भगतसिंह कोश्यारीः कुलगुरु, क्रिकेटर, पत्रकार ही महाराष्ट्राच्या राज्यपालांची ही परंपरा तुम्हाला माहिती आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. कारण आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाचं.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात आमदार होणं बंधनकारक आहे. मात्र, विधानपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्यानं आणि राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी उद्धव ठाकरेंची शिफारस मान्य न केल्यानं पेच निर्माण झाला होता.
अखेर राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित विधानपरिषदेच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याची विनंती केलीय.

फोटो स्रोत, Getty Images
या सर्व घडामोडींमुळं राज्यपालपद फारच चर्चेत आलं. कधी विरोधी पक्षनेते, तर कधी सत्ताधारी राजभवनात फेऱ्या मारत होते. अखरे राज्यपालांच्या पत्रामुळं हे 'फेरीसत्र' थांबलं असलं तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे काही अजून चर्चेच्या फेऱ्यातून सुटत नाहीत.
राज्यपालांभोवती फिरणारं सध्याचं राजकीय चक्र लक्षात घेता, बीबीसी मराठीनं महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राज्यपालांबाबत थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलाय.
1) राजा महाराज सिंह
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीआधी म्हणजे 6 जानेवारी 1948 ते 30 मे 1952 दरम्यान राजा महाराज सिंह तेव्हाच्या मुंबई प्रांताचे राज्यपाल होते.
कपूरथळा राजघराण्यात राजा महाराज सिंह यांचा जन्म झाला. महाराजा हरी सिंग यांच्या सत्तेखालील जम्मू-काश्मीरचे पंतप्रधान म्हणूनही राजा महाराज सिंह यांनी काम पाहिलंय.
1941 साली त्यांची लखनौ विद्यापीठाचे कुलपती म्हणून निवड झाली होती.
वयाच्या 72 व्या वर्षी बॉम्बे गव्हर्नर्स इलेव्हन या क्रिकेट संघाचे ते कर्णधार होते. क्रिक इन्फो या वेबसाईटनं ही माहिती दिलीय.
2) सर गिरिजा शंकर बाजपेयी
30 मे 1952 ते 5 डिसेंबर 1954 या काळात सर गिरिजा शंकर बाजपेयी हे मुंबई प्रांताचे राज्यपाल होते.
ऑक्टोबर 1915 मध्ये त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत पदार्पण केलं. नंतर विविध पदांवर कार्य केल्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारतात ते राजकारणात सक्रीय झाले. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पंडित नेहरुंनी त्यांना परराष्ट्र खात्याचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केलं.
पुढे नेहरूंनी त्यांना मुंबई प्रांताचे राज्यपाल म्हणून नियुक्त केलं. त्यानंतर काही काळानं त्यांची प्रकृतीही ढासळत गेली. राज्यपालपदी असतानाच 5 डिसेंबर 1954 रोजी सर गिरिजाशंकर बाजपेयी यांचं निधन झालं.

फोटो स्रोत, rajbhavan-maharashtra.gov.in
3) हरेकृष्ण मेहताब
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते, काँग्रेसचे नेते आणि ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री अशी ओळख असणाऱ्या हरेकृष्ण मेहताब हे 14 मार्च ते 1955 ते 14 ऑक्टोबर 1956 या दरम्यान मुंबई प्रांताचे राज्यपाल होते.
1923 साली सुरू करण्यात आलेल्या 'प्रजातंत्र' या नियकालिकाचं संपादकपदही त्यांनी भूषवलंय. याच नियकालिकाचं पुढे 'डेली प्रजातंत्र' या दैनिकात रुपांतर झालं. 'झंकार' या मासिकाचे ते मुख्य संपादक होते. तसंच, 'द ईस्टर्न टाइम्स'चेही ते मुख्य संपादकही होते.
'गाव मजलिस' या हरेकृष्ण मेहताब यांच्या ग्रंथासाठी 1983 सालचा साहित्य अकादमी मिळाला होता. ओडिसा साहित्य अकादमी आणि संगीत नाटक अकादमीचे ते अध्यक्षही होते.
4) श्री प्रकाश
उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं जन्मलेले श्री प्रकाश हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. 1956 ते 1962 या काळात त्यांनी आधी मुंबई प्रांताचं आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानात भारताचे पहिले उच्चायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर आसामाचे राज्यपाल, मद्रास प्रांताचे राज्यपालही ते होते.
छोडो भारत आंदोलनावेळी 1942 ते 1944 दरम्यान श्री प्रकाश यांनी तुरुंगवासही भोगला.
5) पी. सुब्बरयन
परमसिवन सुब्बरयन अर्थात पी. सुब्बरयन हे स्वातंत्र्यसैनिक होते. 17 एप्रिल 1962 ते 6 ऑक्टोबर 1962 या कालावधीत महाराष्ट्राचे राज्यपाल राहिले.
भारताचे माजी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल पी. पी. कुमारमंगलम हे पी. सुब्बरयन यांचे वडील होत.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांना खूपच कमी कालावधी मिळाला. पदावर असतानाच त्यांचं निधन झालं.
6) विजयालक्ष्मी पंडित
28 नोव्हेंबर 1962 ते 18 ऑक्टोबर 1964 या कालावधीत विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे विजयालक्ष्मी पंडित यांचे भाऊ.
संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षाही होत्या.
7) पी. व्ही. चेरियन
वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणारे पी. व्ही. चेरियन हे निवृत्तीनंतर राजकारणात आले. मद्रास शहराचे महापौर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील पहिलं मोठं पद. नंतर ते राजकारणात अधिक सक्रीय झाले.
पुढे 1964 साली महाराष्ट्राचे राज्यपाल बनले. 1964 ते 1969 या कालावधीत ते महाराष्ट्राचे राज्यपाल राहिले. राज्यपालपदी असतानाच चेरियन यांचं निधन झालं.
8) अली यावर जंग
फेब्रुवारी 1970 ते डिसेंबर 1976 या दरम्यान अली यावर जंग हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. निजामाच्या सरकारमध्ये ते घटनात्मक विषय, गृह, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, स्थानिक सरकार या खात्यांचे मंत्री होते. 1947 साली त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.
अर्जेंटिना, इजिप्त, युगोस्लाव्हिया, फ्रान्स, अमेरिका या देशांमध्ये ते भारताचे राजदूतही होते.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी असतानाच म्हणजे 1976 साली त्यांचं मुंबईत निधन झालं.

फोटो स्रोत, Getty Images
9) सादिक अली
स्वातंत्र्यसंग्रामात सादिक अली यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. अनेकदा त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सादिक अली काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजकारणात सक्रीय झाले.
राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलंय. 1977 ते 1980 या कालावधीत ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. याच काळात महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग शरद पवारांच्या नेतृत्त्वात झाला होता.
10) एअर चीफ मार्शल ओ. पी. मेहरा
3 नोव्हेंबर 1980 ते 5 मार्च 1982 या कालावधीत ओ. पी. मेहरा हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. महाराष्ट्रासह त्यांनी राजस्थानचं राज्यपालपदही भूषवलंय.
सैन्यातील अनेक सर्वोच्च पदकांनी त्यांचा गौरव करण्यात आलाय. भारताच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने म्हणजेच पद्मविभूषण पुरस्कारानंही ओ. पी. मेहरा यांचा सत्कार करण्यात आलाय.
11) एअर चीफ मार्शल इद्रिस हसन लतीफ
इद्रिस हसन लतीफ हे 6 मार्च 1982 ते 16 एप्रिल 1985 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
1942 साली वायुदलात प्रवेश केलेल्या इद्रिस हसन लतीफ यांनी भारतीय वायुदलात 40 वर्षे सेवा केली.
12) कोना प्रभाकर राव
31 मे 1985 ते 2 एप्रिल 1986 या दरम्यान कोना प्रभाकर राव हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत कोना प्रभाकर राव यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात खादीच्या प्रसारासाठी काम करत, स्वातंत्र्यासाठी जनजागृतीचं काम ते करत असत.
महाराष्ट्रासह पद्दुचेरी, सिक्कीम या राज्यांचं राज्यपालपदही त्यांनी भूषवलंय.
13) शंकर दयाळ शर्मा
एप्रिल 1986 ते सप्टेंबर 1987 या कालावधीत शंकर दयाळ शर्मा महाराष्ट्राचे राज्यपाल होते. मूळचे मध्य प्रदेशातील असलेले शंकर दयाळ शर्मा यांनी भोपाळ राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं.
राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलंय.

फोटो स्रोत, Getty Images
14) ब्रह्मानंद रेड्डी
कासू ब्रह्मानंद रेड्डी यांची शंकर दयाळ शर्मांनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. 1988 ते 1990 या काळात त्यांनी राज्यपालपद भूषवलं.
1964 ते 1971 या कालावधीत ब्रह्मानंद रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 1974 ते 1977 या काळात म्हणजे आणीबाणीच्या काळात ते भारताचे गृहमंत्रीही राहिले.
15) सी. सुब्रमण्यम
फेब्रुवारी 1990 ते जानेवारी 1993 या काळात सी. सुब्रमण्यम हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
भारताचं कृषी धोरण तयार करण्यात सी. सुब्रमण्यम यांचा महत्त्वाचं योगदान मानलं जातं. केंद्रात त्यांनी अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्रिपदही भूषवलं होतं.
16) डॉ. पी. सी. अलेक्झांडर
डॉ. पी. सी. अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहिले. त्यांनी 1993 ते 2002 या कालावधी महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं.
17) मोहम्मद फझल
1999 ते 2002 या कालावधीत गोव्याचे राज्यपाल राहिलेल्या मोहम्मद फझल यांची नियुक्ती 2002 साली महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झाली. त्यांनी 2004 सालापर्यंत महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं. भारताच्या नियोजन आयोगाचे सदस्यपदही त्यांनी भूषवलं आहे.
18) एस. एम. कृष्णा
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांनी 2004 ते 2008 या कालावधीत महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं.
कर्नाटक आणि भारत सरकारमध्ये त्यांनी विविध मंत्रिपदं भूषवली. भारताच्या विविध समित्यांमध्येही त्यांनी महत्त्वाचं काम केलं.

फोटो स्रोत, Getty Images
19) एस. सी. जमीर
एस. सी. जमीर यांनी 2008 ते 2010 या कालावधीत महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं.
नागालँडच्या मुख्यमंत्रिपदाची धुराही त्यांनी सांभाळली. गुजरात, गोवा, ओडिशा या राज्यांचं राज्यपालपदही त्यांनी भूषवलं आहे.
20) के. शंकरनारायणन
2010 ते 2014 या कालावधीत के. शंकरनारायणन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. झारखंड आणि नागालँडचे राज्यपालपदही त्यांनी भूषवलंय.
जवळपास पाच दशकं ते राजकारणात सक्रीय आहेत.
21) सी विद्यासागर राव
30 ऑगस्ट 2014 ते 4 सप्टेंबर 2019 या कालावधी सी. विद्यासागर राव महाराष्ट्राचे राज्यपाल होते. तेलंगणातील भाजपचे वरिष्ठ नेते असलेले सी. विद्यासागर राव यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्रिपदही भूषवलं आहे. तसंच, वाजपेयी सरकारमध्ये केंद्रातील वाणिज्य, उद्योग या खात्यांचं राज्यमंत्रिपदही त्यांनी भूषवलंय.

फोटो स्रोत, Getty Images
22) भगतसिंह कोश्यारी
कोश्यारी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरूवात संघातूनच झाली.
कोश्यारींनी पत्रकारितेतही योगदान दिलंय. 1975 पासून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पियुष' या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखही लिहिले आहेत.
आणीबाणीविरोधात कोश्यारी यांनी आवाज उठवला होता. परिणामी त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. 3 जुलै 1975 ते 23 मार्च 1977 असे तीन वर्षे ते तुरुंगात होते.
उत्तर प्रदेशपासून 2000 साली वेगळं झालेल्या उत्तराखंड राज्यात भाजपची धुरा कोश्यारींच्या हाती देण्यात आली. ते उत्तराखंडचे पहिले भाजप प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर उत्तराखंड राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होण्याच मानही त्यांना मिळाला.
29 ऑक्टोबर 2001 ते 1 मार्च 2002 या कालावधीत कोश्यारींनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. मार्च 2002 ते नोव्हेंबर 2008 ही जवळपास सहा वर्षे ते उत्तराखंडच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
नोव्हेंबर 2008 साली कोश्यारी भाजपच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य झाले. राज्यसभेत असताना त्यांनी केंद्र सरकारच्या विविध समित्यांमध्ये काम केलं. फेब्रुवारी 2009 ते मे 2009 या कालावधीत कोशियारी हे केंद्राच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. तर ऑगस्ट 2009 पासून ते ऊर्जा समितीचेही सदस्य होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








