कोराना व्हायरस : उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 5 प्रमुख मुद्दे

मुंबईतील लोकल आणि बस सध्या बंद होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

पण 31 मार्च पर्यंत राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्याचा निर्णय सकारनं घेतल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. शिवाय काम बंद राहीलं तरी खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचं वेतन कापू नये आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 5 प्रमुख मुद्दे -

  • 31 मार्च पर्यंत राज्यातल्या मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या चार शहरांमधील खासगी ऑफिसेस आणि दुकानं बंद राहतील. काम बंद राहिलं, तरी खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचं वेतन कापू नये.अत्यावश्यक सेवा, अन्नधान्याची, दुधाची आणि औषधांची दुकानं मात्र सुरू राहतील.
  • अनेकांनी मला सांगितलं की मुंबईतल्या बस आणि लोकल बंद करा. रेल्वे, बस बंद करणं सोपं आहे, पण अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय करणार, त्यांची ने-आण कशी होणार, असा प्रश्न आहे. सध्या या दोन सेवा बंद न करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय.
  • काल आम्ही 50 टक्के शासकीय कर्मचारी दररोज काम करतील असं म्हटलं होतं, आज मात्र शासकीय कार्यालयात दररोज 25 टक्केच कर्मचारी काम करतील, असा निर्णय घेतला आहे.
  • नाईलाजापोटी काही पाऊलं उचलावी लागत आहेत. तुमचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा आहे. या उपाय योजनांनतरही बस आणि रेल्वेमधील गर्दी कमी झाली नाही, तर नाईलाजानं एक पाऊल पुढे टाकावं लागेल.
  • राज्य सरकारनं ज्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले, त्यातील 5 जण व्हायरसमुक्त झाले आहेत. ही समाधानाची बाब आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)