कोरोना व्हायरस: मुंब्रा पोलीस स्टेशन हॉटस्पॉट का बनतोय?

"आम्ही लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांना घराबाहेर पडू नका, असं सांगण्यासाठी दिवसरात्र झटतोय. पण आमच्या सुरक्षेचं काय? आज आमच्यातले 7 जण पॉझिटिव्ह आले आहेत, आमची टेस्ट तरी करा किंवा आम्हाला अलगीकरण कक्षात तरी करा."

ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यातील काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी मराठीकडे त्यांची ही कैफियत मांडली.

मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरिक्षकांसह एकूण 7 जणांना आता कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

"आम्हालाच जर कोव्हिड-19 झाला तर मग आम्ही लोकांची सुरक्षा कशी करणार?" असा सवाल इथले पोलीस कर्मचारी विचारतात.

मुंब्रा पोलीस ठाण्यात सध्या 156 जणांचा स्टाफ कार्यरत आहे.

5 एप्रिलला त्यांचे प्रमुख म्हणजेच मुंब्र्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिकला गेले. तिथं त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

हे वृत्त कळताच त्यांच्या संपर्कात आलेल्या 32 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतलं. त्यातल्या 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढच्याच आठवड्याभरात स्पष्ट झालं.

त्यानंतर मात्र ज्यांना ज्यांना भीती वाटली त्यांनी स्वतःच्या पैशांनी चाचण्या करून घेतल्या. त्यातल्या तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं इतर कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

"आम्ही त्यांच्या संपर्कात आलो होतो. त्यामुळे एकतर आमची चाचणी करा किंवा आम्हाला 14 दिवसांसाठी अलगीकरण कक्षात तरी ठेवा," अशी त्यांची मागणी आहे.

हे पॉझिटिव्ह आलेले तिन्ही जण एकाच युनिटमध्ये एकत्र काम करत होतो. शिवाय त्यांच्यात कुठलीही लक्षण नव्हती असं, पोलीस कर्मचाऱ्यांचं म्हणण आहे.

या पोलीस ठाण्यातील एक कर्मचाऱ्यानं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "स्टाफ सतत वेगवेगळ्या कारणांनी एकत्र येत असतो. सकाळ-संध्याकाळच्या हजेरीवेळी सर्वजण एकमेकांच्या संपर्कात येतात.

घाबरून आता काही जणांनी स्वतःच्या पैशींनी दोन-दोन वेळा चाचण्या केल्या आहेत. आता सतत चाचण्या करायला कुठून पैसे आणणार? रजेवर गेलेल्या माणसांच्या जागी नवी माणसं आली आहेत, पण त्यांना पण भीती वाटते. ते आमच्या संपर्कात येतच आहेत ना."

पॉझिटिव्ह आलेल्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या जागी प्रशासनानं कन्हैय्या थोरात यांना पाठवलं आहे. या संर्भात थोरात यांच्याशी बीबीसीनं संपर्क केला.

"आतापर्यंत आपण 47 जणांची चाचणी आम्ही केली आहे. एका एनजीओची त्यासाठी मदत घेण्यात आली आहे. इतरही लोकांची आपण करू," असं त्यांनी स्पष्ट केलं

"तसंच PPE किट मिळाले आहेत, जसे ते येत आहेत तसे ते कर्मचाऱ्यांना देत आहोत. कर्मचाऱ्यांना मी स्वतःच्या पैशांनी 35 लीटर सॅनिटायझर आणि 1000 मास्क आणून दिले आहेत. हँडग्लोव्ह्जही देत आहोत. शिवाय प्रशासन, महापालिका आणि वेगवेगळ्या एनजीओकडून या गोष्टी उपलब्ध होत आहेत," असं थोरात पुढे सांगतात.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी याबाबत बीबीसी मराठीनं संपर्क केला आहे. त्यांचं उत्तर आल्यानंतर त्यांची बाजू इथं मांडली जाईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)