अहमदनगर : पवार-विखे पाटील संघर्ष नेमका आहे तरी काय?

फोटो स्रोत, Twitter
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी मुंबईहून
"मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने माझे वडील माझ्याशी बोलत नाहीत. पण मी वेळेवर त्यांना माझा निर्णय पटवून देईन" असं म्हणत सुजय विखे-पाटील यांनी आपल्या भाजपा प्रवेशाचं समर्थन केलंय.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर सुजय विखे-पाटील यांनी बीबीसीला पहिल्यांदा मुलाखत देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसनं ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर सुजय यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
"ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातली आहे. नगरच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये 2 आमदार राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेसचा एकही सदस्य गेल्या निवडणुकीत निवडून आलेला नाही. तसंच उरलेल्या चारही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला क्रमांक दोनची मतं आहेत. दुसरीकडे शिर्डीचा मतदासंघ काँग्रेसकडे आहे. त्यामुळे नगरची जागा काँग्रेसने मागण्याला काही अर्थच नाही. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवेल," असं शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात म्हटलं आहे.
याआधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की, विखे-पवार घराण्यातील वैर तिसऱ्या पिढीत तरी संपुष्टात यावं. पण पवारांनी घेतलेल्या भूमिके मुळे ते पुढ्या पिढीतही कायम राहाण्याची शक्यता आहे.
यामुळे विखे-पवार घराण्यातील संघर्ष हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
पवार आणि विखे-पाटील संघर्षाची सुरवात
तसा तर पवार कुटुंब आणि विखेंच्या प्रवरागनगरचा तब्बल पन्नास वर्षांपेक्षा जास्त जुना संबंध आहे. शरद पवारांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार हे विठ्ठलराव विखे पाटलांनी स्थापन केलेल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्यात काही काळ अधिकारी म्हणून काम पाहत हेते. त्यावेळी शरद पवारही प्रवरानगरमध्ये होते आणि तिथल्या महात्मा गांधी विद्यालयात त्यांचं शिक्षण झाले आहे.
राज्याच्या राजकारणात मात्र नेहमीच शरद पवार विरूद्ध विखे असं चित्र राहिलं आहे. यशवंतराव चव्हाणांनंतर काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या नेतृत्वात शरद पवार आणि शंकरराव चव्हाण असे दोन गट तयार झाले.
शंकरराव चव्हाण गट हा यशवंतराव चव्हाण यांचा विरोधी गट मानला जायचा. त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील यांचा पाठिंबा कायम शंकरराव चव्हाण गटाला राहिला.

फोटो स्रोत, Radhakrishna Vikhe Patil/FACEBOOK
बाळासाहेब विखे-पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद १९९१च्या लोकसभा निवडणुकीत विकोपाला गेला.
अहमदनगर मतदारसंघात यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते. तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते गडाखांविरुद्ध अपक्ष लढले. पण यशवंतराव गडाख हे अटीतटीच्या लढतीतून निवडून आले.
त्यानंतर बाळासाहेब विखे-पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी त्यांचं चारित्र्यहनन केलं, असा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला.
शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्याविरोधात बाळासाहेब विखे पाटील यांनी कोर्टात पुरावे सादर केले. हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला. या खटल्यादरम्यान शरद पवार यांच्यावरही कोर्टाने ठपका ठेवला तर गडाखांना सहा वर्षं निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं.
दैनिक लोकमतच्या नगर आवृत्तीचे प्रमुख सुधीर लंके सांगतात की, "विखे-पवार संघर्षाचं हे टोक होतं. या खटल्याची सल शरद पवार यांच्या मनात आजही असू शकते."
लोकसत्ताचे नगर जिल्ह्यातील पत्रकार अशोक तुपे हे १९९१च्या बाळासाहेब विखेंनी गडाख आणि पवार विरोधात चालवलेला खटल्याचे साक्षिदार होते. ते सांगतात,
"निवडणुकीत भाषण करताना उत्तरेतील जित्राबं (जनावरं) दक्षिणेत येतील... पैसे देतील, सायकल देतील (विखे पाटील यांचं निवडणूक चिन्ह सायकल होतं) ते घ्या पण मतं कॉंग्रेसच्याच उमेदवाराला द्या, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्यावरून आचारसंहिता भंग झाला. तसंच बदनामी केली या आरोपांचा खटला विखे यांनी गडाख आणि शरद पवार यांच्यावर केला. त्यावेळी कोर्टाने गडाख यांना ६ वर्षांसाठी निवडणूक बंदी घातली होती, तर शरद पवार यांच्यावर ठपका ठेवून नोटीस काढली. पण त्यावेळी शरद पवारांची अपात्रता टळली होती. पण तरीही तो खटला खूप गाजला. तेव्हा आचारसंहिता भंग किती गंभीर असतो हे स्पष्ट झालं होतं.
संघर्ष दुसर्या पिढीचा...
हा संघर्ष पुढे शरद पवारांचे पुतणे अजित पवार आणि बाळासाहेब विखेंचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातही सुरूच राहीला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी कधीच सोडली नाही.
2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघ राखीव झाला. शरद पवार यांच्या आग्रहाने रामदास आठवले यांना शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं निश्चित झालं. त्याबदल्यात राष्ट्रवादीकडून नगर दक्षिणची जागा बाळासाहेब विखे पाटील यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय करण्यात आला होता. पण ऐनवेळी पवारांनी भूमिका बदलली. नगर दक्षिणमधून राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यात आला. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांची खासदारकी संपुष्टात आली. याला प्रत्युत्तर म्हणून विखे पाटील यांनी रामदास आठवले यांच्याविरुद्ध प्रचार केला आणि रामदास आठवले यांना पराभूत करण्यात विखे पाटील हे यशस्वी ठरले, असं ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी सांगितलं.
हा संघर्ष पुढे अधिकच तीव्र होत गेला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार विरोध झाला. पण अटीतटीच्या लढाईत राधाकृष्ण विखे पाटील १२ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले.
अजित पवार अर्थमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील कृषीमंत्री असताना यांच्यातले वाद कायम समोर येत राहीले.

फोटो स्रोत, RAVEENDRAN
ऊर्जामंत्री असताना अजित पवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात असलेली मुळा-प्रवरा ही सहकारी वीज कंपनी थकीत रकमेमुळे बरखास्त करण्याचे आदेश दिले होते.
राजकारण तिसर्या पिढीचं
अर्थात तिसऱ्या पिढीत हे वाद कमी होतील, असं प्रताप आसबे यांना वाटतंय.
"जुने वाद पवार आणि विखे पाटील कुटुंबातील नवी पिढी आता मागे सोडतेय. याचंचं उदाहरण काही महिन्यांपूर्वी बघायला मिळालं. शरद पवार यांचे बंधू आप्पासाहेब पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी प्रवरानगरमध्ये जाऊन सुजय विखे पाटील यांची भेट घेतली होती. त्यामुळे नव्या पिढीत हे वाद राहतील असं वाटत नाही. हा वाद आता नगर दक्षिणच्या जागेपुरता आहे. जर सुजय विखे पाटील यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमधून उमेदवारी मिळाली तर हा वाद संपुष्टात येऊन मैत्रीचा नवा अंक सुरू झाला असं म्हणावं लागेल. जर सुजय विखेंना ही जागा राष्ट्रवादीने नाही दिली तर मात्र विखे आणि पवार घराण्याचा संघर्ष हा तिसर्या पिढीपर्यंत पोहोचलाय हे स्पष्ट होईल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








