ठाकरे सिनेमात टाळल्या 7 वादग्रस्त गोष्टी आणि दिली 5 स्पष्टीकरणं

फोटो स्रोत, TWITTER/THACKERAYMOVIE
- Author, आशिष दीक्षित
- Role, संपादक, बीबीसी मराठी
लोकसभा निवडणुकांच्या दोन महिने आधी ठाकरे सिनेमा रिलीज झालाय. याचे निर्माते शिवसेनेचे खासदारच असल्यामुळे ठाकरेंचं चरित्र तटस्थपणे पाहायला मिळण्याची कुणाची फारशी अपेक्षा नसेल.
पण हा सिनेमा बाळासाहेबांच्या राजकीय आयुष्यातल्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचताच संपतो. त्यामुळे नंतरच्या काळात झालेल्या अनेक अप्रिय घटना दाखवणं टाळता येतं. पण जो काळ दाखवला आहे, त्यातलेही काही महत्त्वाचे प्रसंग आणि वाद दाखवले नाहीयेत:
- मुंबई दंगलींची चौकशी करणाऱ्या श्रीकृष्ण आयोगाने बाळासाहेब ठाकरेंवर ठपका ठेवला होता. तो अहवाल तत्कालीन शिवसेना भाजप युती सरकारने फेटाळला होता. याचा उल्लेख सिनेमात नाही.
- 'दाऊद तुमचा तर अरुण गवळी आमचा', असं म्हणून बाळासाहेबांनी गुंडाची पाठराखण केली होती. अमर आणि अश्विन नाईकांच्या कुटुंबीयांना शिवसेनेनं तिकीट दिलं होतं. अंडरवर्ल्डचा अँगल दाखवण्याचं टाळलं आहे.
- मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला शिवसेनेने विरोध केला होता. यावेळी मराठवाड्यात दलित विरुद्ध सवर्ण हिंसा झाली होती. त्याचा उल्लेख या सिनेमात नाही.
- राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद अजिबात दाखवला नाहीये. पुढे मनसे स्थापन झाल्यावर बाळासाहेबांना राज ठाकरेंवर टीका करावी लागली होती - तेही सिनेमात नाहीये.
- राणे, भुजबळांसारखे नेते दाखवणं टाळलं आहे. नंतर त्यांनी शिवसेना सोडल्याचंही दाखवलं नाहीये.
- शिवसेना सत्तेत येताना दाखवली, पण पायउतार होताना दाखवली नाहीये. स्वतःच्याच पक्षाच्या सत्तेवर बाळासाहेबांनी नाराजी आणि हतबलता व्यक्त केली, हे या सिनेमात नाही.
- कृष्णा देसाईंचा खून दाखवला आहे, पण रमेश किणींचा खून खटला दाखवला नाहीये.
हिंसा आणि स्पष्टीकरणं
इन लाल बंदरों का बंदोबस्त करना पडेगा.. अशा आशयाचं वाक्य सिनेमातले बाळासाहेब उच्चारतात आणि पुढच्याच सीनमध्ये हातात नंग्या तलवारी घेतलेले तरुण कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाईंचा खून करताना दिसतात.

फोटो स्रोत, YOUTUBE/VIACOM
बाळासाहेबांना अटक झाली की तलवारी निघतात, बाँब फुटला की शिवसेना शाखेत तलवारी दाखवल्या आहेत. महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना वाटू शकतं की मराठी घरांमध्ये जणू भाजी चिरण्याच्या विळीसह माणसं चिरण्याच्या तलवारीही ठेवत असावेत. इतक्या सहज लोक तलवारी नाचवताना दिसतात.
हिंसा हा ठाकरे या सिनेमाचा मूळ गाभा आहे. त्या हिंसेची वेळोवेळी बाळासाहेबांच्या पात्राने आणि पटकथेच्या लेखकाने पाठराखण केली आहे. हिंसा का योग्य आहे, यासाठी या सिनेमात अनेक स्पष्टीकरणं दिली आहेत.
आम्ही आमचा हक्क मारझोड करून हिसकावून घेतो, असं दाखवायचं तर आहे, पण आम्ही विनाकारण कुणाला मारत नाही, त्याची कारणं आहेत, हे सांगण्याचीही धडपड इथे केलेली जाणवते.
'बजाव पुंगी, भगाव लुंगी'
तामीळ भाषिकांनी मराठी लोकांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या, असं दाखवताना ठाकरेंचे समर्थक इडली विकणाऱ्या एका गरीब 'अण्णा'ला पिटाळून लावताना दाखवले आहेत.

फोटो स्रोत, YOUTUBE/VIACOM
सिनेमाच्या उत्तरार्धातले बाळासाहेब जरी संपूर्ण हिंदुस्थानची बात करत असले, तरी इथं मात्र त्यांच्यासाठी तामीळ भाषिक 'बाहरवाले' आहेत.
मराठी माणसावर त्यांनी अन्याय केला आणि त्यांना दणका दिल्याशिवाय मराठी माणसाला नोकऱ्या मिळणार नाहीत, असा तर्क निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
'मुस्लिमांनी केला दगाफटका'
सिनेमाच्या पूर्वार्धात 'बाहेरच्या' लोकांविरोधात बोलणारे बाळासाहेब इंटरवेलनंतर मुस्लिमांविरोधात बोलू लागतात. ही त्यावेळच्या त्यांच्या राजकारणाची गरज असेल, पण सिनेमात हा टर्न दाखवताना स्पष्टीकरण दाखवणं निर्मात्यांना गरजेचं वाटलं असावं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
म्हणून बाळासाहेब आधी कसे मुस्लिमांशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करतात, पण नंतर मुस्लीमच हिंदूंवर हल्ले करतात, असं दाखवण्यात आलं आहे. मग बाळासाहेब म्हणतात की 'यांच्या'वर विश्वास ठेवणंच कठीण आहे.
पुढे हिंदू-मुस्लीम हिंसाचार दाखवला आहे. शिवसेनेच्या शाखेतून शस्त्रं पुरवली जात असल्याचंही दाखवलं आहे.
'रामाचा जन्म पाकिस्तानात झाला का?'
बाबरी मशीद माझ्याच शिवसैनिकांनी पाडली, असं बाळासाहेब बोलताना दाखवले आहेत. जेव्हा त्यांना लखनौच्या कोर्टात विचारतात की राम अयोध्येत जन्मल्याचा पुरावा काय, तेव्हा ते म्हणतात की 'तो काय कराचीत जन्मला होता की लाहोरमध्ये?'

फोटो स्रोत, YOUTUBE/VIACOM
कोर्टात त्यांचा वावर, देहबोली आणि भाषणबाजी अशी दाखवली आहे जणू ते सभेतच बोलत आहेत. न्यायाधीशही आदरयुक्त भीतीने सगळं ऐकताना दाखवले आहेत.
बाबराने हिंदूंवर अन्याय केला, म्हणून आम्ही मशीद 'साफ केली', असं बाळासाहेब म्हणतात. नंतर पाकिस्तानने बाँब फोडले, म्हणून पाकिस्तानविरोधात क्रिकेट खेळायला विरोध केला, असंही दाखवलं आहे.
कृष्णा देसाईंच्या खुनाचं समर्थन?
शिवसेना आणि डाव्या पक्षांमधल्या रक्तरंजित वैराचा उल्लेखही सिनेमात आहे. डावे पक्ष शिवसेनेच्या चांगल्या कामांना विरोध करतात आणि बाळासाहेबांवर हल्ला करतात, असंही दाखवण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, YOUTUBE/VIACOM
या हल्ल्यामुळेच डाव्यांना धडा शिकवण्याची भाषा ठाकरे करतात आणि नंतर कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाईंचा तलवारींनी खून होताना दाखवण्यात आला आहे. म्हणजे इथे खुनाचं स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केलाय, असं दिसतं.
आणीबाणीच्या पाठिंब्याचं स्पष्टीकरण
काँग्रेसला पदोपदी विरोध करणारे बाळ ठाकरे एकाएकी पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटतात आणि आणीबाणीला पाठिंबा देतात. त्यामुळे शिवसेनेवरची बंदी टळते. यामुळे ठाकरेंवर जोरदार टीका झाली होती.
बाळासाहेबांनी आणीबाणी दरम्यान काँग्रेसबद्दल भूमिका का बदलली, याचं स्पष्टीकरणही सिनेमात दिलं आहे. हा सिनेमा सुरू होतानाच सांगितलं आहे की काही प्रसंगांमध्ये नाट्य निर्माण करण्यासाठी बदल करण्यात आले आहेत.
त्यामुळे कोणता भाग खरा आणि कोणता बदल केलेला, हे ओळखणं कठीण आहे. बाळासाहेब आणि इंदिरा यांच्यात झालेल्या भेटीत नेमकं काय झालं, याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. पण तिथं केवळ ते दोघंच उपस्थित असतील, सत्य शोधण अवघड आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








