मुलींना का येतात दाढी आणि मिशा?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, भूमिका राय
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"शरीर झाकण्यासाठी लोक कपडे घालतात. पण मला तर चेहऱ्यावरही कपडा बांधावा लागतो. चेहऱ्यावर कपडा न गुंडाळता मी कधीही घरातून बाहेर पडले नव्हते. उन्हाळा असो, पावसाळा किंवा इतर कोणताही दिवस. गेली 10 वर्षं मी चेहऱ्यावर कपडा गुंडाळत होते."

दिल्लीतल्या महाराणी बागेत राहणाऱ्या पायल आजही ते दिवस आठवल्यानंतर अस्वस्थ होतात.

आयुष्यातली 10 वर्षें पायल यांच्यासाठी अडचणीची होती, कारण त्यांच्या चेहऱ्यावर केस होते.

"शाळेत असताना माझ्या अंगावर जास्त केस नव्हते. पण कॉलेजला आले आणि चेहऱ्याचा अर्धा भाग केसांनी व्यापला. सुरुवातीला बारिक केस यायचे. त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं. वॅक्सिंग करुनही पाच दिवसांनंतर ते परत यायचेच. त्यानंतर मी शेव्हिंग करणं सुरू केलं," पायल सांगतात.

अगदी पुरुषांसारखेच केस

एक घटना आठवून पायल सांगतात, "एकदा वडिलांचं रेझर मिळत नव्हतं. आई-वडील दोघंही रेझर शोधत होते पण ते काही त्यांना सापडत नव्हतं. थोड्या वेळानंतर वडील आईला म्हणाले की, पायलला विचारून बघ, तिनं माझं रेझर नेलेलं नाही ना?"

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, BILLIE ON UNSPLASH

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

असे अनेक प्रसंग गेल्या 10 वर्षांत पायल यांच्यासोबत घडले. औषधांचाही उपयोग होत नाही म्हटल्यावर त्यांनी लेझर ट्रीटमेंट घेण्याचा विचार केला. या ट्रीटमेंटची त्यांना सुरुवातीला खूप भीती वाटली. मात्र मग त्यांनी लेझर ट्रीटमेंट करून घेतलीच.

"आपल्या समाजात एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर केस येणं, हे फार लज्जास्पद मानलं जातं. मुलींच्या बायोलॉजिकल सायकलमध्ये (जैविक चक्रात) बदल झाल्यामुळे अशाप्रकारे केस येऊ शकतात हे लोकांना माहिती नसतं," असं त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुरुची पुरी सांगतात.

'कारण समजून घ्यायचा प्रयत्न करा'

डॉ. सुरुची या फेमिना मिस इंडिया 2014 स्पर्धेच्या अधिकृत त्वचारोगतज्ज्ञ होत्या.

"मुलींच्या चेहऱ्यावर केस येण्याची दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे आनुवांशिक कारण आणि दुसरं म्हणजे हार्मोनमध्ये होणारे बदल. हॉर्मोन्समधील संतुलन बिघाडल्यानंही चेहऱ्यावर केस येऊ शकतात."

"माणसाच्या शरीरावर थोडे केस असतातच. त्यात, मुलींच्या शरीरावर थोडेफार केस असतील तर चिंता करण्याचं काही कारण नाही. पण केस जास्त असल्यास डॉक्टरांकडे जाणं आवश्यक असतं," असंही सुरुची सांगतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, ROOP SINGAR BEAUTY PARLOUR/FACEBOOK

चेहऱ्यावर खूप केस असल्यास त्या स्थितीला 'हायपर ट्रायकोसिस' असं म्हणतात. अनुवांशिक कारणांमुळे केस उगवले असतील तर त्याला 'जेनेटिक हायपर ट्रायकोसिस' असं म्हणतात. पण हार्मोनच्या असंतुलनामुळे केस येत असतील तर या स्थितीला 'हरस्युटिझ्म' असं म्हटलं जातं.

"हार्मोनच्या असंतुलनाचं मुख्य कारण पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओवेरियन डिस्ऑर्डर) असू शकतं आणि आजच्या काळात हे प्रमाण वेगानं वाढत आहे. असं असलं तरी प्रत्येक पीसीओडी रुग्णाच्या चेहऱ्यावर केस येतीलत असंही नाही," हेही सुरुची यांनी स्पष्ट केलं.

पीसीओडीला सर्वांत अधिक जीवनशैली कारणीभूत असते. आपल्या खाण्याच्या सवयी, शरीर कमावण्यासाठी औषधांचा वापर, तास-न्-तास एकाच जागी बसणं, ताणतणाव यामुळे पीसीओडी बळावते," असंही त्या सांगतात.

या सर्व बाबींमुळे महिलांमध्ये पुरुषांप्रमाणे एंड्रोजन आणि टेस्टेस्टेरॉन हार्मोन वाढतात.

"एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर केस असतील तर सर्वप्रथम त्यामागचं कारण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. यामागचं कारण हार्मोन्स असेल तर जीवनशैलीत बदल करणं आवश्यक असतं. बरेचदा औषधंही घ्यावीच लागतात, " सुरुची सांगतात.

लेझर ट्रीटमेंट एकमेव उपाय?

औषधांमुळे फार फरक पडत नाही, असं पायल यांना वाटतं.

"मी 10 वर्षें होमिओपॅथिक औषधं घेतली. लोकांना वाटतं, स्वस्त इलाज केल्यामुळे फरक नसेल, तर तसंही नाही. मी दिल्लीतल्या नामांकित होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जाऊन इलाज केला, पण तरीही काही फरक पडला नाही.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

पायल यांनी 2 वर्षांपूर्वी लेझर ट्रीटमेंट केली आहे आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर केस उगवलेले नाहीत.

डॉ. सुरुची यांच्या बोलण्याशी पायल सहमत दिसतात.

"माझा प्रश्न हार्मोनचा होता कारण माझी मासिक पाळी वेळेवर येत नसे. पाळी यायची तर ती पण फक्त एका दिवसासाठी. यामुळे चेहऱ्यावर केस आलेच शिवाय वजनही वाढत गेलं. लेझर ट्रीटमेंट घ्यायच्या आधी मी वजन कमी केलं, खाण्या-पिण्याच्या सवयींवर लक्ष केंद्रित केलं, जीवनशैलीत बदल केला. आता मला पहिल्यापेक्षा जास्त चांगलं वाटतं."

इतकी मोठी समस्या का?

दिल्लीतल्या एका ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या रचना यांच्या मते, त्यांच्याकडे येणारे ग्राहक जास्त करून थ्रेडिंग करण्यासाठीच येतात. आय ब्रो आणि अप्पर लिप्स सोडून काही मुली संपूर्ण चेहऱ्याला थ्रेडिंग करतात.

"बऱ्याच मुली अशा येतात ज्या संपूर्ण चेहऱ्यावर थ्रेडिंग करतात, कारण त्यांच्या चेहऱ्यावर इतर मुलींपेक्षा जास्त केस असतात. काही तर वॅक्सिंगही करतात. केस मोठे असल्यानं त्यांच्याकडे ब्लीचचा पर्याय नसतो," अशी माहिती रचना यांनी दिली.

आमच्याकडे येणाऱ्या महिला चेहऱ्यावरच्या केसांमुळे खूपच त्रासलेल्या असतात, असं रचना सांगतात.

चेहऱ्यावरील केस

"चेहऱ्यावरील केसांचा सर्वाधिक परिणाम मनावर होतो. यामुळे आत्मविश्वासही कमी होतो," असं डॉ. सुरुची सांगतात.

"महिलांमध्येही पुरुंषाप्रमाणे हार्मोन असतात. पण त्यांचं प्रमाण खूपच कमी असतं," असं दिल्लीतल्या मॅक्स हेल्थ केअरच्या पोटाच्या विकार विभागाचे प्रमुख डॉ. सुजीत झा सांगतात. जेव्हा या हार्मोनचं प्रमाण वाढतं तेव्हा चेहऱ्यावर केस यायला लागतात.

पीसीओडीमुळे हार्मोन असंतुलित होतात, डॉ. सुजीत याच्याशी सहमत आहेत. ज्यांचं वजन जास्त असतं तेच पीसीओडीची तक्रार करतात.

"केस येण्याचं कारण काय आहे? हे सर्वप्रथम समजून घेणं गरजेचं आहे. ते जेनेटिक आहे की हार्मोनच्या बदलामुळे झालं आहे, हेही समजून घ्यावं. याव्यतिरिक्त काही कारणांमुळे चेहऱ्यावर केस येत असतील तर ती कॅन्सरची लक्षणं असू शकतात. पण ती शक्यता खूपच दुर्मीळ असते," असंही सुजीत सांगतात.

पीसीओडीच्या या प्रकरणाची जगानं दखल घेतली...

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हरनाम कौर यांचं नाव संपूर्ण दाढी असलेली सर्वांत कमी वयाची महिला म्हणून गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दाखल आहे. 16 वर्षांच्या असताना त्यांना पॉलिसिस्टिक सिंड्रोम झाला आहे, हे हरनाम यांच्या लक्षात आलं. यामुळे मग त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केस यायला लागले.

चेहरा आणि शरीरावरच्या केसांमुळे हरनाम यांना शाळेत अनेक कटू आठवणींना सामोरं जावं लागलं. काही वेळा तर परिस्थिती इतकी टोकाला पोहोचली की त्यांनी आत्महत्याही करायचा विचार केला.

हरनाम कौर

पण आता त्यांनी हे स्वीकारलं आहे आणि गेल्या काही वर्षांपासून चेहऱ्यावरील केसंही कापलेले नाहीत.

"वॅक्सिंगमुळे त्वचा फाटते. माझ्या त्वचेवर अनेकदा परिणामही झाला. त्यामुळे इजाही झाली. अशा परिस्थितीत दाढी वाढवणं हा एकच पर्याय होता," असं हरनाम सांगतात.

हा प्रवास खूपच अडचणींचा होता, पण यामुळे आता त्या वैतागत नाहीत, असं हरनाम म्हणतात.

"माझ्या दाढीवर मी खूप प्रेम करते. मी माझ्या दाढीला एक व्यक्तिमत्व, चेहरा दिला आहे. ती कोणा पुरुषाची नाही तर एका महिलेची दाढी आहे," हरनाम सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)