शिवसेना आणि काँग्रेसमधील संबंधांचा 'असा' आहे इतिहास

फोटो स्रोत, DOUG CURRAN/getty
काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.
बाळासाहेब ठाकरे हयात असताना आणि त्यांच्यानंतर, अशा दोन काळांमध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातले संबंध कसे राहिले आहेत, याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.
कारण, काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवर यथेच्छ तोंडसुख घेणारी शिवसेना आता काँग्रेसबरोबर कसं सरकार स्थापन करेल, असा प्रश्न आज अनेकांना पडू शकतो. पण हे चित्र अगदी अलीकडचं आहे.
शिवसेना आणि काँग्रेस यांचं नातं, विशेषतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे अनेक नेते यांचे चांगले संबंध होते. शिवसेनेच्या स्थापनेच्या आधीपासून ठाकरे यांचे काँग्रेसच्या नेत्यांशी चांगले संबंध होते.
मार्मिक आणि यशवंतराव चव्हाण
1960 साली बाळासाहेब ठाकरे यांनी 'मार्मिक' या व्यंगचित्र साप्ताहिकाची स्थापना केली. या साप्ताहिकाच्या पहिल्याच अंकाचं उद्घाटन काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालं होतं. आता संयुक्त महाराष्ट्रवादी व्यंगचित्रकारानं म्हणजेच बाळासाहेबांनी आपल्या साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचं उद्घाटन काँग्रेसच्या नेत्याकडून केलं, याबद्दल नाराजी व्यक्त केली गेली.
तुम्ही टोपी फिरवून काँग्रेसवाले झालात काय, असं विचारणारं एक पत्रच 'मार्मिक'मध्ये प्रसिद्ध झालं होतं. या पत्राला बाळासाहेबांनी दिलेलं उत्तर प्रकाश अकोलकर यांनी लिहिलेल्या 'जय महाराष्ट्र' या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. "व्यंगचित्रकाराला कधीही टोपी नसते. तुम्ही मात्र उगाच डोके फिरवलेत. आम्ही संयुक्त महाराष्ट्रवादी आहोत; पण यशवंतराव हेही महाराष्ट्राचे नेते आणि तरुण कर्तृत्वशाली पुरुष आहेत," असं ते उत्तर होतं.

फोटो स्रोत, Madhukar Bhave
'मार्मिक'मधून बाळासाहेब ठाकरे काँग्रेस सरकारचा, नेत्यांचा उदोउदो करतात, असा आरोप अनेकदा होत राहिला. 'मार्मिक'नं एक वर्ष पूर्ण केल्यानंतर साप्ताहिक 'विवेक'नं आपल्या अंकात 'मार्मिक हे सरकारचं ढोल बडवणारं पत्र आहे,' अशी टीका केली होती. त्यावरही स्पष्टीकरण देताना बाळासाहेब ठाकरे यांनी 'आम्ही केव्हा केव्हा यशवंतरावांचा गौरव जरूर केला, पण वेळोवेळी आम्ही सरकारवर मर्मभेदी टीकाही केली आहे,' असं लक्षात आणून दिलं.
परंतु 'मार्मिक'च्या वर्धापन दिनाला वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई अशा नेत्यांची उपस्थितीही लाभत गेली.
वसंतराव नाईक यांच्याशी मैत्री
त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे काँग्रेसच्या आणखी एका मोठ्या नेत्याशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते, ते म्हणजे वसंतराव नाईक.
नाईक मुख्यमंत्री झाल्यानंतर 'मार्मिक'मधून 'महाराष्ट्र हे आदर्श राज्य करून दाखवू, अशी इच्छा बाळगणारे मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत,' असं कौतुकाच्या शब्दांनी त्यांचं स्वागत बाळासाहेबांनी केलं होतं.
शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर मुंबईतलं कम्युनिस्टांचं वर्चस्व हटवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला मदत करते, असा आरोप होत राहिला. शिवसेनेला 'वसंतसेना' म्हणेपर्यंत ही टीका व्हायची.
शिवसेनेने 1967 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार स. गो. बर्वे यांना पाठिंबा दिला होता. माजी संरक्षणमंत्री व्ही. के. मेनन यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर मेनन यांनी ही निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत मेनन यांना कम्युनिस्टांचा आणि बर्वेंना शिवसेनेचा पाठिंबा मिळाला.

फोटो स्रोत, Hindustan Times/getty
पुढे मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात शिवसेना आल्यानंतरही शिवसेना आणि काँग्रेस यांचे संबंध चांगले राहिले. 1973 साली तेव्हाच्या मुंबई मध्य मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत कम्युनिस्ट नेत्या रोझा देशपांडे यांच्याविरोधात काँग्रेसचे रामराव आदिक निवडणूक लढवत होते. शिवसेनेने या निवडणुकीत आपला उमेदवार दिला नाही आणि आदिक यांना पाठिंबा दिला.
आणीबाणीचा काळ
पुढे 1975 साली देशात आणीबाणी लागल्यानंतर 'मार्मिक'वरही बंदी घालण्यात आली. त्या काळात शिवसेना दोन दिवसात बंद करून दाखवतो, अशी भाषा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष रजनी पटेल यांच्याकडून वापरली जायची. 'मार्मिक'वरील बंदी उठवावी, अशी मागणी करण्यासाठी शिवसेनेचे तेव्हाचे नेते डॉ. हेमचंद्र गुप्ते, मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हे संजय गांधी यांना भेटायला दिल्लीला गेले.

फोटो स्रोत, Getty Images
प्रकाश अकोलकर यांनी या भेटीचं वर्णनही आपल्या पुस्तकात केलं आहे. या भेटीनंतर रजनी पटेल यांची भाषा बदलल्याचं त्यांनी लिहिलं आहे.
1977 साली मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी अचानक काँग्रेसचे नेते मुरली देवरा यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे शिवसेनेचे पहिले महापौर डॉ. हेमचंद्र गुप्ते यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला.
बॅ. अंतुले यांना मदत
आता हे सगळं झाल्यावर शिवसेनेने 1980 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार न लढवण्याचा समझोता काँग्रेसशी केला. त्याबदल्यात शिवसेनेच्या दोन नेत्यांना म्हणजे वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर यांना विधानपरिषदेत जाण्याची संधी मिळाली.

फोटो स्रोत, Getty Images
याचवर्षी मुख्यमंत्री झालेल्या बॅ. अब्दुल रहमान अंतुले यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेनेने प्रचार केला. इतकंच नाही तर या प्रचाराच्या सांगता सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि रामराव आदिक प्रमुख वक्ते होते.

फोटो स्रोत, Getty Images
आता अलीकडच्या राष्ट्रपतिपदाच्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेची भाजपाशी युती असूनही काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचं तुम्हाला माहिती असेल.
प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता. 'द कझिन्स ठाकरे' या पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी यांच्यामते "प्रतिभा पाटील यांच्या घराण्याचे आणि ठाकरे घराण्याचे पूर्वीपासूनचे संबंध होते. प्रतिभा पाटील यांचे काका रावबहादूर डोंगरसिंह पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे चांगले संबंध होते. कदाचित त्यामुळेही बाळासाहेब ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असावा."

फोटो स्रोत, Getty Images
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी 'टाइम' मॅगझीनच्या धरतीवर एक मासिकही काढले होते, परंतु ते चालू शकले नाही," अशीही माहिती धवल कुलकर्णी देतात.
प्रतिभा पाटील यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतिपदी निवडणुकीतही शिवसेनेने पाठिंबा दिला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








