संभाजी भिडे: फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते? अॅटॉमिक फिजिक्समध्ये गोल्ड मेडलिस्ट? – फॅक्ट चेक

फोटो स्रोत, RAJU SANADI/BBC
- Author, याकूत अली
- Role, बीबीसी फॅक्ट चेक टीम
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. यावेळी त्यांनी महात्मा गांधीजींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं वाद झालाय.
या वादाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळातही उमटल्याचे दिसले. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि यशोमती ठाकूर यांनीही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्या.
संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा पृथ्वीराज चव्हाणांनी विधिमंडळात अधिवेशनादरम्यान उपस्थित केला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "काल अमरावतीमध्ये संभाजी भिडे नावाच्या गृहस्थाने निदाजनक वक्तव्य केलंय. आपण त्याची माहिती घेतली असेल. अशाप्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब अटक केली पाहिजे. ही व्यक्ती अनेक वर्षांपासून हा प्रकार करतेय. ही व्यक्ती राष्ट्रपित्याबाबत असं वक्तव्य करू शकते, तर हा बाहेर कसा फिरू शकतो? त्याच्या वक्तव्याचे पडसाद उमटल्यास त्यास जबाबदार कोण? मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, या व्यक्तीला अटक करावी."
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, या तक्रारीची नोंद घेतली आहे. तपासणी करून गांभीर्य पाहून कारवाई केली जाईल, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
यानंतरही काँग्रेस आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मीही शहानिशा करून शासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत.
संभाजी भिडे यांच्याबाबत वेगवेगळे दावे सोशल मीडियावर केले जातात. वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप पोस्टमधून त्यांची वेगवेगळी माहिती व्हायरल होत असते. ही माहिती आणि दावे किती सत्य आहेत, याची पडताळणी बीबीसीनं केली आहे.

दावा :संभाजी भिडे हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञानाचे प्राध्यापक होते आणि त्यांना 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय भिडे हे अॅटॉमिक फिजिक्समध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत, असा दावा करण्यात येत आहे.
हजारो अनुयायी असलेल्या 'भिडे गुरुजीं'बद्दल व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये अनेक दावे केले जातात.
इतकंच नव्हे तर ते नासाच्या सल्लागार समितीत काम करायचे, असं सांगितलं जात आहे. यासोबतच डॉक्टरेट आणि पोस्ट डॉक्टरेटसाठीच्या 67 संशोधनांचे ते गाईड होते आणि आता ते महाराष्ट्रात समाजसेवा करत आहेत, असेही अशा पोस्टमध्ये लिहिलेलं दिसतं.
फॅक्ट चेक: बीबीसीनं भिडेंबाबतच्या सोशल मीडियावरील या मेसेजची पडताळणी केली. त्यांची संघटना श्री शिवप्रतिष्ठानचे प्रवक्ते नितीन चौगुले यांनी यापैकी काही दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे. पुणे विद्यापीठानं संभाजी भिडे विद्यापीठातील कॉलेमध्ये प्राध्यापक किंवा विद्यार्थी असल्याची बाब फेटाळली आहे.
व्हायरल मेसेज काय?
संभाजी भिडे हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञानाचे प्राध्यापक होते आणि ते अॅटॉमिक फिजिक्समध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत, अशी बातमी सोशल मीडियावर पसरवण्यात येत आहे. तसंच त्यांना 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे, असंही म्हटलं जात आहे.
पंतप्रधान मोदींसोबतचा भिडे यांचा फोटो शेयर करत ही माहिती पसरवली जात आहे.

फोटो स्रोत, TWITTER
भिडेंचे 10 लाखांपेक्षा जास्त अनुयायी असल्याचं सांगितलं जातं. त्यांची लोकप्रियता पाहता गुगलवर संभाजी भिडे असं टाईप केल्यास हे येतं -

फोटो स्रोत, Google Search
कोण आहेत संभाजी भिडे?
मनोहर असं मूळ नाव असलेले भिडे सांगलीत राहतात. सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी हे त्यांच मूळ गाव. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे. संभाजी भिडे 1980च्या दशकात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त कार्यरत होते, असं सांगलीतले ज्येष्ठ पत्रकार गणेश जोशी सांगतात.
संघाशी वाद झाल्यानंतर त्यांनी सांगलीमध्ये प्रतिसंघाची स्थापना केली होती. 1984मध्ये संभाजी भिडे यांनी श्री शिव प्रतिष्ठानची स्थापना केली.
बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी वाद उफाळला होता तेव्हा भिडे यांच्या 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' या संघटनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा हिंदुत्ववादी संघटनांना अभिप्रेत असलेला इतिहास ते सांगतात, असंही जोशी सांगतात.

फोटो स्रोत, FACEBOOK
'हिंदू समाजाची उगवती तरुण पिढी शिवाजी, संभाजी रक्तगटाची बनवणे हेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ध्येय आहे,' असं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. शिवप्रतिष्ठानने रायगडावर 32 मण वजनाचं सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प केला आहे.
1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात भिडे यांच्याबरोबरच हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे, यांच्यावर पुण्यातल्या पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळेच संभाजी भिडे यांचं नाव चर्चेत आलं.
पण खरंच भिडे प्राध्यापक होते का?
त्यांची संघटना श्री शिवप्रतिष्ठानचे प्रवक्ते नितीन चौगुले यांनी असा दावा केलाय की संभाजी भिडे यांना अॅटॉमिक फिजिक्समध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. सोबतच त्यांनी असाही दावा केला ते पूर्वी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.
भिडे आता महाराष्ट्रात समाजसेवा करत असून त्यांचे 10 लाखांपेक्षा जास्त अनुयायी असल्याच्या तिसऱ्या गोष्टीलाही त्यांनी दुजोरा दिला.
पण पुढील गोष्टी चूक असल्याचं त्यांनी म्हटलं -
1. 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे.
2. ते नासाच्या सल्लागार समितीत काम करायचे
3. ते डॉक्टरेट आणि पोस्ट डॉक्टरेटसाठीच्या 67 संशोधकांचे गाईड होते
बीबीसीने फर्ग्युसन कॉलेजची वेबसाईट तपासून पाहिल्यावर हे लक्षात आलं की कॉलेजमध्ये अॅटॉमिक फिजिक्सचा अभ्यासक्रमच उपलब्ध नाही.

यानंतर आम्ही फर्ग्युसन कॉलेजच्या अधिकाऱ्यांशी बोललो. तेव्हा भिडे या कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं सिद्ध करणारे कोणतेही रेकॉर्ड्स कॉलेजकडे नसल्याचे आम्हाला समजले. कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी हेदेखील सांगितलं की ते इथे प्रोफेसर होते, असं सांगणारेही कोणतेही रेकॉर्ड्स अस्तित्त्वात नाही. याशिवाय या कॉलेजमधून अॅटॉमिक फिजिक्सची कोणतीही डिग्री मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल रवींद्र परदेशी यांच्याशीही बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण ते आमच्याशी बोलले नाहीत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या एका लेखानुसार फर्ग्युसन कॉलेज चालवणाऱ्या संस्थेचे सदस्य किरण शाळीग्राम यांनी सांगितलं की भिडे तिथे प्राध्यापक होते, पण ते कोणत्या काळात तिथे प्राध्यापक होते, याविषयी मात्र त्यांना माहिती नव्हती.
संभाजी भिडे फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक होते, या माहितीला बीबीसीही दुजोरा देत नाही, कारण याविषयीचे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाही.
नरेंद्र मोदी त्यांना कसे ओळखतात?
2014मध्ये लोकसभा निवडणुकींच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी संभाजी भिडे यांची भेट रायगड किल्ल्यावर झाली. पंतप्रधानांनी संभाजी भिडे यांचं कौतुक केलं होती.
तीन वर्षांपूर्वी रायगडमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी भिडे गुरुजींचा आभारी आहे की त्यांनी मला निमंत्रण न देता आदेश दिला. गेली अनेक वर्षं मी भिडे गुरुजींना ओळखतो. आम्ही जेव्हा सामाजिक क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं तेव्हा आम्हाला भिडे गुरुजींचं उदाहरण दिलं जायचं."
ते म्हणाले होते, "जर कोणी बसमध्ये किंवा रेल्वेच्या डब्यात भिडे गुरुजींना भेटलं, तर त्या व्यक्तीला कल्पनाही येणार नाही की ही व्यक्ती एक तपस्वी, एक महापुरुष आहे."

फोटो स्रोत, www.narendramodi.in
फेब्रुवारी 2018 मध्ये नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीनिमित्त एक व्हीडिओ ट्वीट करून शिवाजी महाराजांना अभिवादन केलं होतं. त्या व्हीडिओच्या शेवटी मोदींचा संभाजी भिडेंसोबतचा एक फोटो होता. भीमा कोरेगावप्रकरणी आरोप असताना पंतप्रधान हा फोटो कसा ट्वीट करू शकतात, असा वाद त्यावरून झाला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








