दिघेंच्या मृत्यूबद्दल निलेश राणेंनी बाळासाहेब ठाकरेंवर केलेल्या आरोपांत तथ्य आहे का?

आनंद दिघे आणि निलेश राणे

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, आनंद दिघे आणि निलेश राणे
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

'शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या हत्येसाठी बाळासाहेब ठाकरे जबाबदार होते. तसंच गायक सोनू निगमच्या हत्येचा कट बाळासाहेबांनी रचला होता,' असा आरोप काँग्रेस नेते निलेश राणे यांनी केला आहे. त्यानंतर शिवसेना आणि राणे कुटुंबात शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे.

दरम्यान नारायण राणे यांचे पुत्र निलेश यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांना 'फालतू' असं संबोधलं आहे. तसंच राणे यांच्या आरोपांना उत्तर देण्याइतपत ते मोठे नाहीत, असंही म्हटलं आहे. (शिवसेनेची सविस्तर प्रतिक्रिया या बातमीत पुढे दिली आहे.)

"नारायण राणेंच्या दहा वर्षांतील राजकारणात नऊ जणांचे बळी नेमके कोणी घेतले? हिंमत असेल तर नारायण राणेंनी याचं उत्तर द्यावं," असं आव्हान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीत केलं होतं.

त्याला उत्तर म्हणून नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर आरोप केले आहेत.

आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला?

आनंद दिघे यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याबद्दल आम्ही ठाण्यातील पत्रकार सोपान बोंगाणे यांना विचारलं.

त्यांनी सांगितलं, "दिघेंना हार्टचा प्रॉब्लेम होता. एकदा-दोनदा आम्हीच अॅडमिट केलं होतं त्यांना दवाखान्यात. कारण ते आमचे चांगले मित्र होते. ते व्यवस्थित उपचार घ्यायचे नाहीत. त्यांचं स्वत: कडे नीट लक्ष नसायचं. कधीकधी अर्धवट उपचार घ्यायचे, कधीकधी दवाखान्यातून अचानक निघून जायचे.

"गणपतीच्या 10 दिवसांच्या काळात ते पहाटेपर्यंत वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडे फिरत होते. त्यातच त्यांचा अपघात झाला. कारमधून जाताना एसटी आणि कारचा अपघात झाला आणि त्यात ते जखमी झाले. त्यांच्या पायाला मोठं फ्रॅक्चर झालं. उपचार घेताना त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला."

BALASAHEB

फोटो स्रोत, SEBASTIAN D'SOUZA/GETTY IMAGES

टाइम्स ऑफ इंडियामध्ये दिघेंच्या मृत्यूबद्दल प्रसिद्ध झालेल्या बातमीत लिहिलं होतं:

19 ऑगस्ट 2001 रोजी अपघात झाल्यानंतर आनंद दिघेंना ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. 20 तारखेला रविवारी त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली होती.

त्यानंतर सोमवारी संध्याकाळी 7.15 वाजता त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. 7.25 मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला. अखेर रात्री 10.30 वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी दिघे 50 वर्षांचे होते. हॉस्पिटलमध्ये दिघेंसोबत ठाण्याचे शिवसेना खासदार प्रकाश परांजपे होते.

त्यानंतर शिवसैनिकांनी हॉस्पिटल आणि बाहेर धुडगूस घातला आणि तोडफोड केली.

बाळासाहेब आणि दिघेंचे संबंध कसे होते?

पण ठाण्यात बाळासाहेबांपेक्षा दिघेंचं प्रस्थ मोठं व्हायला लागलं होतं, म्हणून त्यांना संपवण्यात आलं, अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. यावर बोंगाणे सांगतात, "मला काही तसं कधी वाटलं नाही. बाळासाहेबांचा दिघेंवर खूप विश्वास होता. बाळासाहेब त्यांचं कौतुक करायचे.

"आनंद दिघे एकाच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी काम करत होते. त्यांच्या कामाचं क्षेत्र ठाणे होतं. पण बाळासाहेबांच्या कामाचं क्षेत्र महाराष्ट्र होतं. त्यामुळे या दोघांची तुलना होऊ शकत नाही. आनंद दिघे मोठे होते पण ते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये. याचा अर्थ असा होत नाही की, ते बाळासाहेबांच्या स्पर्धेत होते."

ठाणे वैभव या वर्तमानपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्या मते, "आनंद दिघे आणि बाळासाहेब यांचं नातं चागंल होतं. बाळासाहेब त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचे. शिवाय बाळासाहेब वयानंही त्यांच्यापेक्षा मोठे होते. बाळासाहेबांना त्यांची भीती वाटायचं काही कारणच नव्हतं, त्यामुळे दोघांमध्ये स्पर्धा असण्याचं कारणही नव्हतं."

पण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यात सारंकाही अलबेल नव्हतं, असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांचं मत आहे. अकोलकरांनी शिवसेनेवर 'जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' हे पुस्तक लिहिलं आहे.

ते सांगतात, "आधी ठाकरे आणि आनंद दिघे यांचे संबध चांगले होते, ठाणे आणि परिसर ठाकरेंनी दिघेंना आंदण दिला होता. या भागात दिघेंचा शब्द अंतिम मानला जायचा. त्यावेळी बाळासाहेबांना असं वाटलं असावं की हे आपल्यापेक्षाही मोठे होतात की काय, कोणत्याही राजकीय नेत्याला स्वतःपेक्षा दुसऱ्या नेत्याची प्रतिमा मोठी झालेली आवडत नाही आणि त्यामुळेच त्या दोघांमध्ये तणाव निर्माण झाला."

कोण होते आनंद दिघे?

"आनंद दिघे विद्यार्थी दशेपासून शिवसेनेत होते. बाळासाहेबांची मोहिनी त्यांच्यावर होती. बाळासाहेबांच्या सभांना ते जायचे. त्यामुळे ते बाळासाहेबांकडे आकर्षित झाले. शिवसैनिक म्हणून काम करू लागले. त्यांची धडाडी पाहून त्यांना पदं मिळत गेली. ठाण्यासारख्या जिल्ह्यात आनंद दिघे यांनी फुलटाईम शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं," असं पत्रकार मिलिंद बल्लाळ सांगतात.

पुढे त म्हणतात, "दुसरी गोष्ट म्हणजे आनंद दिघे यांना कोणत्याही पदाची अभिलाषा नव्हती. निवडणूक लढवायची नाही असं त्यांनी ठरवलं होतं. ठाण्यातील शिवसेनेचे ते किंगमेकर होते."

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

सोपान बोंगाणे सांगतात, "आनंद दिघेंनी एक सामान्य शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली. नंतर त्यांनी शिवसेनेसाठी स्वत:ला वाहून घेतलं. इतकं की त्यांनी लग्नसुद्धा केलं नाही. त्यांच्या घरी आई, भाऊ आणि बहीण असे. परंतु जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आल्यावर त्यांनी घर वगैरे सगळं दूर केलं. जिथं कार्यालय होतं, तिथंच राहायचे, तिथंच झोपायचे. कार्यकर्ते त्यांना डबा आणून द्यायचे. संन्यासी टाईप आयुष्य होतं त्यांचं."

पुढे ते म्हणतात, "ठाण्यातले शिवसैनिक आनंद दिघेंचा जीव की प्राण होते. दोघांनाही एकमेकांबद्दल आदर आणि आपुलकी होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर संतप्त होऊन शिवसैनिकांच्या काही उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या."

शिवसेनेची भूमिका काय?

आनंद दिघे यांच्या हत्येला बाळासाहेब ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. यावर खासदार विनायक राऊत सांगतात, "निलेश राणे यांच्यासारख्या फडतूस माणसाला आम्ही काही मानत नाही. तुम्ही याकडे कशाला लक्ष देताय? तो माणूस शुद्धीत बोललाय की नाही ते आधी बघावं लागेल. निलेश राणेंची लायकी तरी आहे का तेवढं बोलायची? असल्या फालतू माणसाच्या आरोपांना उत्तर द्यायची आम्हाला गरज वाटत नाही. नारायण राणे बोलले तर देऊ काय उत्तर द्यायचं ते."

आनंद दिघे

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, आनंद दिघे

सोनू निगमच्या हत्येचा कट बाळासाहेबांनी रचल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. यावर राऊत सांगतात, "निलेश राणेंचा त्यावेळी जन्म तरी झाला होता का?"

नारायण राणे विशीत असतानाच शिवसेनेत सक्रिय झाले. शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा मोठा राजकीय प्रवासही त्यांनी शिवसेनेतच केला. मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर 2005 मध्ये त्यांनी शिवसेना सोडली.

त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रात आघाडी सरकार असताना त्यांनी महसूल आणि उद्योगमंत्री म्हणूनही काम पाहिलं.

मात्र अशोक चव्हाणांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. सध्या ते भाजपच्या कोट्यातून खासदार आहेत. त्यांचे पुत्र निलेश हे रत्नागिरीचे माजी खासदार आहेत. तर दुसरे पुत्र नितेश हे काँग्रेसचे आमदार आहेत.

शिवसेना सोडल्यापासून राणे विरुद्ध शिवसेना हा सामना महाराष्ट्रानं अनेकदा पाहिला आहे. आणि आता 2019 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)