नितीन गडकरींची वक्तव्यं मोदी, शहांच्या विरोधासाठी की भाजप, संघाची पर्यायी खेळी?

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळीही त्यांच्या एका वक्तव्याने राजकीय धुरळा उडवून दिला आहे.

मुंबईतल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले, " स्वप्न दाखवणारे नेते लोकांना आवडतात, पण जर ही स्वप्नं पूर्ण झाली नाहीत तर जनता अशा नेत्यांना झोडपून काढते. मी स्वप्न दाखवणारा नेता नाही, मी जे बोलतो ते 100 टक्के करून दाखवतो."

गडकरी यांच्या या वक्तव्यातून राजकीय अर्थ काढला जात नसेल तरच नवलच.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमिन (AIMIM) या पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी ही संधी साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

गडकरी मोदींना आरसा दाखवत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. तर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी गडकरी यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी ट्वीटवर केली आहे.

पण गडकरी यांचे हे पहिलंच वक्तव्य नाही. गेल्या काही दिवसांत त्यांनी सातत्याने अशी वक्तव्य केली आहेत, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे राष्ट्रीयअध्यक्ष अमित शहा यांच्या रोखाने होती.

अर्थात गडकरी यांनी माझ्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ लावला जात असून 2019च्या निवडणुका मोदींच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असा खुलासाही होता. मी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही... मुळात अशी स्पर्धाच नाही, असंही ते म्हणाले.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी केलेलं वक्तव्य शहा यांना उद्देशून होतो असं सांगितलं जातं. "आमदार आणि खासदारांच्या सुमार कामगिरीची जबाबदारी ही पक्षाध्यक्षांचीच असते... मी पक्षाध्यक्ष असेन आणि माझ्या पक्षाचे आमदार, खासदार चांगली कामं करत नसतील तर त्याची जबाबदारी कुणाची असेल? ती माझीच असेल... तुम्ही उत्तम वक्ते असलात म्हणून निवडणुकीत विजय मिळत नाही." असं विधान त्यांनी केलं होतं. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधल्या भाजपच्या पराभवानंतर या वक्तव्यांना मोठा राजकीय अर्थ मिळाला होता.

भाजप अध्यक्ष अमित शहा आणि त्यांचे पाठीराखे नरेंद्र मोदी यांच्यावर ही अप्रत्यक्ष टीका आहे का, अशा चर्चेला त्यावेळी सुरुवात झाली होती.

पुण्यातील कार्यक्रमात "पक्ष नेतृत्वाने पराभवाची जबाबदारी स्वीकारायला हवी. एखाद्या पराभवाची जबाबदारी जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत पक्षनिष्ठा सिद्ध होत नाही," असा टोमणा त्यांनी मारला. त्यांचा टीका शहांवर असली तरी निशाणा मोदींवर होता, असं काही जाणकार सांगतात.

'हा पर्यायी गेम-प्लॅन'

गडकरी यांची ही वक्तव्य मोदींच्या विरोधात आहेत, असं म्हणणं योग्य ठरणार नाही अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक सबा नक्वी यांनी दिली.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "निवडणुका तोंडावर असल्याने अशा प्रकारच्या पर्यायी 'गेम प्लॅन'चा हा भाग असू शकतो. समजा जर मोदींचा पराभव झाला तर पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांचं नाव पुढं येऊ शकतं."

गडकरी यांची ही वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीनेच सुरू आहेत, असं त्या म्हणाल्या.

"गडकरी संघाच्या जवळचे मानले जातात. शिवाय ते भाजपचे राष्ट्रीयअध्यक्ष होते आणि सध्या मंत्री म्हणून काम करताना कुशल प्रशासक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. सर्वच पक्षांतील नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले आहेत."

निवडणुकांत पर्यायी स्ट्रॅटजी असते, गडकरी यांची वक्तव्य या दृष्टिकोनातून पाहावी लागतील. येत्या निवडणुका भाजप मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवणार आहे, हेही निश्चित आहे, असं त्या म्हणाल्या.

'संघ गडबड करत नाही'

नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक या मताशी सहमत नाहीत. "गडकरी जे बोलत आहेत ते राजकीय परिस्थितीवरील भाष्य आहे. या वक्तव्यांच्या श्लेष काढून मोदी किंवा शहांशी जोडता येणार नाही.

संघाची कार्यपद्धती जर लक्षात घेतली तर असा कोणताही निर्णय घाईगडबडीत होणार नाही. समजा मोदींना पुरेसे खासदार निवडणून आणता आले नाही तर नितीन गडकरी यांना मोदींच्या मागे शक्ती लावायला सांगितलं जाऊ शकतं. मला पंतप्रधान केलं तरचं मी ही जबाबदारी घेतो असं म्हणण्याचा त्यांचा स्वभाव नाही," असं पाठक म्हणाले

'गडकरी लष्कर-ए-होयबा नाहीत'

'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक यदू जोशी म्हणतात, "नितीन गडकरी यांचं भाषण नीट ऐकलं तर त्यांनी मोदी किंवा शाह यांचं नाव कुठेही घेतलं नाही. पराभवाचा संदर्भही दिलेला नाही. सध्याचा काळ भाजपसाठी संवेदनशील काळ आहे. अगदी गडकरींनीही तसं म्हटलं आहे.

"दुसरीकडे त्यांनी संकेताने का होईना असे संदर्भ दिल्यामुळे, त्याचा संबंध मोदी आणि शाह यांच्याशीच लावणार. तसा तो लावलाही जातो. या सगळ्या गोष्टींचं गडकरींसारख्या परिपक्व नेत्याला भान नसेल असं होऊ शकत नाही.

"परंतु तो त्यांचा स्वभावच आहे. ते कधीही 'लष्कर-ए-होयबा' होऊ शकत नाही. त्यांच्या मनाला येईल ते बोलणार, मग ते तिखट, कडू कसंही असो. बोटचेपेपणा त्यांना पसंत नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा 'कहीं पे निगाहे कहीं पे निशाना' असा अर्थ निघाल्याची शक्यता आहे.

"सध्याच्या परिस्थितीत भाजपला बहुमत मिळालं नाही तर सर्वसमावेशक उमेदवार म्हणून मोदींपेक्षा नितीन गडकरी नक्कीच उजवे आहेत. त्यांचे सर्व पक्षांत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे या परिस्थितीला गडकरी यांनी एक संधी म्हणून बघायला हवं आणि संयम ठेवायला हवा. मराठी नेतृत्वाला ऐन संधीच्या वेळी संयम सोडण्याचा पूर्वेइतिहास आहे. त्या पंक्तीत गडकरींनी येऊ नये," असा सल्लाही यदू जोशी द्यायला विसरत नाहीत.

'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार यांच्या मते गडकरी स्पष्टवक्ते आहेत. "त्यांना जे हवं ते स्पष्टपणे बोलतात. त्यामुळे पंतप्रधानपद डोळ्यासमोर ठेवून गडकरी अशी वक्तव्यं करत आहेत असं मला वाटत नाही."

'मित्रपक्षांसाठी अप्रत्यक्ष संदेश'

"गडकरी हे अत्यंत चाणाक्ष राजकारणी आहे. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांच्या पक्षातील अडचणी काय आहेत त्याची चांगलीच जाण आहे. आता जे काही पक्षात जे सुरू आहे, त्याला उद्देशून ही विधानं आहेत," असं ज्येष्ठ पत्रकार जयदीप हर्डीकर यांना वाटतं.

"गडकरी हे अतिशय हाय प्रोफाईल नेते आहे. उद्या समजा बहुमत मिळालं नाही तर नेता कोण हा प्रश्न उपस्थित होईल. अशा परिस्थितीत आपल्या जागा निर्माण करण्याच्या ते प्रयत्नात आहे. सध्या ते करत असलेली वक्तव्यं ही एक विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच केलेली आहेत. त्यामुळे ही विधानं आपल्या पक्षातील लोकांना उद्देशून तर आहेच. पण मला असं वाटतं की आपल्या पक्षापेक्षा मित्रपक्षांना डोळ्यांसमोर ठेवून मलाही एक पर्यायी उमेदवार म्हणून बघा असा संदेश ते देत असावेत. गडकरी जे बोलतात, तेच ते करतात त्यामुळे ते उगाच बोलले नसावेत," असंही हर्डीकर यांना वाटतं.

'नाराजी उघड करण्याचा प्रयत्न'

ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सिंह म्हणतात, "अमित शाह आणि गडकरी यांचे संबंध फारसे चांगले नाही. ते दोघं एकमेकांना पसंत करत नाहीत. त्यामुळे शहांवर हल्ला करण्याची हीच उत्तम संधी आहे, असं गडकरींना वाटलं. भाजपचा गेल्या काही काळात साततत्याने विजय होत होता. आता तीन राज्यांत झालेला पराभव झाला. प्रत्येक निवडणुकीच्या निकालानंतर विजयाचं सगळं श्रेय अमित शहांना जायचं. सध्याच्या वातावरणात भाजप 2014 सारख्या 282 जागा पुन्हा जिंकू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत नरेंद्र मोदींशिवाय एखाद्या दुसऱ्या नावावर विचार झाला तर त्या परिस्थितीसाठीसुद्धा ते मोर्चेबांधणी करत आहेत."

"गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की जर सामाजिक बदल होत नसतील तर अशा विकासाला काही अर्थ नाही. तुम्ही भाषण चांगलं देता मात्र त्यामुळे निवडणुकीत विजय मिळतोच असं नाही, असं ते म्हणाले. त्यामुळे हा पंतप्रधानांवरही एक सौम्य हल्ला आहेच," सिंह पुढे म्हणतात.

"ऑक्टोबर 2014 मध्ये सुद्धा गडकरींना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र अमित शाह आणि मोदी यांनी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. त्यामुळे ती नाराजी आहेच. ही सगळी नाराजी दाखवण्याची संधी त्यांना आतापर्यंत मिळाली नाही," असं सिंह यांना वाटतं.

जेव्हा गडकरी अमित शहांना तास न् तास वाट पहायला लावायचे...

ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांनी या विषयी आणखी माहिती दिली. ते सांगतात,

"ही गोष्ट नितीन गडकरींच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे अमित शाह गुजरातमधून बाहेर होते आणि त्यावेळी दिल्लीत राहत होते. अमित शाह जेव्हा आपल्या पक्षाध्यक्षांना भेटण्यासाठी जायचे, तेव्हा त्यांना बाहेर बसून बराच वेळ वाट पहावी लागायची. तेव्हा अमित शाह यांचे दिवस फार चांगले नव्हते.

"गडकरी महाराष्ट्राच्या राजकारणातून येऊन थेट पक्षाध्यक्ष बनले होते. मात्र वेळ नेहमीच सारखी राहत नाही. डिसेंबर 2014 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित होणार होतं. अमित शाह आता पक्षाचे अध्यक्ष बनले होते. गडकरींची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रीपदाची होती. मात्र तेव्हा ते मुख्यमंत्री बनू शकले नाहीत.

"मात्र त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड होणं जास्त धक्कादायक होतं. फडणवीसांना गडकरी मुलाप्रमाणे मानायचे. त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवणं हा मोदी-शाह जोडीचा विचार होता. तेव्हापासून गडकरी एका संधीच्या शोधात होते. मोदी-शाह यांच्यावर हल्ला करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं कदाचित त्यांना वाटत असावं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)