थिमक्कांना पद्म पुरस्कार : झाडं लावत सुटलेल्या 'वृक्षमाते'ची भेट

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

दयविट्टु गमनिसी... (कृपया इकडे लक्ष द्या) चा अखंड गजर सुरू असणारी बंगळुरूतली नम्मा मेट्रोची स्थानकं मागं टाकून मी बसनं प्रवास करायचा ठरवला.

बंगळुरूच्या नामसंद्रा नावाच्या उपनगरात मला जायचं होतं. त्यासाठी मी बसमध्ये चढलो. इथं होतं थिमक्कांचं घर. एका लेखाच्या निमित्तानं मी त्यांना भेटणार होतो.

थिमक्का या तुमकूर जिल्ह्यातल्या मुळच्या हुलिकल गावच्या. 106 वर्षांच्या आजीबाई. हुलिकलजवळ त्यांनी साधारण 70 वर्षांपूर्वी वडाची 384 झाडं लावली आहेत.

त्यानंतर या बाई गेली अनेक वर्षं अक्षरशः झाडं लावत सुटल्या आहेत म्हणून मुंबईवरून बंगळुरू नामसंद्रा अशी मजल मारत मी त्यांच्या घरासमोर जाऊन उभा राहिलो होतो.

थिमक्कांना परवा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आणि दोन वर्षांपूर्वीची त्यांची भेट पुन्हा डोळ्यांसमोर उभी राहिली.

नामसंद्राला उतरल्यावर थिमक्कांचं घर शोधायला फारसा वेळ गेला नाही. हुलिकलवरून काही वर्षांपूर्वीच त्या नामसंद्राला म्हणजे बंगळुरूला राहायला आल्या होत्या तरीही त्या चांगल्याच प्रसिद्ध होत्या.

त्यांच्या बंगल्यात गेलो तर थिमक्का कानडी सिरीयल पाहात बसल्या होत्या.

कदाचित त्यांचं कार्य ऐकून भेटायला येणारे बरेच लोक असावेत. मी आल्यावर त्या मागे वळल्या आणि आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहात हात जोडले.

पांढरे केस, सुरकुत्यांचं जाळं असलेला चेहरा, पक्का कर्नाटकी रंग, दोन्ही नाकपुड्यांमध्ये मुगती-मुगबट्टू, कानांमध्ये बुगड्या आणि कपाळावर इब्बत (विभूती)ची तीन बोटं. त्यांच्या स्निग्ध प्रेमळ डोळ्यांमुळं आमचं एकदम आजी-नातवाचं नातंच निर्माण झालं.

त्यांच्याकडे कॉफी घेतली आणि थिमक्कांच्या गाडीतूनच हुलीकलला जायला निघालो. बरोबर त्यांच्या संस्थेत काम करणारी एकदोन मुलं आणि त्यांचा दत्तक मुलगा उमेशही होता.

थिमक्कांना आता 'सालुमार्दा थिमक्का' असं नाव मिळाल्याचं समजलं. सालुमार्दा म्हणजे एका रांगेत लावलेली झाडं. त्यामुळं त्यांच्या गाडीवर 'सालुमार्दा थिमक्का' असं लिहिलं होतं.

गाडीत बसल्यावर आमचं बोलणं सुरू झालं. थिमक्कांचं बिक्कलू चिक्कयांशी लग्न झालं आणि त्या हुलिकलला राहायला आल्या. कसंबसं हातावर पोट असणारं हे दांपत्य गावातच इकडेतिकडे काम करायचं.

इतकी झाडं का लावली?

कोणाच्या शेतात काम कर, मजुरी कर असं चालू असताना त्यांना एक धक्का बसला. तो म्हणजे लग्न होऊन भरपूर काळ उलटला तरी या दांपत्याला मूल झालं नाही.

मूल न होणं हे वैयक्तिक आणि कौटुंबिक दुःख असलं तरी हुलिकलसारख्या गावात ते सहन करणं कठिणच होतं.

नातेवाइकांचे टोमणे मारणं, गावातल्यांनी चिडवणं असल्या प्रकारातून या दोघांनाही मन रमवण्यासाठी काहीतरी हवंच होतं.

शक्य त्या सगळ्या देवळांमध्ये जाऊन डोकं ठेवून झालं पण थिमक्का-बिक्कलू यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही.

हुलिकल गावाच्या जवळ रस्ता बांधताना या थिमक्कांच्या मनात झाडं लावण्याची कल्पना आली. थिमक्का रोज एक वडाचं झाड लावू लागल्या.

दोघांनी मिळून त्यांना पाणी घालणं, त्यांची काळजी घेणं सुरू केलं. असं होता होता साडेतीनशेच्यावर झाडं लावली.

बोलताबोलता आम्ही हुलिकलच्या जवळ जाऊन पोहोचलो. आधीच बंगळुरूजवळच्या परिसरामध्ये इतर प्रदेशांच्यातुलनेत भरपूर जुनी झाडं आहेत त्यामुळे डोळ्यांना सवय झाली होती.

पण हुलिकलजवळ गेल्यावर सगळंच बदलून गेल्यासारखं वाटलं. गावाच्या आधी चार किलोमीटर दोन्ही बाजूंना वटवृक्ष असलेला सुमारे 4 किमीचा पट्टा लागतो. हाच तो थिमक्कांनी दुतर्फा वटवृक्ष लावलेला पट्टा.

झाडांची रांग लागल्यावर आम्ही खाली उतरलो. उमेश, थिमक्का आणि मी वडफळांच्या सड्यातून चालू लागलो. थिमक्कांना म्हटलं, तुम्ही फक्त वडाचीच झाडं का लावली?

त्या म्हणाल्या, "ही अशी उंच शांत आणि सावली देणारी झाडं मला आवडतात म्हणून." खरंच होतं ते. वडाची अशी इतकी झाडं एकाच जागी लावलेली मी कधीच पाहिलेली नव्हती.

भरपूर पक्षी या फांदीवरुन त्या फांदीवर उडत होते. ते सगळं एक वेगळं जगच झालेलं होतं.

थिमक्कांनी केवळ ही हुलिकलची एवढीच झाडं लावलेली नाहीत, तर त्यांनी नंतरही शेकडो झाडं लावली आहेत.

उमेश तर अजूनही रोज एक झाड लावतो. उमेश मुळचा बेलूर गावचा आहे. बेलूरच्या सुप्रसिद्ध मंदिराच्या जवळच त्याची नर्सरी आहे. त्यामुळे त्याच्याकडे भरपूर रोपं असतात.

थिमक्कांना पाहिल्यावर रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या थांबायच्या. लोक उतरायचे, त्यांना नमस्कार करायचे आणि निघून जायचे. मध्येच एक पोरांचं टोळकं आलं. पोरांनी फटाफट सेल्फी काढून घेतले.

तेव्हा थिमक्कांनी आजिबात कुरकूर केली नाही. उलट एका पोरानं सेल्फी काढला नाही म्हटल्यावर, "काय रे तुला फोटो काढायचा नाही का असं विचारलं?"

एकेकाळी मूल होत नाही म्हणून हेटाळणीचा विषय झालेल्या थिमक्कांना आज गावात चांगलाच मान मिळतो.

...आणि थिमक्का जगभरात प्रसिद्ध झाल्या

थिमक्कांचं हे काम बाहेरच्या जगाला कधी समजलं असं उमेशला विचारलं. तर तो म्हणाला, एकदा इथून कर्नाटकातलेच एक खासदार जात होते. गाडीमध्ये अचानक अस्वस्थ वाटू लागल्यावर ते खाली उतरले आणि या झाडांच्या सावलीत बसले.

थोड्यावेळात त्यांना बरं वाटलं. पण ही सगळी एका रांगेत कोणी झाडं लावली असं त्यांनी विचारलं तेव्हा त्यांना थिमक्कांचं नाव समजलं.

मग काय खासदारसाहेबांनी सरळ थिमक्कांचं घर गाठलं आणि त्यांचे आभार मानले. नंतर जाताना थिमक्कांच्या हातचं सुग्रास जेवण जेवूनच त्यांची पाठवणी झाली.

हा सगळा अनुभव त्यांनी पुढच्या एका कार्यक्रमात सांगितला. झालं. त्यावेळपासून थिमक्कांची माहिती जगभर पसरली.

थिमक्कांना त्यांच्या या कार्याबद्दल शेकडो पुरस्कार मिळाले आहेत. मघाशी त्यांच्या नामसंद्रांच्या घरात पुरस्कारांची आणि सत्काराच्या वेळेत मिळालेल्या कर्नाटकी पगड्यांची थप्पी पाहिली होती.

हुलिकलच्या घरामध्येही भरपूर पुरस्कार आणि सर्टिफिकिटं ठेवली आहेत, असं त्या म्हणाल्या.

थिमक्का आता थकल्या आहेत. हुलिकलनंतर त्यांना आता मंगळुरूला जायचं होतं.

त्यांचा निरोप घेण्यासाठी वाकल्यावर त्या दोन मिनिटं काहीतरी कानडीत पुटपुटल्या. त्यांच्याबरोबरच्या मुलांना त्याचा अर्थ विचारला तर तो म्हणाला 'ब्लेसिंग्ज'.

त्यांनी लावलेल्या झाडांचा असो वा पुरस्कारांचा थिमक्कांनी कधीच कसला हिशेब ठेवला नाही. रोज फक्त नाचणीचे उंडे आणि सांबार एवढंच त्यांचं जेवण.

या वयातही त्या दोन दिवसआड कर्नाटकात सगळीकडे कार्यक्रमांसाठी जातात. कार्यक्रमाला गेलं की त्याचं पहिलं लक्ष जातं ते वृक्षारोपणाकडे.

रोपाची मूळं मातीत मिसळल्यावरच त्यांना आनंद होतो. गाडीघोड्यांचा त्यांना फारसा सोस नाही. पद्मश्री मिळाल्यावरही त्या तेच अकृत्रिम वागणं कायम ठेवतील.

निरोप घेऊन बंगळुरूच्या गाडीत बसल्यावर मनात आलं. इतक्या मोठ्या बाई आहेत या. वयानं, कार्यानं आणि मानानंही.

एवढं असूनही कमालीची विरक्ती त्यांच्यामध्ये दिसली. बा. भ. बोरकरांच्या शब्दांत सांगायचं झालं तर त्यांचं मीपणाचं पक्व फळ सहजपणानं कधीच गळून पडलं आहे किंवा मला तर वाटतं ते 'मीपणाचं फळ' थिमक्कांच्या झाडावर आलंच नसावं.

जळापरी मन निर्मळ ज्यांचे, गेले तेथे मिळले हो

चराचरांचे होऊनि जीवन स्नेहासम पाजळलें हो

जीवन त्यांना कळले हो!

हे बाकी त्यांच्याबाबतीत तंतोतंत खरं वाटलं.

ही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)