पवनराजे निंबाळकर खून: पद्मसिंह पाटील आरोपी असलेलं प्रकरण नेमकं काय आहे?
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
उस्मानाबादचे खासदार राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांच्यावर चुलतबंधू पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाची चर्चा राज्यभरात होत आहे. हे प्रकरण काय आहे याबाबत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू.
पद्मसिंह पाटील यांचे वकील अॅड. भूषण महाडीक यांनी मात्र या हत्याकांडाशी पद्मसिंहांचा संबंध नसल्याचं म्हटलंय. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं त्यांचं म्हणण आहे.
2004 च्या विधानसभा निवडणुका सुरू होत्या. राज्याचं सगळं लक्ष उस्मानाबाद मतदारसंघाकडे लागलेलं होतं. आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांच्याविरुद्ध त्यांचेच चुलत बंधू पवनराजे निंबाळकर उभे राहिले होते.
पद्मसिंह राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तर पवनराजे शिवसेनेच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे होते. पवनराजे निंबाळकर यांनी पहिल्यांदाच पाटील यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं. एका मंत्र्यासमोर त्याचा भाऊच उभा होता.
राजकीय कुरघोडी
पवनराजे आणि पद्मसिंह यांच्यातल्या राजकीय कुरघोडीचा एक किस्सा ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव सांगतात, "तेरणा साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर पद्मसिंह आणि पवनराजे या दोघांमध्ये प्रचंड वैर निर्माण झालं होतं. राजकीय लढाईने त्यांच्यातील वितुष्टाने टोक गाठलं. या लढाईत कोण जिंकतं हे पाहण्याची उत्सुकता होती. मतदानाचा दिवस उजाडला. असं सांगितलं जातं की, उस्मानाबाद मतदारसंघातील प्रत्येक घरात एका दैनिकाचा अंक येऊन पडला. यामध्ये ठळक अक्षरात एक बातमी होती. 'डॉ. पद्मसिंह पाटील यांना पवनराजे निंबाळकरांचा पाठिंबा?"

फोटो स्रोत, facebook
"या बातमीमध्ये प्रश्नचिन्ह होतं पण या बातमीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. डॉ. पाटील तेव्हा तेर इथं मतदान करण्यासाठी गेले होते. त्यांना पत्रकारांनी गाठलं. तेव्हा असं काहीच नसल्याचं पाटलांनी स्पष्ट केलं. निंबाळकर यांचे कार्यकर्तेही मतदारांमधला संभ्रम दूर करण्यासाठी दिसेल त्या बसवर, रिक्षांच्या काचांवर याचा खुलासा करणारे संदेश लिहू लागले. 'पवनराजेंनी पद्मसिंह पाटलांना पाठिंबा दिलेला नाही. रेल्वे इंजिन चिन्हालाच मत द्या!"
या बातमीची चर्चा अनेक दिवस रंगली होती असं जाधव सांगतात.
मंत्रिपद गमावलं
अर्थातच निवडणूक रंगतदार झाली. याआधी सलग सहावेळा उस्मानाबाद मतदारसंघावर वर्चस्व राखून असलेल्या पद्मसिंह पाटलांनीच यावेळी विजय मिळवला. पण त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहिला तर हा विजय त्यांच्या राजकीय इतिहासाला साजेसा नव्हता. या निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील केवळ अल्पमतांनी विजयी झाले.
2004च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. यावेळीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचंच सरकार राज्यात बनलं. पण यावेळी पद्मसिंह पाटलांना मंत्रिपद देण्यात आलं नाही.

फोटो स्रोत, facebook
यादरम्यान, पवनराजे यांनी पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचं वेगळं राजकारण सुरू होतं. मात्र, 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पवनराजे मोटारीतून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात पवनराजे आणि त्यांचे वाहनचालक या दोघांचाही मृत्यू झाला. यात सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना 2009 मध्ये अटक केली होती.
पवनराजेंना सत्तेची महत्त्वाकांक्षा?
ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव सांगतात, "आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयाची जबाबदारी होती. जबाबदारी आल्यानंतर डॉक्टरांच्या कामाचा व्याप वाढला. त्यापेक्षाही ते मुंबईत जास्त रमले. पण मंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांचा मतदारसंघातील संपर्क थोडाफार कमी झाला. तिथली जबाबदारी त्यांनी पवनराजे यांच्याकडे दिली. त्यामुळे एखाद्याच्या लग्नाला, कार्यक्रमाला किंवा अंत्ययात्रेला पवनराजे पद्मसिंह पाटलांचे प्रतिनिधी म्हणून जाऊ लागले. त्यामुळे तिथं पवनराजेंचं प्रस्थ वाढू लागलं."

फोटो स्रोत, facebook
उस्मानाबादचे काँग्रेसचे स्थानिक नेते आणि माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील सांगतात. "पद्मसिंहांचा पवनराजेंवर प्रचंड विश्वास होता. ते कारखान्याचे अध्यक्ष असताना त्यांनी संपूर्ण कारभार पवनराजेंकडे सोपवला होता. राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे दोन्ही नेत्यांमध्ये वितुष्ट आलं. ते इतकं टोकाला गेलं की दोन्ही नेते एकमेकांना पाण्यात पाहू लागले. आपल्या जवळचा माणूस अशा प्रकारे दूर गेल्यांतर कोणत्याही व्यक्तीला त्याची खंत वाटणं सहाजिकच आहे. पण याचा अर्थ त्यांनीच खून केला असा होत नाही. त्याचा निर्णय न्यायालय घेईल."
ते पुढे सांगतात, "पवनराजे यांचा खून झाल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. मागच्या 14 वर्षांत उस्मानाबादचं राजकारण पूर्णपणे बदललं आहे. तेरणा साखर कारखानाही आता बंद पडला आहे. पवनराजे यांचे चिरंजीव ओमराजे यांनीही विधानसभेत राणा जगजितसिंह आणि 2019च्या लोकसभेत पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला आहे."
पद्मसिंहांनी आरोप फेटाळले
संशयाची सुई पद्मसिंह पाटील यांच्यावर होती. सुरुवातीला महाराष्ट्र पोलिसांकडे हे प्रकरण होतं. पण निंबाळकर कुटुंबीयांनी हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी लावून धरली. दोन वर्षांनंतर तपासाची सूत्रे सीबीआयकडे देण्यात आली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
"सीबीआयच्या आरोपपत्रात पवनराजेंचा आपल्या राजकीय भवितव्याला धोका असल्याचं पद्मसिंह पाटील यांना वाटत होतं. म्हणून त्यांनीच पवनराजेंच्या खूनाचा कट रचला. यासाठी त्यांनी तीस लाखांची सुपारी दिली, असं या आरोपपत्रात म्हटलं."
पण पद्मसिंहांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं त्यांचे वकील अॅड. भूषण महाडीक सांगतात.
अॅड. भूषण महाडीक सांगतात, "पद्मसिंह पाटील यांनी पवनराजे यांना राजकारणात आणलं. त्यांना मोठं केलं. पद्मसिंह पाटील यांनी आपल्या सख्ख्या भावापेक्षाही जास्त त्यांचे चुलत भाऊ असणाऱ्या पवनराजेंना प्रेम दिलं. त्यामुळे ते त्यांच्या खूनाचा विचार करू शकत नाहीत. बँक, कारखाना घोटाळ्यात पद्मसिंह पाटील यांचा काहीही संबंध नव्हता. त्यांनी हे पूर्वीच पवनराजेंना सोपवलेले असल्यामुळे हे प्रकरण त्यांनीच पाहून घ्यावं, असं त्यांचं म्हणणं होतं."
यानंतर अण्णा हजारेंनी पद्मसिंह पाटलांविरुद्ध तक्रार दाखल केली. मला मारण्याचा कट पाटलांनी रचला होता असं त्यांनी तक्रारीत म्हटलं, पण हे प्रकरण पुराव्याअभावी पुढे जाऊ शकलं नाही. सध्या हे न्यायप्रविष्ठ आहे.
"पवनराजे हत्याकांडाचा खुलासा करणाऱ्या पारसमल जैन यांनी पवनराजे यांच्या हत्येबरोबरच समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची 30 लाख रुपयांची सुपारी डॉ. पद्मसिंह पाटलांनी दिली होती, असा जबाब सीबीआयने नोंदवला. पण फक्त या जबाबावर पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप करणं चुकीचं आहे." असं अॅड. महाडीक सांगतात.

फोटो स्रोत, facebook
महाडीक पुढे सांगतात, "सीबीआयकडे फक्त एक कबुली जबाब होता. यातील त्रुटी जामीन अर्जावेळी दर्शवून देण्यात आल्या. सीबीआयने तपासाला उशीर केला. तो का झाला हा प्रश्नच आहे. पुढे अण्णा हजारेंची साक्षही फेटाळण्यात आली आहे. या प्रकरणी नोव्हेंबर 2009 मध्येच डॉ. पाटील यांना जामीन मिळालेला आहे. यामध्ये कोणताही आरोप सिद्ध होणार नाही, हे त्यांनाही माहीत आहे. "
पवनराजे खूनप्रकरणाला यावर्षी 13 वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षातही याची सुनावणी संथगतीने सुरू आहे. अजूनही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून पवानराजेंचा खून कुणी केला, या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत मिळू शकलेलं नाहीये.
हेही वाचलंत का?
उदयनराजेंबद्दल तटकरे काय म्हणाले?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








