पाकिस्तान आणि भारतात अणुयुद्धाची शक्यता किती?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"जी स्थिती कधीही पाहिली नव्हती त्या स्थितीमध्ये सध्या हे दोन्ही देश आहेत," भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या स्थितीवर पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानींनी केलेलं हे भाष्य खूप काही सांगून जातं.
हुसैन हक्कानी हे अमेरिकेत पाकिस्तानचे राजदूत होते आणि आतापर्यंत तीन पंतप्रधानांबरोबर त्यांनी सल्लागाराचं काम केलं आहे. नुकतंच त्यांनी 'रिइमॅजनिंग पाकिस्तान- ट्रान्सफॉर्मिंग अ डिसफंक्शनल न्युक्लियर स्टेट' नावाचं पुस्तक लिहिलं आहे.
बीबीसीनं त्यांच्याकडून एकूण परिस्थिती काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.
हे समजून घेण्याआधी आपण ज्या पार्श्वभूमीवर हक्कानींनी हे विश्लेषण केलं आहे ती परिस्थिती आधी समजून घेऊ.
भारतानं मंगळावारी जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हल्ला केला. पाकिस्ताननं त्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि म्हटलं की आम्ही योग्यवेळी भारताच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ. या घटनेला 24 तास संपत नाही त्याआधी पाकिस्ताननं सांगितलं की आम्ही आमच्या हद्दीत राहून भारतीय हद्दीत हल्ले केले. पुढे त्यांनी हे देखील सांगितलं की भारतीय वायुदलाची दोन विमानं आम्ही पाडली. आता सध्या एक वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात आहे.

फोटो स्रोत, EPA
पाकिस्तानची ही कृती जशास तसे किंवा ठोशास ठोसा या स्वरूपाची आहे असं काही जणांना वाटतं. पुलवामा हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट होती तिला शांत करण्यासाठी भारताने बालाकोट हल्ला केला असं देखील काही जणांना वाटतं, पण खरा प्रश्न हा आहे की परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ती नियंत्रणात कशी येईल?
त्याला कारण देखील तसंच आहे, मंगळवारी भारतानं अनपेक्षितपणे हल्ला केला. 1971 नंतर भारताने पहिल्यांदाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये आपली विमानं घुसवली.
दोन्ही देशांकडे अण्वस्त्रं आहेत. पाकिस्तानी लष्करानं दहशतवादाचा वापर करून परिस्थिती चिघळवली आणि अकारण अणुयुद्धाची परिस्थिती ओढावू नये म्हणून भारताने हा मुद्दा उचलण्यासाठी चालढकल केली, असं हक्कानी सांगतात.
"भारताला वाटतं की आपण अशा काही जागा निवडल्या आहेत ज्या ठिकाणी हल्ला केला तर आपण मर्यादा ओलांडली असा संदेश जाणार नाही. त्यामुळेच भारताने 2016मध्ये सर्जिकल स्ट्राइक केलं आणि आता दहशतावादी गटाच्या तळावर हवाई हल्ले केले," असं हक्कानी सांगतात. पाकिस्तानला भारताविरोधात युद्ध नकोय पण त्यांच्या लष्करासमोर अनेक आव्हानं आहेत.

फोटो स्रोत, Twrrer@Iaf_MCC
"त्यांना पाकिस्तानच्या भूमीवर असलेल्या जिहादी संघटना बंद कराव्या वाटत नाहीत. पण त्या संघटना असणं हे समस्यांचं आगार आहे. 2011 मध्ये अमेरिकेनं पाकिस्तानमध्ये घुसून ओसामा बिन लादेनला ठार केलं होतं. आता भारतीय विमानं पाकिस्तानमध्ये घुसली, त्यांनी स्फोटकं टाकली. त्यांचा प्रतिकार देखील झाला नाही आणि ती परतली," हक्कानी सांगतात.
"पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्याच्या वचनावर पाकिस्तानचं सरकार आपल्या लष्करासाठी मोठं बजेट मंजूर करून घेतं. आता पाकिस्तान सरकार आपल्या जनतेला काय उत्तर देणार आहेत," हक्कानी विचारतात.
'भारताचं पाऊल योग्य'
भारताने उचललेलं पाऊल योग्य होतं असं संरक्षण तज्ज्ञांना वाटतं. डॅनियल मार्के हे जॉन हॉपकिन विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ते संरक्षण तज्ज्ञ आहेत.
ते सांगतात, "पाकिस्तानचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताच्या हाती जे पर्याय आहेत ते फारच महागडे ठरू शकतात आणि त्यातून अपेक्षित निकाल मिळण्याची शक्यता अल्प आहे. ही गोष्ट भारताला ठाऊक आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या आक्रमकतेला कठोर शिक्षा देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. ही काही वाईट रणनीती नाही. मी तर असं म्हणेन की जोपर्यंत तुम्ही प्रत्येक पाऊल मोजून मापून उचलत आहात आणि किमान चुका तुमच्या हातून घडत असतील तर हे एक चांगलं धोरण ठरू शकतं."
"उदाहरणार्थ, बालाकोट हल्ल्याची आपण चर्चा करू. काही रिपोर्ट असं सांगत आहेत की भारतीय विमानांना स्वतःच्याच हद्दीतून हल्ला करायचा होता. पण त्यावेळी हवा सुरू होती त्यामुळे त्यांना भारतीय हद्द ओलांडून पाकिस्तानी हद्दीत घुसावं लागलं. जर हे खरं असेल तर असं म्हणावं लागेल की अशा आपल्या योजनेत नसलेल्या गोष्टी केल्यामुळे आपण प्रत्येक पावलागणिक नवी जोखीम वाढवत आहोत ही जाणीव त्यांना होणं आवश्यक आहे," मार्के सांगतात.
अणुयुद्धाची शक्यता किती?
प्रा. मार्के सांगतात, "वाटत होतं त्यापेक्षा आताची परिस्थिती गंभीर आहे. या आधीच्या भारतीय पंतप्रधानांनी असं पाऊल उचलण्यास टाळाटाळ केली. पण यावेळी हे झालं."

फोटो स्रोत, Alamy
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. त्यामुळे दोन्ही देशात अणुयुद्ध होण्याची भीती आहे का असा प्रश्न बीबीसीनं विचारला असता मार्के सांगतात, "हे दुःखद आहे पण ही भीती नेहमीच असते. पण या घडीला आपण अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर नाही. ती गोष्ट शेकडो मैल दूर आहे असंच म्हणावं लागेल."
"अण्वस्त्र एखाद्या नॉन स्टेट एलिमेंटच्या म्हणजेच गैरसरकारी समूहाच्या हाती लागली किंवा अपघाताने त्यांचा वापर झाला तर? अर्थात ही शक्यता फारच कमी आहे. अण्वस्त्राचा वापर होण्याआधी दोन्ही देशात पारंपारिक संघर्ष होताना दिसू शकतो," मार्के सांगतात.
"..आणि हे संघर्ष येणाऱ्या काळात होऊ शकतात. जर पाकिस्ताननं भारतीय नागरिकांवर हल्ले केले तर हा संघर्ष आणखी चिघळू शकतो.
"तसं होण्याची शक्यता फारच कमी आहे. पण सध्या एका प्रश्नावर दोन्ही देशांनी विचार करणं महत्त्वाचं आहे तो म्हणजे या परिस्थितून योग्य मार्ग कसा काढता येईल? अशी परिस्थिती गेल्या काही दशकांत उद्भवली नव्हती. यातून दोन्ही देशांची सुटका कशी होईल?" असं मार्के विचारतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








