टिकटॉक: एका व्हीडिओ अॅपवरचे 'हे' स्टार्स का सापडले आहेत वादात?

Mr_Faisu_07

फोटो स्रोत, Mr_Faisu_07

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुदस्सर फैसल शेख उर्फ 'मिस्टर फैसु', शादान फारुकी उर्फ 'सद्दू' आणि हसनैन खान. तुम्ही टिक टॉक किंवा इन्स्टाग्रामचा अगदी नेहमी वापर करत असाल तर ही नावं कदाचित तुमच्या ओळखीची असतील. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमुळे हे सर्वजण सध्या वादात सापडले आहेत.

मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून तिघांची टिकटॉक प्रोफाईल्सही काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत.

झारखंडमध्ये मॉब लिंचिंगमध्ये मारल्या गेलेल्या तबरेझ अन्सारीविषयी वादग्रस्त व्हीडिओ शेअर करून सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप तिघांवर आहे. शिवसेनेच्या आयटी सेलच्या सदस्यानं केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.

आपल्याला कुणाला दुखवायचं नव्हतं असं स्पष्टीकरण या तिघांनी दिलं आहे. तसंच हे तिघं केवळ करमणुकीसाठी व्हीडिओ तयार करत असल्याचं त्यांचे चाहतेही सांगत आहेत.

नेमकं हे प्रकरण काय आहे, हे पाहण्याआधी हे तिघं कोण आहेत हे जाणून घेऊया.

टिकटॉक स्टार्स

विशीतले हे तिघं जणं 'TEAM 07' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या ग्रुपचे सदस्य आहेत. हा पाच तरूणांचा ग्रुप आहे. भारतातल्या सर्वात मोठ्या टिकटॉक influencers म्हणजे प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला जातो.

फैसल आणि शादान 23 वर्षांचे आहेत तर हसनैन 21 वर्षांचा आहे. त्यांच्या या Team 07 मध्ये अदनान शेख आणि फैझ बलोच या आणखी दोघा influencers चाही समावेश आहे. बाईक रायडिंग, मॉडेलिंग, फिरणं या समान आवडी-निवडींमुळं त्यांची मैत्री झाली. हे सगळेजण कॉलेजपासून एकमेकांचे पक्के दोस्त आहेत.

यूट्यूबवरच्या म्युझिक व्हीडिओंमधून ते पहिल्यांदा लोकांसमोर आले, पण त्यांना खरी प्रसिद्धी टिकटॉकवर मिळाली. एवढी, की आज त्यांच्या फॉलोअर्सची एकत्रित संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. साहजिकच त्यात टीनएजर्सची संख्या मोठी आहे. एकट्या फैसलचेच टिकटॉकवर दोन कोटींपेक्षा जास्त तर इन्स्टाग्रामवर साडेसहा लाख चाहते आहेत.

त्याचा परिणाम म्हणजे त्यांना म्युझिक कंपन्या, फॅशनविश्व आणि वेगवेगळ्या ब्रँड्सकडून मोठ्या ऑफर्स येऊ लागल्या आणि बॉलिवूड स्टार्ससोबत झळकण्याची संधीही मिळाली.

Mr_Faisu_07

फोटो स्रोत, Mr_Faisu_07

टिकटॉकवरचे त्यांचे जोक्स, कॉमेडी आणि डायलॉग्ज लिपसिंक केलेले व्हीडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होतात. इतरांनी पोस्ट केलेल्या त्यांच्या व्हीडिओवरही हजारोंनी लाईक्सचा पाऊस पडलेला दिसतो.

पण सध्या तरी तिघांची टिकटॉकवरची अकाऊंट्स निलंबित झाली आहेत.

वादग्रस्त व्हीडि

सहा जुलै रोजी हसनैन खाननं आपल्या @Hasnaink07 या टिकटॉक अकाऊंटवरून एक व्हीडिओ पोस्ट केला होता. या व्हीडिओमध्ये तो तबरैझ अन्सारीच्या मृत्यूविषयी बोलताना दिसतो. व्हीडिओमध्ये त्याच्या मागे Team 07चे बाकी सदस्यही उभे आहेत.

या व्हीडिओमध्ये हसनैन हिंदीत बोलतो, "मार तो दिया तुमने तबरेझ को, पर कल जब उसकी औलाद बदला ले, तो ये मत कहना मुसलमान आतंकवादी है." (तबरेझला तर तुम्ही मारून टाकलं. पण उद्या जर त्याच्या मुलानं बदला घेतला, तर मुसलमान आतंकवादी आहेत असं म्हणू नका.) फैसल आणि शादाननंही असेच व्हीडिओ त्याच दिवशी आपल्या प्रोफाईलवरून शेअर केले.

Team07नं हे व्हीडिओ पोस्ट केल्यावर काही मिनिटांतच त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आणि या व्हीडिओकडे शिवसेनेच्या रमेश सोळंकी यांचं लक्ष वेधलं गेलं. ट्विटरवर स्वतःचं 'very proud Hindu nationalist' असं वर्णन करणारे सोळंकी शिवसेनेच्या आयटी सेलचे सदस्य आहेत. त्यांनी मग मुंबई पोलिसांशी संपर्क साधला आणि या पाचही जणांवर तक्रार दाखल करण्यात आली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम सेलनं हसनैन, फैसल आणि शादान या तिघांवर भारतीय दंडविधानाच्या कलम 153-अ आणि कलम 34 नुसार FIR दाखल करण्यात आला. तिघांनी इंटरनेटचा गैरवापर केला असून 'देशातील सर्वधर्मीय समाजामध्ये तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली' असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सात जुलैला हे व्हीडिओ आणि ते पोस्ट करणाऱ्या Team 07च्या तिघा सदस्यांची अकाऊंट्स टिकटॉकनं काही काळासाठी बंद केली आहेत. म्हणजे निलंबन हटेपर्यंत किंवा या तिघांना आपल्या अकाऊंटमध्ये लॉग इन करता येणार नाही आणि काही पोस्टही करता येणार नाहीत.

या तिघांनीही मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला असून, त्यावर सुनावणी होईपर्यंत तिघांना (Interim Protection) अंतरिम संरक्षण देण्यात आलं आहे.

दरम्यान, हा सगळा प्रकार घडला, तेव्हा फैसल लंडनला होता. आठ जुलैला त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून माफी मागितली आणि आपला कुणाला दुखावण्याचा इरादा नव्हता, असं स्पष्टीकरणही दिलं.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त

आठ जुलैलाच झी म्युझिक कंपनीनं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या ग्रुपचा म्युझिक व्हीडिओ काढून टाकल्याचं जाहीर केलं.

'लिप सिंक'मुळे अडचणीत

फैसल, हसनैन आणि शादान या तिघांनी टिकटॉकवर पोस्ट केलेल्या त्या वादग्रस्त व्हीडिओमधला आवाज त्यांचा नव्हता, तर तो डायलॉग टिकटॉकवर आधीच व्हायरल झाला होता, याकडे त्यांचे वकील अली काशिफ खान लक्ष वेधतात.

टिकटॉक हा असा प्लॅटफॉर्म आहे, जिथं एखादं गाणं किंवा डायलॉगच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आपले पंधरा सेकंदांचे किंवा एक मिनिटापर्यंतचे छोटे व्हीडिओ रेकॉर्ड करू शकता. Team 07च्या सदस्यांनी असाच एक प्रचलित डायलॉग वापरून व्हीडिओ तयार केल्याचा त्यांचा दावा आहे.

गेल्या महिन्यात झारखंडमध्ये तबरेझ अन्सारी या मुस्लिम युवकाचा जमावानं केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यावर देशभरातून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी तरुणांनी तबरेझला न्याय मिळायला हवा अशी मागणी केली. टिकटॉकवरही त्याचं प्रतिबिंब दिसलं. त्यामुळेच अली काशिफ खान प्रश्न यांनी प्रश्न उपस्थित केला, की लाखो लोकांनी असे व्हीडिओ तयार केले होते, मग फक्त या तिघांवरच कारवाई कशासाठी?"

पण तक्रारकर्ते रमेश सोळंकी यांनी म्हटलं आहे, की लाखो लोक रोज त्यांचे व्हीडिओज पाहात असल्यानं तबरेझ अन्सारीच्या मृत्यूचा बदल घेण्याची भाषा करणाऱ्या व्हीडिओकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. समाजविरोधी घटकांचा भारतीय समाजात तेढ निर्माण करण्याचा हा कट असल्याचं ते आपल्या तक्रार अर्जात म्हणतात.

Vijaymahar

फोटो स्रोत, Vijaymahar

अली काशीफ खान यांच्या मते, "या व्हीडिओत कोणाला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलेलं नाही, किंवा तसा कुठला उद्देशही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार अशा पोस्टमध्ये दोन धर्मांचा किंवा गटांचा उल्लेख केलेला नसतो, त्यावरून कुठली दंगल किंवा हिंसाचार पसरला नसेल तर कलम १५३-अ लागू होत नाही. त्यामुळं आम्ही FIR वरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत."

पोलिसांनी आणखी तपास करायला हवा आणि टिकटॉकवर कारवाई करायला हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टिकटॉक पुन्हा वादात

टिकटॉकविषयी अशा वादांची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षभरात टिकटॉकची लोकप्रियता वाढत गेली आहे. मात्र त्यासोबतच टिकटॉकचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या. त्यानंतर गेल्या आठवड्यातच केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं टिकटॉक आणि हेलो ही अॅप्स तयार करणाऱ्या बाईटडान्स (ByteDance) या कंपनीला नोटीस पाठवली होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)