'ही गुलाबी अळी लहान दिसते पण ती संपूर्ण पीक पोखरून टाकू शकते' ; कापसावर पुन्हा बोंडअळीचं संकंट

बोंडअळी

फोटो स्रोत, Jaideep Hardikar

    • Author, जयदीप हर्डीकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"मी हे उघडलं तर तुम्हाला शंभर टक्के अळी दिसेल..." अशोक मुलार (58) यांनी पैज लावली आणि आपण कसे बरोबर आहोत हे दाखविण्यासाठी त्यांनी नुकतंच तोडलेलं कापसाचं फुल उघडून दाखवलं. त्यांचं 5 एकरावरचं पीक हातचं जाण्याच्या मार्गावर आहे.

फुल उघडताच त्यातून एक मिलीमीटरपेक्षाही लहान अशी गुलाबी अळी फुलाच्या कुक्षीतून (पाकळीच्या आत असलेला कळीसारखा दिसणारा भाग) वळवळत वर आली.

त्या छोट्या अळीला तळहातावर घेत अशोक म्हणतात, "तुम्ही बघताय? ही दिसते लहान, पण तिला आताच नष्ट केली नाही तर ती माझं अख्खं पीक उद्ध्वस्त करू शकते. बोंडअळी दिसायला लहान असली तरी ती एकावेळी दीडशे अंडी घालू शकते आणि कापसाच्या एका हंगामात तब्बल चारवेळा अंडी देते. वेळीच लक्ष दिलं नाही तर ही कीड संपूर्ण पीक पोखरून टाकेल, इतक्या झपाट्यात वाढते."

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील करजगावमध्ये अशोक मुलार यांची शेती आहे. त्यांच्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सध्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेत आहे.

गेल्यावर्षीसुद्धा त्यांच्या कपाशीवर बोंडअळींचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र हंगामाच्या शेवटी जेव्हा अळीने संपूर्ण पीक जवळपास नष्ट केलं, त्यावेळी त्यांच्या हा हल्ला लक्षात आला. यावेळी मात्र ते सजग आहेत. "माझ्या आसपासचे शेतकरी अजूनही जागरूक असल्याचं मला वाटत नाही," मुलार सांगतात.

मुलार यांनी त्यांच्या 17 एकर जमिनीवर वेगवेगळ्या कंपनीचे जवळपास दोन-तीन प्रकारचे बीटी बियाणे पेरले. मात्र सर्वच बियाण्यांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसतो.

मुलार सांगतात, "गेला आठवडाभर मी स्वतः पिकांमधून फिरून किडलेली फुलं शोधून बोंडअळी नष्ट करत आहे." जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी पेरणी केली होती.

बियाणे कंपनीविरोधात पहिल्यांदाच तक्रार

करजगावहून शेकडो मैलांवर वरुड तालुक्यातच संजय साबळे (45) यांची दोन एकर शेती आहे. दुसऱ्याची चार एकर शेतीही ते कसतात.

गेल्या आठवड्यातच त्यांनी बियाणे विकणाऱ्या तीन कंपन्यांविरोधात पोलिसांत तक्रार केली. तामिळनाडूतील मेसर्स रासी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, आंध्रातील बायर बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नागपुरातील अंकुर सीड्स या तीन कंपन्यांच्या विरोधात साबळे यांनी तक्रार केली आहे. भारतात बियाणे कंपनीविरोधात अशाप्रकारे पहिल्यांदाच तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वरुड पोलिसांनी कंपन्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. IPCच्या कलम 420, 427, 34 आणि महाराष्ट्र कपाशी बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री आणि दरनिश्चिती नियमन) कायदा 2009च्या कलम 14(1) अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या कंपन्यांविरोधात कारवाईची शक्यता धूसरच आहे.

बोंडअळी

फोटो स्रोत, Jaideep Hardikar/BBC

पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तेव्हा शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे कीड व्यवस्थापन करावं, अशी सूचना या कंपन्या बियाण्यांच्या पाकिटासोबतच्या माहिती पत्रकात देतच असतात.

साबळे यांच्या वाडेगावात कृषी अधिकाऱ्यांनी बोंडअळीसाठी पाहणी दौरा केला. त्यावेळी संपूर्ण पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहणीत स्पष्ट लक्षात आल्याचं साबळे यांनी सांगितलं.

आम्ही गेल्या आठवड्यात वाडेगावात गेलो त्यावेळी त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घ्यावी, ही विनंती करण्यासाठी साबळे अमरावतीत जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. संपूर्ण विदर्भातच अशा प्रकारचा संताप पाहायला मिळत आहे.

बोंडअळी

फोटो स्रोत, Jaideep Hardikar/BBC

मात्र राज्य सरकारचं वेगळंच म्हणणं आहे. त्यांच्या निष्कर्षानुसार राज्यात फक्त 900 गावांमध्येच कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे आणि गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र ही तर हंगामाची सुरुवात आहे. हिवाळ्यात जेव्हा पीक कापणीची वेळ येते तेव्हाच या बोंडअळीची पैदास झपाट्याने होते.

दुसऱ्या दिवशी फोनवर बोलताना साबळे यांची काळजी स्पष्ट जाणवत होती. "बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, त्या बनावट बियाणं विकतात,"असं साबळे यांचं म्हणणं आहे. त्यांच्या बनावट बियाण्यांच्या आरोपावर फार कुणी विश्वास ठेवणार नाही. मात्र मुख्य मुद्दा वेगळा आहे, ज्याकडे साबळेंसारखे शेतकरी आणि शेतकरी नेते दुर्लक्ष करत आहेत.

बीटी तंत्रज्ञानाला तडा

ही बनावट बियाण्यांची समस्या नाही तर Central Institute of Cotton Technologyचे (CICR) तत्कालीन संचालक डॉ. केशव राज क्रांती यांनी 2016मध्ये एका कॉटन जर्नलमध्ये लिहिल्याप्रमाणे बीटी तंत्रज्ञानाला तडा गेला आहे.

"शेतकऱ्यांना कमी दर्जाच्या बीटी बियाण्यांशी जुळवून घ्यावं लागणार आहे आणि ज्या बोंडअळीच्या समूळ उच्चाटनासाठी बीटी बियाणं बाजारात आलं त्याच बोंडअळी संक्रमणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागेल," असं त्यांनी म्हटलं आहे. 2016 पासून बोंडअळींचा बीटी कपाशीवर प्रादुर्भाव वाढतोच आहे.

गुलाबी बोंडअळी
फोटो कॅप्शन, गुलाबी बोंडअळी

गेल्यावर्षी बोंडअळींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. या अतिफवारणीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात किटकनाशकाची विषबाधा होऊन 50 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते देवेंद्र भुयार म्हणतात, "ही समस्या तात्काळ सोडवली नाही तर शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागेल."

भुयार यांच्या प्रयत्नांमुळे पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली होती. त्याबाबत भुयार सांगतात, "पोलीस तक्रार एक भाग झाला. मात्र शेतकऱ्यांना जागरुक करण्यासाठी कृषी विभागाने सक्रीय भूमिका बजावावी, असं आम्हाला वाटतं."

यंदाही परिस्थिती चांगली नाही

वरुड आणि मराठवाड्यातील जालन्यामध्ये यावर्षीच्या सुरुवातीलाच बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. कपाशीचं पीक घेणाऱ्या इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही जसजसा हंगाम संपत येईल तसा पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढेल, अशी भीती वाटते आहे.

ही एवढीशी अळी पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन यावर किती मोठा प्रभाव टाकू शकते, याची पुरेपूर कल्पना शेतकऱ्यांना असल्याने त्यांची काळजी वाढत आहे.

गेल्यावर्षी गुलाबी बोंडअळींच्या आक्रमणानं हजारो हेक्टरवरचं पीक उद्ध्वस्त केलं. गेल्या 30 वर्षातलं सर्वाधिक नुकसान झालं.

कापूस

फोटो स्रोत, Gajanan Umate

कृषी आणि महसूल खात्यानं केलेल्या सर्वेक्षणाच्या निकषानुसार वर्ष 2017-2018मध्ये राज्यातील कपाशीखाली असलेल्या 42 लाख हेक्टरपैकी 80% पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादन 33 ते 50 टक्क्यांपर्यंत घसरलं आहे.

मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानामुळे कापूस आणि गाठींच्या उत्पादनात 40% घट होईल, असा अंदाज कृषी खात्यानं वर्तवला होता. प्रत्यक्षात केवळ 90 लाख गाठींचं (प्रत्येक गाठीत 172 किलो कापूस) उत्पादन झालं. एक क्विंटल कापसात 34 किलो कापूस, 65 किलो सरकी (तेल काढण्यासाठी वापरतात) आणि एक टक्का कचरा निघतो. स्थानिक बाजारात एका क्विंटलला जवळपास 5 हजारांपर्यंत भाव मिळतो.

तक्रार दाखल करणारे साबळे म्हणतात, "माझ्या शेतातली बोंडअळी नष्ट करण्यासाठी मी स्वतः माझ्या हाताने कपाशीची हजारो फुलं तोडली. महागडी किटकनाशकं फवारली. मात्र हा हंगाम कसा निघेल, याबद्दल मला शंकाच आहे."

हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनाही काळजी लागून आहे. गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावाचं हे दुसरं वर्ष आहे आणि परिस्थिती फार चांगली नाही.

बीटीबाबत राज्य सरकारनंच काय ते ठरवावं - केंद्र सरकार

वरुड आणि आसपास हंगामाच्या सुरुवातीलाच बोंडअळींचा प्रादुर्भाव दिसला. मात्र शेतकऱ्यांना या समस्येची कल्पना आहे आणि तिचा सामना कसा करायचा, याचीही माहिती आहे, अशी प्रतिक्रिया तालुका कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर यांनी गेल्या आठवड्यात बीबीसीशी बोलताना दिली.

यावर्षी गावोगावी जागरुकता मोहीम राबवल्याचं ते सांगतात.

"यावर्षी समस्या आहे. मात्र तिचा योग्य पद्धतीने सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत," असा दावा त्यांनी केला आहे.

यवतमाळ शेतकरी

फोटो स्रोत, Gajanan Umate

"यंदा कृषी विभागानं राज्यभर फेरोमोन सापळे वाटले आहेत. कपाशीच्या फुलांवर अंडी घालण्याआधीच किडीला बाहेर काढण्याची ही सोपी पद्धत आहे. मात्र तरीही शेतकरी साशंक आहेत. शेतकऱ्यांना किटकनाशकाचा वापर करावा लागेल," असंही आगरकर म्हणतात.

मुलार आता त्यांच्या शेतातील कपाशीच्या किडीचा प्रादुर्भाव झालेली फुलं शोधण्यात निष्णात झालेत. अशा फुलांना रोसेट फुलं म्हणतात. याच फुलांमध्ये अळ्या वाढतात आणि अंडी घालतात. ही फुलं डोमच्या आकाराची असतात. तिला स्वतः शोधून नष्ट करावी लागतात.

या अळींच्या उच्चाटनासाठी किटकनाशकंही उपयोगी नसतात. कारण त्या फुल बंद करून आत बसतात आणि फुलापासून कापसाचं बोंड तयार होण्याआधीच फुल आतून पोखरुन तिथे अंडी घालतात.

कापूस

फोटो स्रोत, Gajanan Umate

या गुलाबी बोंडअळींना तसंच राहू दिलं तर त्या कापसाच्या एका हंगामात चार वेळा शेकडोंच्या संख्येनं अंडी घालू शकतात आणि कापसाची हजारो बोंडं आतून पोखरून टाकू शकतात.

बोंडअळींच्या अळ्या कपाशीच्या कळी आणि फुलांवर वाढतात आणि कपाशीच्या बोंडांना पोखरुन टाकतात. कळीमध्ये भोक पाडतात तेव्हा ते तयार होत असलेल्या परागकोश, स्त्रीकेसर यावर जगतात. कधीकधी बिजांडावरही. प्रादुर्भाव झालेलं फुल कधी उमलत नाही. तिथे गोलगोल पाकळ्यांसारखा भाग दिसतो.

नव्या बोंडांवर अळीचा प्रादुर्भाव झाला तर काही दिवसात ती बोंडं गळून पडतात. मात्र मोठी बोंडं रोपावरच राहतात. त्या बोंडातील बिया खराब होतात आणि कापूस डागाळतो.

या समस्येची दखल केंद्रीय कृषी मंत्रालयानेही घेतली आहे. मात्र कापसाच्या बीटी बियाण्याला रद्द करण्याची महाराष्ट्र आणि इतर राज्यांची मागणी त्यांनी फेटाळली आहे. उलट कापूस उत्पादन करणाऱ्या राज्यांनीच या समस्येचा सामना करावा, असे आदेश दिले आहेत.

गुलाबी अळीचं पुनरागमन

देशाच्या कृषी क्षेत्रात गुलाबी बोंडअळीच्या पुनरागमनची धोक्याची घंटा वाजली ती 2015मध्ये. त्यावर्षी गुजरात आणि महाराष्ट्रासह देशातील सर्व प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये शेतात उभ्या असलेल्या पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला.

जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजेच जनुकीयरित्या संशोधीत बीटी तंत्रज्ञानाचं हे मोठं अपयश होतं. यामुळे भारतीय कापूस संशोधन संस्था पुरत्या हादरल्या.

त्यावर्षी झालेलं पिकाचं नुकसान 2017-18 मधील नुकसाना इतकं मोठं नव्हतं.

कापूस उत्पादक शेतकरी

फोटो स्रोत, SEBASTIAN D'SOUZA/AFP/Getty Images

मात्र 2016साली नवी दिल्लीत झालेल्या Indian Council of Agriculture Research (ICAR) आणि Indian Council of Scientific Research या दोन संस्थांच्या उच्चस्तरीय बैठकांवरून प्रकरणाचं गांभीर्य सर्वांनाच कळलं.

गुलाबी बोंडअळीचं मोठ्या प्रमाणावर पुनरागमन झाल्याचा अहवाल नागपुरातील Central Institue of Cotton Research (CICR) या सर्वोच्च संस्थेनं दिल्यानंतर जीएम पिकासंबंधी सार्वजनिक क्षेत्राच्या पुढाकाराविषयी या दोन बैठकांमध्ये विशेषत्वाने चर्चा झाली. अमेरिकन बोंडअळीचीही असंच होईल, अशी भीती CICRने व्यक्त केली आहे.

भारतातील बीटी कापूस बियाणे बाजारावर सध्या अमेरिकेतील मोन्सँटो या बलाढ्य बियाणे कंपनीची मक्तेदारी आहे. बोंडअळींच्या नियंत्रणासाठी त्यांच्याकडे दोन तंत्रज्ञान आहेत.

त्याउलट भारतातील सार्वजनिक क्षेत्राचं जीएम बियाण्याच्या बाजारात अस्तित्वदेखील नाही. आता कुठे काही संस्थांना जाग येते आहे आणि मोजक्या पिकांवर प्रयोगशाळेत संशोधन सुरू झालं आहे.

कापसाचे बोंड

तत्कालीन CICR संचालक आणि सध्या वॉशिंगमधील आंतरराष्ट्रीय कपाशी सल्लागार समितीचे तांत्रिक सल्लागर असलेले डॉ. केशव क्रांती यांनी 2016मध्येच "गुलाबी बोंडअळी परत आली आहे, यात शंकाच नाही," असं भारतीय कापूस संस्थेच्या Cotton Statistics and News या साप्ताहिकात म्हटलं होतं.

"2020पर्यंत बीटी कापसाची बोंडअळी नियंत्रणात ठेवण्याची क्षमता आपण किती टिकवू शकू, ही चिंतेची बाब आहे. कारण तोवर कुठलंही नवीन जीएम कापूस तंत्रज्ञान व्यावसायिक वापरासाठी येऊ घातलेलं नाही," असं त्यांनी लिहिलं होतं.

तरीही गेल्यावर्षी भारतात मोठ्या प्रमाणावर बेकायदा तणनाशक निरोधक म्हणजेच HT कापसाच्या बियाण्याची लागवड करण्यात आली होती. बोंडअळी मारण्यासाठी या HT कापसाच्या बियाण्यांचा उपयोग होत नाही, हा भाग मात्र निराळाच आहे.

ICARच्या दोन्ही उच्चस्तरीय बैठकांमध्ये बोंडअळी नियंत्रणाच्या उपलब्ध असलेल्या प्रभावी उपायांवर चर्चा करण्यात आली. मात्र दोन-तीन पर्यायांपलीकडे पर्याय सापडले नाहीत.

"अल्पावधीत येणारे संकरीत बीटी कापूस बियाणे पेरणे किंवा जानेवारीपर्यंतच येणारं वाण वापरणे हा भारतासाठी उत्तम दिर्घकालीन उपाय ठरू शकतो," असं क्रांती यांनी 2016साली सांगितलं होतं.

कपाशीच्या बोंडांवर या गुलाबी अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने हिवाळ्यात होतो. त्यामुळे जानेवारीपर्यंतच येणारं वाण वापरल्यास बोंडअळींची पैदासच रोखली जाईल, असं क्रांती यांचं म्हणणं आहे. मात्र यातली सर्वात मोठी अडचण म्हणजे भारतातील बियाणे कंपन्या दीर्घकाळात चांगलं उत्पन्न देणारी संकरित बियाणे तयार करतात.

बीटी तंत्रज्ञान अयशस्वी

भारतात पेक्टिनोफोरा गोसिपिएला म्हणजेच गुलाबी बोंडअळींनी तब्बल तीन दशकांनंतर पुन्हा डोकं वर काढलं आहे. बोलगार्ड II बीटी कपाशीच्या बोंडांवर या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला दिसतो. विशेष म्हणजे हे बोलगार्ड II बियाणं बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जनुकीयरित्या संशोधित केलेलं आतापर्यंतचं सर्वात प्रभावी संकरीत बियाणं आहे.

''याचाच अर्थ मोठा गाजावाजा करण्यात आलेलं हे तंत्रज्ञान (बीटी कापूस आणि त्यापुढं बोलगार्ड II वाण) सपशेल अपयशी ठरलं आहे", असं क्रांती म्हणतात. "म्हणजेच शेतकऱ्यांना आता कमी उत्पन्न देणाऱ्या BG I आणि BG II तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावं लागणार आणि बोंडअळीला नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा किटकनाशकांकडे वळावं लागेल."

बीटी कॉटन

उद्योगविषयक मासिकं आणि CICRमधील आपल्या ब्लॉगमध्ये क्रांती लिहितात, "बोंडअळी नियंत्रणासाठी बीटी कापसाचं वाण विकसित करण्यात आलं. मात्र आता शेतात बीटी कपाशीवर; या अळीची पुन्हा पैदास होत आहे. मात्र उंबरठ्यावर असलेल्या या विनाशाची ICAR किंवा केंद्रीय कृषी मंत्रालयाने गंभीर दखल घेतली नाही."

गुलाबी बोंडअळीची सर्वात मोठी अडचण म्हणजे बोंड फुटल्याशिवाय या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचं शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. त्यामुळे कापणीच्या वेळी बोंडअळी दिसल्यास शेतकऱ्याला अचानक धक्का बसतो शिवाय अशा कापसाला बाजारात कमी दर मिळतो. दुर्दैवानं सध्या किंवा निकटच्या भविष्यात या बोंडअळीच्या नियंत्रणासाठी BT II वाणाला पर्याय ठरू शकेल असं GM किंवा किटकनाशकाचं कुठलंच नवीन तंत्रज्ञान उपलब्ध नाही.

येरे माझ्या मागल्या

भारतातील मोठ्या भूभागावर उत्पादन होत असलेल्या आणि ग्रामीण भागात लाखो लोकांना मजुरी देणाऱ्या कापसाबाबत आपण जिथून सुरुवात केली तिथेच परत आलो आहोत.

बोंडअळींपासून संरक्षणासाठी बीटी कापसात मातीत राहणाऱ्या बॅसिलस थुरिंगगिनेसीस या जीवाणूंपासून काढलेली जनुकं वापरली जातात. ही जनुकं कपाशीच्या पिकाच्या जनुकीय संरचनेत सोडली जातात.

कपाशीचं बोंड

फोटो स्रोत, JAIDEEP HARDIKAR/BBC

बोलगार्ड II तंत्रज्ञानात कपाशीच्या पिकात बॅसिलस थुरिंगगिनेसीस या जीवाणूंचे Cry1Ac आणि Cry2Ab ही जनुकं संशोधित केलेली आहेत. ही जनुकं अमेरिकन बोंडअळी (Helicoverpa armigera), गुलाबी बोंडअळी आणि ठिपकेदार बोंडअळी (Earias vittella), अशा तीन प्रकारच्या किडींना रोखायला मदत करतात. पहिलं संकरित बियाणं म्हणजेच BT I कपाशीच्या बियाण्यामध्ये केवळ Cry1Ac जनुकं संशोधित केलेली होती.

गुलाबी बोंडअळीच्या पुनरागमनामुळे आणि त्यामुळे गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांना झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे आता कापसाचं वाण विकसित करणाऱ्या जवळपास 50 भारतीय कंपन्या अमेरिकेतील बलाढ्य मोन्सँटो कंपनीविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. या मोन्सँटोला मोठी रॉयल्टी देऊन या कंपन्या BG I आणि BG II तंत्रज्ञान विकत घेतात.

2016-17साली तब्बल 46 कंपन्यांनी मोन्सँटोला रॉयल्टी देण्यास नकार दिला होता. ती मात्र वेगळी कहाणी आहे.

'तक्रारी राजकीय स्वरूपाच्या'

अंकुर सीड्सचे माधव शेंबेकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "या तक्रारी राजकीय स्वरूपाच्या असून त्यात कोणतंही तथ्य नाही." वरूडमध्ये ज्या 3 कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल आहे.

ते म्हणाले, "गुलाबी बोंडअळीने BT कॉटनसाठी प्रतिकार क्षमता विकसित केली आहे, हे आम्ही सांगत होतो आणि तसं बियाणांच्या पाकिटांवर लिहिलेलं आहे. त्यात नाकारण्यासारखं नाही. पण आता कुणी त्याला फसवणूक म्हणत असेल तर ते राजकीय आरोपांसारखं आहे."

साबळे यांनी तक्रार दाखल केलेल्या तिन्ही कंपन्यांना अटकपूर्वी जामीन मिळाला आहे. तक्रारदाराच्या शेतातून घेतलेल्या नमुन्यांवरील चाचण्यांचा अहवाल अजून आलेला नसून वरूड पोलीस या संदर्भातील प्राथमिक तपास पूर्ण करत आहेत.

शेंबेकर अंकुर सीड्सच्या संचालकांपैकी एक आहेत. ते म्हणाले, Central Institute of Cotton Research (CICR) आणि राज्यातील विद्यापीठांनी गुलाबी बोंडअळी BT कॉटनसाठी प्रतिकार क्षमता विकसित करते, हे नैसर्गिक आहे याची माहिती होती. यावर्षी या संदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्याने बोंडअळीचा प्रसार रोखता आला. बोंडअळीचा प्रसार प्राथमिक टप्प्यावर रोखण्यासाठी शेतकऱ्यांत जनजागृती करण्याचं काम आम्हीही केलं, असं ते सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)