गौरी लंकेश यांची हत्या करणाऱ्यांच्या हिट लिस्टवर आणखी कोण कोण?

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, बंगळुरू येथून

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष पथकानं हिंदुत्वावर टीका करणाऱ्या सहापेक्षा जास्त लेखक, एक बिशप, एक तत्त्ववेत्ता यांची सुरक्षा वाढवण्याची सूचना केली आहे.

या लोकांच्या घरी CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत, तसंच चार सुरक्षारक्षक तैनात करण्यात यावेत, अशी शिफारस केली आहे.

यात गिरीश कर्नाड, तत्त्ववेत्ते के. एस. भगवान, नरेंद्र नायक, सी. एस. द्वारकानाथ, निदुमामिदी मठाचे वीरभद्र चन्नमाला स्वामी यांचा समावेश आहे.

विशेष तपास पथक लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अमोल काळे याला पकडण्यासाठी छापे मारत होतं. तेव्हा त्यांना एक हिट लिस्ट सापडली होती, ज्यात बरीच नावं होती. लंकेश यांचं नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होतं.

यानंतर पोलिसांनी पुण्यातून अमोल काळे, गोव्यातील अमोल दगवेकर, विजयपुरामधील मनोहर इदेव आणि परशुराम वाघमारे यांना अटक केली. लंकेश यांच्यावर गोळी झाडणारा वाघमारेच होता, असा संशय आहे. हे सर्व कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असल्याचं पोलिसांनी सागितलं आहे.

लंकेश यांचा खून 5 सप्टेंबर 2017ला झाला होता. त्यांच्या घराच्या दारातच त्यांच्यावर अगदी जवळून गोळी झाडण्यात आली. लंकेश आणि एम. एम. कलबुर्गी यांची हत्या एकाच शस्त्रातून करण्यात आल्याचं विशेष तपास पथकानं न्यायालयात म्हटलं आहे.

वाघमारे यानं यापूर्वी विजयपुरा इथं दंगली घडवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा फडकवला होता. या प्रकराणात कोर्टात खटला सुरू आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका पोलीस अधिकाऱ्यानं बीबीसीला या संदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले, "विशेष तपास पथकाचा हा अहवाल राज्याच्या इंटेलिजन्स विभागाला पाठवला जाईल. त्यानंतर हिट लिस्टवर कोण लोक आहेत, हे निश्चित केलं जाईल आणि त्यांना सुरक्षा दिली जाईल."

हिंदू प्रतीकांवर टीका करून वादात सापडणारे टीकाकार के. एस. भगवान यांनी बीबीसीला सांगितलं की, "दोन बंदूकधारी माझ्यासमवेत असतील, असं मला कळवण्यात आलं आहे. मागच्या सरकारनं मला दोन बंदूकधारी सुरक्षारक्षक दिले होते. ते माझ्यासोबत तीन वर्षं होते."

निदुमामिदी मठाचे स्वामी वीरभद्र चन्नामला हे लिंगायत मठांतील सर्वांत पुरोगामी संत मानले जातात. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "यापूर्वी जेव्हा अशी परिस्थिती आली होती, तेव्हा मला सुरक्षा देण्यात आली होती. यावेळी मला काहीही सांगायचं नाही, कारण मला प्रसिद्धीचा हव्यास नाही."

भगवान म्हणाले, "मी जे लिहिलं आहे, यातलं या लोकांनी काहीही वाचलेलं नाही. त्यांना हिंदू धर्म कळालेलाच नाही. त्यांच्यासाठी हा ब्राह्मणवादी धर्म आहे आणि त्यांना वाटतं की शूद्र हे ब्राह्मणांचे दास आहेत. कोणताही विचार न करता ते लोकांना मारायला फिरत आहेत. हे राज्यघटनेच्या विरोधात आहे."

"वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता आदी राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य आहेत. एकदा हे समजलं तर नवीन कुमार (लंकेश यांच्या हत्येतील पहिला संशयित) याला स्वतःची लाज वाटेल," असे भगवान म्हणाले.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)