अवनीसह महाराष्ट्राने 2 वर्षांत गमावले 39 वाघ

फोटो स्रोत, FOREST DEPARTMENT
- Author, नीतेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
ताडोबा व्याघ्र प्रकल्पानजीक एका शेताभोवतीच्या कुंपणात सोडण्यात आलेल्या विजेचा करंट लागून एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना डिसेंबरला नोंदवली गेली. अशा प्रकारे विजेचा झटका लागून वाघांचा मृत्यू होण्याची गेल्या 2 वर्षांतील ही 7वी घटना आहे. वाघांच्या जतन आणि संवर्धनासाठी सरकार विविध प्रयत्न करत असताना विविध कारणांमुळे गेल्या 2 वर्षांत 39 वाघांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिकरीत्या मृत्यू पावलेल्या 24 वाघांतील 7 वाघांचा बळी हा जंगलक्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी आपापसांत झालेल्या संघर्षामुळे झाला आहे. तर 10 वाघांची शिकार झाल्याची नोंद वन विभागाने केली आहे.
यातूनच वाघाच्या संवर्धनासाठी अधिवास विकास आणि जंगल संवर्धनाचा सर्वसमावेशक कार्यक्रम हाती घ्यावा घेण्याची गरज आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात T7 उर्फ तारा वाघिणीच्या 3 वर्षांच्या बछड्याचा नुकताच बळी गेला आहे. गेल्या दीड महिन्यांत अवणीसह 5 वाघांचा मृत्यू झाल्यानं वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
8 डिसेंबरला काय घडले?
मोहुर्ली प्रवेशद्वारापासून 4 किलोमीटर अंतरावर भामढेळीच्या शेतशिवारात हा वाघ मृतावस्थेत आढळला. शेतात लावलेल्या विद्युत तारेच्या कुंपणाचा करंट लागून त्याचा मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यांपासून ताडोबाच्या बफर क्षेत्रात फिरत असलेला वाघ भद्रावती येथून भामढेळी परिसरात आला होता. हा परिसर शेतशिवाराचा असल्यानं वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक शेतकऱ्यांनी तारांच्या कुंपणात विजेचा प्रवाह सोडला आहे. ऋषी ननावरे या शेतकऱ्याच्या शेतातील विजेच्या कुंपणाचा धक्का लागून या वाघाचा मृत्यू झाला.
8 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता भामढेळी शेतशिवारात वाघ मृतावस्थेत पडला होता. ननावरे यांनी भीतीपोटी ही माहिती वनविभागापासून माहिती लपवून ठेवली होती. पण काही वेळानंतर वनविभागाला ही माहिती मिळाली आणि वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून कुंपणाच्या काड्या, बांबू खुंटी, विद्युत तारा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच वाघावर शवविच्छेदन करून वाघाचे दहन करण्यात आलं. संबंधित शेतकऱ्यालाही वनविभागानं ताब्यात घेतलं आहे.
मृत बछडा T7 वाघिणीचा होता. भारतीय वन्यजीव संस्थेने त्याला रेडिओ कॉलर लावली होती.
अशीच घटना गेल्यावर्षी समोर आली होती. बोर अभयारण्य क्षेत्रात विद्युत कुंपणाच्या तारांचा स्पर्श झाल्यानं एका वाघिणीचा मृत्यू झाला होता. नरभक्षक ठरवून तिला ठार मारण्याचे आदेश वनविभागाला मिळाले होते. ब्रह्मपुरीच्या जंगलात या वाघिणीने दोघांना ठार केलं होतं. त्यानंतर बोर अभयारण्य परिसरात तिचा मृत्यू झाला होता.
3 बछड्यांचा अपघाती मृत्यू
गेल्याच महिन्यात चंद्रपूर गोंदिया रेल्वे मार्गावरील जुनोना जंगल परिसरात सहा महिन्यांच्या 3 बछड्यांचा मृत्यू झाला होता. बल्लापूर एक्सप्रेसच्या धडकेत वाघिणीचे तीन बछडे मृत्युमुखी पडले होते. त्यात एका मादीचाही समावेश होता.
राज्यात 2 वर्षांत 39 वाघांचा मृत्यू
"महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षांमध्ये जवळपास 39 वाघांचा मृत्यू झालाय. यातल्या 5 वाघांचा मृत्यू अपघाती तर 10 वाघांची शिकार करण्यात आली आहे. 24 वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. बफर क्षेत्रात 39 वाघांपैकी 2017 मध्ये विद्युत कुंपणाचा स्पर्श झाल्याने 6 वाघांचा बळी गेला आहे. तर यावर्षी एका वाघाचा मृत्यू विजेच्या धक्क्यानं गेलाय," असं राज्याचे प्रधान वन संरक्षक ए. के. मिश्रा यांनी दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं.

फोटो स्रोत, FOREST DEPARTMENT
आईपासून विभक्त झाल्यानंतर सशक्त वाघांसोबत स्पर्धा करण्यात अपयशी ठरलेले वाघ व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्याचे कोअर क्षेत्र सोडून वन्यजीव संचारमार्गाचा आश्रय घेतात. त्यामधूनच मानव आणि वन्यजीव संघर्ष बळावतो.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील 79 गावांमध्ये एकूण 21860 कुटुंब राहतात. त्यांच्यातील मान -वन्यजीव संघर्ष थांबवण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. बफर क्षेत्रात तसंच वन्यजीव संचार मार्गात येणाऱ्या गावांमध्ये शेतांना सौर कुंपण, चाऱ्याची निर्मिती, फळबाग लागवड, जलसंधारण करण्यावर भर देण्यात आली. बफर क्षेत्रातील 150 गावांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबवण्यात आली आहे. मात्र T7 वाघिणीच्या बछड्याच्या मृत्यूनं वन विभागाच्या संपूर्ण योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

फोटो स्रोत, FOREST DEPARTMENT
वाघांची संख्या 90च्यावर
ताडोबा-अंधारी प्रकल्पात 60 बफर झोन आहेत. प्रकल्पात 90च्या वर वाघाची संख्या आहे. त्याशिवाय इतर वन्य प्राणीही मोठ्या प्रमाणावर आहेत. या भागाच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक महत्त्वाची आहे.
वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी वाघांच्या वाढत्या मृत्यूंवर चिंता व्यक्त केली.
ते म्हणतात, "वाघांच्या वाढत जाणाऱ्या मृत्यूची कारणमीमांसा करून प्रत्यक्षात तळागळात काम होणे गरजेचे आहे. वाघांच्या संरक्षणासाठी प्रचंड रुपये खर्च केला जातो. त्यानुसार 21 राज्यांत पसरलेल्या 50 व्याघ्र प्रकल्पांवर 15 हजार कोटींचा खर्च करण्यात आला. पण वाघांचा मृत्यू दर कमी करण्यात वनविभागाला यश आलेलं नाही."
जंगल संवर्धानाची गरज
वाघ दीड वर्षांचा झाला की आईपासून विभक्त होतो. नर वाघाला स्वतःचं जंगल लागतं. सर्वसाधारणपणे 6 ते 60 चौरस किलोमीटर इतकी टेरिटोरी या वाघाला लागते. वाघ विभक्त झाल्यानंतर तो स्वतःचं जंगल क्षेत्र शोधतो. अशा वेळी एखाद्या जंगल क्षेत्रावर पूर्वीच दुसऱ्या वाघाचा ताबा असेल तर दोन वाघांत संघर्ष होतात. बऱ्याच वेळा वयस्कर वाघ माघार घेऊन जंगलक्षेत्र सोडून देतो. जंगलक्षेत्रात उपलब्ध भक्ष्य आणि माद्यांची संख्या यावर या क्षेत्राच आकार ठरतो. अधिवास क्षेत्र चांगलं असेल तर वाघांची संख्या वाढते, त्यातून असे संघर्षही वाढतात या अनुषंगाने जर विचार केला तर जंगलांचं अधिकाधिक संवर्धन आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे यांनी दिली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








