विधानसभा निवडणूक: मतदानाची तारीख, निकाल, उमेदवार आणि पक्षांबाबत जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज घोषणा झाली. निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात आज दुपारी 12 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभांच्या निवडणुका घोषित केल्या. या दोन्ही राज्यांत 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
नोव्हेंबर 2019 मध्ये विधानसभेची मुदत संपणार आहे. गेल्या वेळी 18 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती.
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कार्यसमितीच्या बैठकीला संबोधित केले तसेच भाजपानं महाजनादेश ही मोहीम हाती घेतली होती.
आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
काँग्रेसनेही महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली आहे. भाजपानं महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर मुंबई अध्यक्षपदी भाजपानं आमदार मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती केली.

फोटो स्रोत, ANI
काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होतील, असं वक्तव्य केलं होतं. अर्थात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचं म्हणणं खोडून काढत महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका होणार नाहीत, असं स्पष्ट केलं. तसं झालंही.
ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभेची मुदत संपणार आहे. गेल्या वेळी 18 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. त्यामुळे यावेळेसही सप्टेंबरमध्येच विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
टाईम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची संकल्पना निवडणूकतज्ज्ञ प्रशांत किशोर यांची होती.
2014 साली नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा व्याप सांभाळणारे प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जदयुला आणि आंध्र प्रदेशात YSR काँग्रेसला विजयीपथ दाखवला होता.
पण आदित्य ठाकरे यांच्याबाबतची बातमी प्रशांत किशोर यांनी एक उपहासात्मक ट्वीट करून फेटाळली आहे - "मी आजकाल कुठे काम करतोय, हे मला केवळ वर्तमानपत्रातूनच समजत आहे."
म्हणजे खरोखरंच निवडणुका आता दूर नाहीत, असं म्हणता येईल.
विधानसभेसाठी एकूण किती जागा आहेत?
2014 साली राज्यात 8 कोटी 25 लाख मतदार होते. 15 ऑक्टोबर 2014 रोजी एकाच टप्प्यात राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका झाल्या होत्या.
चारच दिवसानंतर म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक म्हणजेच 122 जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.

लोकसभा 2019 साठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणुका लढवल्या पण निवडणुकीनंतर त्यांनी एकत्रपणे सरकार स्थापन केलं.
विधानसभेसाठीची राजकीय समीकरणं
विधानसभा निवडणुकीत प्रमुख लढत ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना युती अशी असेल असं सध्यातरी दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समान जागावाटपावर एकमत झालं आहे. एमआयएम पक्षानं वंचित बहुजन आघाडीची साथ सोडून स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. मात्र राज यांनी जागोजागी सभा घेत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकंदरच भाजपविरुद्ध प्रचार केला. या प्रचारातून राज हे विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करत असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, Sagar Surawase
भाजपविरुद्ध प्रचार करणारे राज विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत जाणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. याबद्दल राज किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीनं उघडपणे कोणतंही भाष्य केलं नसलं, तरी या राजकीय समीकरणाकडे विधानसभेच्या वेळेस सर्वांचच लक्ष असेल.
या पक्षांव्यतिरिक्त बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष यांचीही भूमिका महत्त्वाची राहील.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








