You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रजनीकांतची मुलगी सौंदर्या उर्फ शकुबाई गायकवाड दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार
सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. उद्योगपती आणि अभिनेता विशागन वनंगामुदी यांच्याशी सौंदर्या लग्नगाठ बांधणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या या नात्याची चर्चा सुरू होती. अखेर सिल्क साडीतला, दागिन्यांनी मढलेला फोटो ट्विटरवर शेअर करत सौंदर्यानेही यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
'ब्राईड मोड', 'वन वीक टू गो', 'वेद विशगन सौंदर्या' असे काही हॅशटॅग्ज तिनं दिले आहेत.
फेब्रुवारीच्या 11 तारखेला चेन्नईत सौंदर्या आणि विशागन यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
सौंदर्याच्या आई लता रजनीकांत यांनी 10 आणि 12 फेब्रुवारीला आपल्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची विनंती करणारं पत्र पोलीस स्टेशनला लिहिलं आहे.
आता रजनीकांतच्या मुलीचं लग्न होतंय म्हटल्यावर हे ग्रँड असणार यात काही शंकाच नाही. सध्या रजनीकांत यांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.
संगीत-मेंहदीसारख्या विधींना 10 तारखेपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर ११ फेब्रुवारीला चेन्नईत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नानंतर रजनीकांत यांच्या घरी ग्रँड रिसेप्शन होणार आहे.
मुळचे मराठी असलेले शिवाजीराव गायकवाड पुढे जाऊन रजनीकांत बनले. पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, सौंदर्याचं खरं नाव शकुबाई गायकवाड आहे.
सौंदर्याचं हे दुसरं लग्न आहे. याआधी सौंदर्याने बिझनेसमन अश्विन रामकुमार यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नाच्या आठ वर्षांनंतर सौंदर्या 2016मध्ये अश्विन रामकुमारपासून विभक्त झाली.
सौंदर्या-अश्विन यांना वेद कृष्ण हा पाच वर्षांचा मुलगा आहे.
2010 साली 'गोवा' या चित्रपटाची निर्मिती सौंदर्याने केली होती. तर २०१४ मध्ये सौंदर्याने कोच्चडियन चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं.
कोच्चडियन हा भारताचा पहिला फोटोरिअॅलिस्टीक मोशन कॅप्चर चित्रपट होता. या सिनेमात रजनीकांत आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नाही.
कोण आहे सौंदर्याचा होणारा नवरा?
35 वर्षीय अभिनेता विशागन वनंगामुदी याने गेल्याच वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं.
विशगन हा चेन्नईतील फार्मास्युटिकल कंपनी अॅपेक्स लॅबचे संस्थापक एस. एस. वनंगामुदी यांचा मुलगा आहे.
विशागनचंही याआधी लग्न झालं होतं, मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)