंध आहेत त्याचं तो दौरा पाया होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
त्या झिम्बाव्वे दौऱ्यात मी, युझवेंद्र चहल, के.एल.राहुल यांना धोनीसमोर खेळता आलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा मिळाला. 15-20 दिवस त्यांनी आमच्या खेळातले बारकावे टिपले. त्यांची मानसिकता काय असते ते कळलं. ते तयारी कसे कळतात ते कळलं. आमच्यासाठी तो दौरा फिक्स्ड डिपॉझिट असा होता", असं केदारने सांगितलं.
धोनीबद्दल आदरयुक्त भीती
धोनी यांच्याबद्दल आदर आधीपासूनच होता. थोडी भीती होती. एवढे मोठे प्लेयर आहेत. त्यांच्यासमोर चुकीचं काही घडायला नको अशी भावना होती. ते स्वत:हून संवाद साधतात. गेल्या तीन-चार वर्षात मी त्यांच्याबरोबर खूप वेळ व्यतीत केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
क्रिकेटर म्हणून ते खूप महान आहेत, पण माणूस म्हणून ग्रेट आहेत. तुम्ही पर्सनली भेटू शकलात तर तुम्हाला मी काय म्हणतोय याचा अंदाज येईल. कोणत्याही खेळाडूला संधी देऊन, त्याचा आत्मविश्वास वाढवणं ही त्यांची खासियत आहे. कर्णधार म्हणून त्यांची ही हातोटी महत्त्वाची आहे. युवा खेळाडूंसाठी ते प्रेरणादायी आहेत.
तुझ्या बॉलिंगवर रन्स झाल्या तर जबाबदारी माझी
मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जी वाटचाल केली आहे त्यात धोनी यांचा सिंहाचा वाटा आहे. जेव्हा त्यांनी मला बॉलिंग करायला विचारलं तोपर्यंत मी एवढी बॉलिंग केली नव्हती.
माझ्या मनात साशंकता होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर मी चांगली कामगिरी करू शकेन की नाही याची भीती होती. पण त्यांनी खांद्यावर हात ठेऊन सांगितलं, तुझी बॉलर म्हणून निवड झालेली नाही. तुझ्या बॉलिंगवर फटके पडले तरी त्याची जबाबदारी माझी आहे. तु काळजी करू नकोस. तुझी बॉलिंग हा बोनस असणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तुमचा कॅप्टन खांद्यावर हात ठेऊन असं सांगतो तेव्हा माझी सगळी भीती पळून गेली. मी अगदी निर्धास्त होऊन बॉलिंग केली. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बॉलिंग करावी अशी मी बॉलिंग केली. माझ्या नशिबाने दुसऱ्याच ओव्हरमध्ये विकेट मिळाली. तिथून पुढे माझं जे करिअर आहे, माझा आत्मविश्वास उंचावला ते श्रेय त्यांना आहे. बॉलर म्हणून आदर्श कॅप्टन आहेत.
याची विकेट घेऊन टाक
धोनीला मराठी कसं येऊ लागलं याबाबत विचारलं असता केदारने धोनीच्या मराठी बोलण्यामागचा किस्सा उलगडून सांगितला.
"धोनी यांचा मूड मजामस्करीचा असतो तेव्हा ते ड्रेसिंगरुममध्ये असे काही शब्द शिकायचा प्रयत्न करतात. त्या मॅचच्या आधी, सीरिजच्या आधी त्यांनी मला विचारलं होतं की मराठीत आणखी काय काय शब्द आहेत? इसकी विकेट ले... ले याला मराठीत काय म्हणतात हे त्यांनी विचारलं होतं. मराठीत त्याला घेऊन टाक असं म्हणतात असं सांगितलं. पाचव्या वनडेवेळी माझ्या लक्षातही नव्हतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
मी बॉलिंगला आलो तेव्हा त्यांनी अचानक भाऊ, याला घेऊन टाक असं म्हटलं. याची विकेट घेऊन टाक. माझ्यासाठी तो आश्चर्याचा धक्का होता. कारण ही गोष्ट मी विसरून गेलो होतो. अविस्मरणीय अनुभव होता".
कँडिड फोटोचं रहस्य
गेल्या वर्षी आयपीएलदरम्यान सोशल मीडियावर केदार आणि धोनीचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या ड्रेसिंगरुममध्ये केदार स्टार्टर खात होता. बाजूला धोनी बसलेला होता. केदारने चमच्याने काही गोष्टी धोनीला भरवल्या असा तो व्हीडिओ होता. त्याबाबत विचारलं असता केदार म्हणाला,
"असंख्य किस्से आहेत. त्यांच्याबरोबरचे असंख्य किस्से आहेत. लहान भावाप्रमाणे ते काळजी घेतात. मार्गदर्शन करतात. ते आजूबाजूला असले की मी जगात कोणतीही गोष्ट मिळवू शकतो असा विश्वास असतो. माझं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. यात कोणताही अजेंडा नाही. माझा मित्रांवर जीव आहे.

फोटो स्रोत, Getty Images
धोनी एवढे मोठे आहेत पण तरी ते मित्र बनले. एकाच स्वभावाची माणसं एकत्र आल्याने तो बाँड निर्माण झाला आहे. ते मित्रांवर खूप जीव लावतात. मीही तशाच आहे. अनेक क्षण त्यांच्याबरोबर एन्जॉय करतो. मला त्याचं भांडवल करायचं नाहीये. मोहित शर्माने तो क्षण टिपला होता. ते सोशल मीडिया, फोन पाहत नाहीत".
प्रोसेसवर भर देतात
धोनीची कामाची पद्धत कशी आहे यासंदर्भात केदार म्हणाला, "धोनीभाईंबरोबर राहून राहून माझा आत्मविश्वास वाढत गेला. मीही शांत राहायचा प्रयत्न करू लागलो. कोणत्या बॉलरवर आक्रमण करायचं ते सांगतात. छोट्या छोट्या गोष्टी सांगत राहतात. सतत मार्गदर्शन करत असतात.
विजय मिळाला तर ते उत्साहित नसतात, हरलो तर ते नाराज होत नाहीत. बॅलन्स्ड राहतात. प्रोसेसमध्ये जगतात. प्रोसेस पूर्ण केली असेल तर निकालाने त्यांच्यावर परिणाम होत नाही. एखाददुसरी मॅच हरणार हे त्यांना ठाऊक असतं. मोठमोठे पराभव त्यांनी सहन केले आहेत. वर्ल्डकप विजयाची संधी होती. मात्र ही संधी हुकली. पराभवाला कसं सामोरं जायचं हे शिकलो".
आयपीएलसाठी सज्ज
कोरोनापूर्वी आमचा कॅम्प सुरू होता. ते सहा महिन्यांनंतर खेळत होते असं वाटलं नाही. वजन वाढलेलं नव्हतं. खेळण्याची ऊर्मी कायम होती. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहावं असं त्यांना बघून वाटलं होतं.
हे वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








