विधानसभा निवडणूक: देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप नेते रावसाहेब दानवेंचं खळबळजनक विधान, काँग्रेसची टीका

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

काँग्रेस-राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षात जे नेते येतात त्यांना आम्ही वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ करून घेतो असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.

जालना येथे महाजनादेश यात्रेत बोलताना ते म्हणालेत, "ही भारतीय जनता पार्टी आहे. आमच्याजवळ वॉशिंग मशीन आहे. आमच्यात आला की त्याच्यात टाकतो, स्वच्छ धुतो आणि मग आमच्या लायनीत उभा करतो. या वॉशिंग मशीनमध्ये गुजरातचं निरमा वॉशिंग पॉवडर टाकतो तेव्हा तो माणूस स्वच्छ होतो आणि मग आपल्या पार्टीत त्याला घेतो."

'ही तर दानवेंची कबुली'

काँग्रेसनं रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की दानवेंनी कबूल केलं आहे की ते डागाळलेल्या नेत्यांना पक्षात घेत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी म्हटलंय की, "सगळ्यांत पहिली गोष्ट की रावसाहेब दानवेंनी कबूल केलंय की त्यांच्या पक्षात आल्यानंतर सगळ्या गोष्टी स्वच्छ होतात. याचा अर्थ असा की जे अस्वच्छ आहेत इतर पक्षातले, ज्यांच्यावर डाग आहेत, ज्यांना साम दाम दंडभेद घेऊन त्यांना आपल्या पक्षात घेण्याचे ठरवले आहे.

"फक्त निवडून येण्याची क्षमता आणि त्यांनाव दाखवलेली दहशत याच्या जोरावर त्यांना घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यांना घ्यायचं, त्यांची पापं सगळी साफ करायची, त्यांच्या फाईल साफ करायच्या, त्यांच्यावर जे काही गुन्हे लादण्याचा प्रकार आहे तो नष्ट करायचा, त्यांना कर्ज वगैरे द्यायचं, ही एकप्रकारे स्वच्छताच झाली," वाघमारे सांगतात.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter / bjp4maharashtra

ते पुढे म्हणाले की, "ही स्वच्छता गुजरातच्या निरमा पॉवडरकडून करतात म्हणजे ते मोदी आणि अमित शाहांकडून करतात ती स्वच्छता. अमित शहांकडे गृह मंत्रालय आहे. त्यामुळे या लोकांची स्वच्छता करायची म्हणजे त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यायचे. कर्जबाजारी असतील तर त्यांना त्यातून बाहेर काढायचे आणि त्यांना साफ करून पक्षात घेतात. दानवेंनी कबुली दिलेली आहे की काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्यांचं चारित्र्य आम्ही स्वच्छ करतो, त्यांच्यावर लागलेले कलंक दूर करतो आणि आमच्या पक्षात घेतो. आम्ही जे सांगत आलो आहोत की हे साम, दाम, दंड, भेद याचा वापर करतात त्याची त्यांनी दिलेली ही कबुली आहे."

देवेंद्र फडणवीस

'शब्दश: अर्थ घेऊ नका'

भारतीय जनता पक्षानं याबाबत प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवेंनी जे वक्तव्य केलेलं आहे , त्याचा शब्दश: अर्थ घेऊ नये. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी म्हटलं की, "आम्ही भाजपमध्ये जेव्हा प्रवेश देतो, तेव्हा आहे तसा घेतो आणि हवा तसा घडवतो हे आमच्या पक्षाचे धोरण आहे. आमच्या पक्षात आल्यानंतर आमची विचारधारा, आमची कार्यपद्धती त्यांना स्वीकारावी लागते. जे कार्यकर्ते आमची कार्यपद्धती, विचारधारा स्वीकारतात तेच आमच्या पक्षात राहतात. कोणी कितीही मोठा कार्यकर्ता आमच्या पक्षात आला तर त्यासाठी पक्षाच्या धोरणात आम्ही बदल करत नाही. ज्यांना कोणाला आमची विचारधारा पटत असेल, आमच्या नेत्यांचं नेतृत्व पटत असेल ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात. त्यामुळे रावसाहेब दानवेंनी वॉशिंग मशीन हा शब्द जो वापरला आहे त्याचा शब्दश: अर्थ घेऊ नये."

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, "रावसाहेब दानवे हे अत्यंत फटकळ गृहस्थ आहेत. त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळामध्ये आपली अशीच प्रतिमा तयार केली होती. अनेकवेळा ते त्यामुळे अडचणीतही आले. पण त्यांचा तो मूळ स्वभाव आहे. भाजप जर वॉशिंग मशीन असेल तर याच वॉशिंग मशीनमध्ये कितीही डाग असलेल्यांना धुवून घेतील असं दिसतंय. जे या वॉशिंग मशीनमध्ये जायला तयार होणार नाहीत, ते आपल्याला डागाळलेले दिसतील."

अनेक नेते भाजपमध्ये

भाजपमधील पक्षप्रवेश

2014 च्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे इनकमिंग सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात राहिलेले बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित, नारायण राणे, विजयसिंह मोहिते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड हे सध्या भारतीय जनता पक्षासोबत आहेत. माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून गणेश नाईकांच्या प्रवेशाचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर सचिन अहिर, जयदत्त क्षीरसागर हे नेते भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेसोबत आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मधुकर पिचड आणि वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ या नेत्यांना नुकताच भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.

गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असलेल्या अनेकांना महापालिका निवडणुकांमध्ये भाजपनं पक्षात प्रवेश दिला अशी टीकाही वेळोवेळी झालेली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)