राम मंदिर : अयोध्येत बाबरी मशिदीच्या खाली 'तेव्हा' पुरातत्त्व खात्याला काय आढळलं होतं?

बाबरी मशीद

फोटो स्रोत, K K MUHAMMED

    • Author, सलमान रावी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अयोध्येत बाबरी मशिदीच्या खाली 'तेव्हा' पुरातत्त्व खात्याला बऱ्याच गोष्टी सापडल्या होत्या. त्याचा घेतलेला हा आढावा.

मंदिरं तोडून बाबरी मशीद बांधली गेली होती का? ती मंदिरांच्या अवशेषांवर मशीद बांधली गेली होती का? अशाच काही प्रश्नांची उत्तरं सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणावर निर्णय देताना दिली होती.

"बाबरी मशीद मीर बाकीने बनवली होती. ती वास्तू काळ्या रंगाच्या स्तंभांवर उभी होती. खाली सापडलेला भाग पाडला गेला होता, असं पुरातत्त्व विभागाने म्हटलं नव्हतं," असं सुप्रीम कोर्टाने हा निकाल देताना तेव्हा स्पष्ट केलं होतं.

"पुरातत्त्व विभाग एक विश्वासार्ह संस्था आहे, त्यांच्या निरीक्षणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही," असंही कोर्टाने पुढे म्हटलं आहे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच 'आर्कियालॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया'चे तेव्हाचे महासंचालक बी. बी. लाल यांनी पहिल्यांदा राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जमिनीची पुरातत्त्व विभागातर्फे पाहणी केली होती. तेव्हा त्या पथकात के. के. मोहम्मद हेदेखील होते.

ही गोष्ट आहे 1976-77ची. मोहम्मद यांनी अलीगढ मुस्लिम विश्वविद्यापीठातून (AMU) इतिहास या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून 'स्कूल ऑफ आर्कियॉलॉजी'मध्ये शिकायला सुरुवात केली होती.

एक विद्यार्थी म्हणून ते या पाहणीमध्ये सहभागी झाले होते.

ज्या जागेची पुरातत्त्व विभागातर्फे पाहणी करण्यात आली होती तिथून 'प्राचीन मंदिरांचे' अवशेष मिळाले होते, असं म्हणत काही वर्षांनी के. के. मोहम्मद यांनी सगळ्यांनाच धक्का दिला होता.

हिंदू मंदिराचे अवशेष?

हे अवशेष हिंदू मंदिराचे आहेत, असं ठामपणे म्हणणं कठीण असल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. इथे जैन किंवा बौद्ध मंदिर असण्याची शक्यताही फेटाळली जाऊ शकत नाही, असं काही पुरातत्त्व शास्त्रज्ञ म्हणतात.

त्यापूर्वी बी. बी. लाल यांनीही आपल्या अहवालात ही गोष्ट नमूद केली होती. पण के. के. मोहम्मद यांच्या या वक्तव्याने सगळ्या वादाला एक नवीन वळण मिळालं. कारण एकतर ते मुसलमान होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून इतिहास विषयात पदवी घेतलेली होती.

सत्तरच्या दशकाच्या अखेरीस करण्यात आलेल्या पाहणीवर के. के. मोहम्मद आजही ठाम आहेत.

पहिली पाहणी सत्तच्या दशकात झालेली असली तर 2003मध्ये जी पाहणी झाली, त्यामध्येही भारतीय पुरातत्त्व खात्यात काम करणारे तीन मुसलमान सहभागी झाले होते, असं मोहम्मद यांचं म्हणणं आहे.

के. के. मोहम्मद हे काही वर्षांपूर्वीच भारतीय पुरातत्त्व खात्याच्या उत्तर भारत विभागाच्या संचालक पदावरून निवृत्त झाले असून सध्या ते केरळ मधल्या कोळीकोडमध्ये राहतात.

अयोध्या

फोटो स्रोत, KK MUHAMMED

फोटो कॅप्शन, उत्खननात मिळालेली काही शिल्पं

मंदिराची निर्मिती करण्यासाठी ही जमीन हिंदू पक्षकारांकडे सोपण्याची एक चांगली संधी बाबरी मशीद अॅक्शन कमिटीकडे होती, असं के. के. मोहम्मद यांनी बीबीसीशी फोनवरून बोलताना सांगितलं.

दोनदा झालेल्या पुरातत्त्व पाहण्याचं विश्लेषण करताना के. के. मोहम्मद म्हणतात, की वादग्रस्त ठिकाणी जी लांब भिंत आणि जे घुमटासारखं बांधकाम आढळलेलं आहे ते इस्लामिक पद्धतीचं नाही. यामध्ये मूर्ती असल्याने हे इस्लामिक प्रार्थनास्थळाचे अवशेष असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ASI या जागेची पाहणी करत असताना सापडलेल्या 'मगर कालीन' मूर्तीच्या अवशेषांचा उल्लेखही ते करतात.

याशिवाय मातीच्या अनेक मूर्ती आणि इतर गोष्टींचे अवशेष या पाहणीत आढळल्याचंही ते सांगतात. दिल्लीमध्ये कुतुबमिनार जवळ असणाऱ्या मशिदीत असणाऱ्या शिलालेखांशी साधर्म्य असणारे शिलालेख या खोदकामादरम्यान सापडले असून हे 10व्या शतकातले शिलालेख असल्याचा दावा के. के. मोहम्मद करतात.

पुरातत्त्व विभागाच्या या मंदीर-मशीद वादाशी निगडीत दोन्ही पाहणींविषयी अनेक इतिकासकारांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी या पाहण्या केल्याचा त्यांचा आरोप आहे.

सुन्नी वक्फ बोर्डानेही याविषयी आरोप केला होता. पुरातत्त्व हे एक परिपूर्ण विज्ञान नसून यामध्ये दाखले देत वा काही गोष्टी गृहीत धरण्यावर जोर दिला जात असल्याचा सुन्नी वक्फ बोर्डाचा आरोप होता.

अयोध्या

फोटो स्रोत, KK MUHAMMED

सुन्नी वक्फ बोर्डाने या पुरातत्त्व सर्वेक्षण प्रकरणी दोन स्वतंत्र पुरातत्त्व तज्ज्ञांना सहभागी करून घेतलं होतं. यात होत्या सुप्रिया विराम आणि जया मेनन.

पुरातत्व खात्याने केलेल्या पाहणीविषयी एक स्वतंत्र शोधपत्र प्रसिद्ध करत या दोन्ही पुरातत्त्व तज्ज्ञांनी काही शंका मांडल्या आहेत. ASIची पाहणी सुरू असताना या दोघीही तिथे उपस्थित होत्या.

पण अशा शंका उपस्थित करणारे डाव्या विचारसरणीने प्रभावित असल्याचा आरोप के. के. मोहम्मद करतात. इथे असणाऱ्या अवशेषांतील भिंती या पूर्वी या जागी असलेल्या 10व्या शतकातल्या एका देवळाच्या असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

10व्या आणि 12व्या शतकात आणि त्यानंतर भारतात आलेल्या प्रवाशांचा संदर्भ ते म्हणतात की या सगळ्या प्रवाशांनी आपापल्या यात्रा वृत्तांतामध्ये अयोध्येतल्या या वादग्रस्त ठिकाणी हिंदू पद्धतींनी पूजा-अर्चा होत असल्याचं नमूद केलं आहे.

विल्यम फिंच आणि जोसेफ टॅफिनथलर यांचा संदर्भ के. के. मोहम्मद देतात. सोबतच या वादग्रस्त ठिकाणी भगवान रामाची पूजा होत असल्याचा उल्लेख मुघल बादशाह अकबर यांच्या 'दरबारनाम्यात' म्हणजे त्यांच्या दरबारातले इतिहासकार अबू फजल यांनी फारसीत लिहीलेल्या 'आईन-ए-अकबरी' मध्येही असल्याचं मोहम्मद म्हणतात.

1607 ते 1611 या वर्षांच्या दरम्यानच्या कालावधीत फिंच भारतात आले होते तर जोसेफ हे 1766 आणि 1771 दरम्यान भारत प्रवासाला आले होते.

अयोध्या

फोटो स्रोत, KK MUHAMMED

अनेक प्राचीन ऐतिहासिक दस्तावेज शोधून त्यांचं संरक्षण करण्याचं श्रेय के. के. मोहम्मद यांना दिलं जातं. आग्रातील फत्तेपूर सिक्रीमध्ये ज्या ठिकाणी मुघल बादशाह अकबरने 'दीन-ए-इलाही' या धर्माची सुरुवात केली होती, त्या जागेचाही यात समावेश आहे.

यासोबतच मध्य प्रदेशातील मुरैना जवळच्या बटेश्वरमध्ये गुज्जर राजवटकालीन मंदिरांच्या अवशेषांचा शोध तर त्यांनी लावलाच. पण इतकंच नाही तर पूर्णपणे उद्धव्सत झालेल्या 200 देवळांपैकी 70 देवळांची पुनर्बांधणीही त्यांनी केली.

या मंदिरांच्या आसपास स्फोट घडवून खाणमाफिया इथल्या दगडांची तस्करी करत असत. म्हणून त्यांच्यापासून देवळांचं संरक्षण करण्यासाठी के के मोहम्मद यांनी तिथल्या डाकूंची मदत घेतली होती.

छत्तीसगढमधल्या नक्षलग्रस्त बस्तरमधल्या दांतेवाडा जवळच्या बारसूर आणि सामलूर मंदिरांच्या संवर्धनाचं कामही त्यांनीच केलं होतं. बिहारच्या केसरिया आणि राजगीरमधील बौद्ध स्तूपांच्या शोधाचं श्रेयही के के मोहम्मद यांनाच दिलं जातं.

त्यांच्या कामासाठी 2019मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. 2016 साली त्यांनी आत्मचरित्र लिहिलं. त्याचं नाव आहे 'नजान इन्ना भारतीयन'. म्हणजे - 'मी - एक भारतीय'.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)