'त्यांनी आमच्या मुलीला अक्षरश: ओरबाडून काढलं, त्यांना फाशीच द्या'

    • Author, रवि प्रकाश
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी, जहानाबाद

त्यांनी आमच्या मुलीला अक्षरक्ष: ओरबाडून काढलं. जनावरंही इतकं पाशवी वागत नाहीत. मी काय बोलणार? या नराधमांना फाशीची शिक्षा मिळायला हवी. माझी नात माझ्याबरोबर सुखरुप होती. त्यादिवशी घरी परतली तेव्हा खूप रडत होती. काहीच जेवली नाही. खूप खोदून खोदून विचारलं पण तिनं काहीही सांगितलं नाही. 29 तारखेला आमच्या घरी पोलीस आले तेव्हा सगळा प्रकार कळला. असं क्रूर वागणाऱ्या माणसांना फाशीच व्हायला हवी.

एवढं बोलून त्या बाई हमसून हमसून रडू लागल्या. त्यांना पुढे काही बोलताच येईना.

जहानाबाद घटनेतल्या पीडितेची ही आजी. दिवसाढवळ्या भररस्त्यात या मुलीची छेड काढण्यात आली. तिला विवस्त्र करण्यात आलं. या सगळ्याचा व्हीडिओ चित्रित करण्यात आला. त्यानंतर हा व्हीडिओ सोशल मीडियावर पसरवण्यात आला. या भीषण घटनेनं ती मुलगी खचली आहे.

70 वर्षांच्या पीडितेच्या आजीची माझी भेट जहानाबादच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये झाली. विवाहित मुलीच्या अपेंडिक्सच्या ऑपरेशनकरता त्या तिथं आल्या होत्या.

दिल्लीत असतात पीडितेचे वडील

आजींचा सगळ्यांत मोठा मुलगा म्हणजे पीडितेचे वडील. आपल्या मुलीच्या आयुष्यात घडलेल्या या दुर्दैर्वी घटनेबद्दल वडिलांना काहीही कळवण्यात आलेलं नाही. ते दिल्लीत मजुरीचं काम करतात. तिथं ते त्यांच्या एका भावासह राहतात.

70 वर्षांच्या आजी आपले पती, तीन मुलं, सुना आणि नाती आणि नातवांबरोबर राहतात. पीडित मुलगी आपल्या पालकांची सगळ्यांत मोठी मुलगी आहे. जहानाबादला जाऊन शिकणारी परिसरातली ती एकमेव मुलगी आहे.

थोड्या वेळानं मी नॅशनल हायवेवरच वसलेल्या गावातल्या वस्तीत होतो जिथे पीडित मुलगी राहते.

या वस्तीत साधारण 400 घरं आहेत. इथं रविदास जातीची माणसं आहेत. बिहार सरकारनं त्यांना महादलित श्रेणीचा दर्जा दिला आहे. गावात सर्वाधिक माणसं याच जातीची आहेत. त्या खालोखाल मांझी समाजाची माणसं आहेत. गावात यादव आणि मुसलमान मंडळीही आहेत. पण सर्वाधिक लोकसंख्या दलित समाजाची आहेत.

खूप वर्षांपूर्वी मुसलमानांनी या जातीच्या माणसांना गावात जमीन देऊन स्थिरावू दिलं. म्हणूनच त्यांच्याकडे जमिनीची कागदपत्रं नाहीत. याच कारणासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांना घरं मिळू शकली नाहीत. या सगळ्या कारणांमुळे गावातली दलितांची 90 टक्के घरं कच्च्या स्वरुपाची आहेत. मजुरी करून ते उदरनिर्वाह करतात.

पोलीस प्रशासनाकडून चौकशी

पीडित मुलीच्या घरी जाण्यासाठी चिंचोळे रस्ते पार करून मी पोहोचलो. मुलीच्या घराबाहेर पोलिसांची फौज होती. आत जायला कोणालाही परवानगी नाही. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर आणि पोलिसांच्या मनधरणीनंतर मी घरात जाऊ शकलो.

तसं घर पक्क्या बांधणीचं होतं. त्यावर प्लास्टर मात्र केलेलं नव्हतं.

एका खोलीबाहेर पातळ दोरी टांगून पडदा तयार करण्यात आला होता. पडद्यामागच्या खोलीत एका खाटेवर पीडितेसह काही मुली बसलेल्या होत्या.

त्या मुली बाहेर डोकावतात. आमची नजरानजर होते. मात्र काहीही बोलणं होऊ शकत नाही. त्या काहीही बोलायला नकार देतात.

आईचा राग आणि आक्रोश

पीडित मुलीच्या आईला भेटलो, त्या जमिनीवर बसून आमच्याशी बोलत होत्या. ही जमीन शेणामातीनं सारवलेली होती. सगळं कसं घडलं असं मी त्यांना विचारलं.

त्यांनी रागानं प्रश्न केला, "तुम्हीच सांगा कसं घडलं. माझी मुलगी 25 एप्रिलला जहानाबादच्या कोचिंग सेंटरमध्ये क्लासला गेली होती. तिथून सकाळी नऊ वाजता क्लासा संपला. त्यानंतर मैत्रिणीच्या एका पुरुष नातेवाईकानं तिला बाईकवरून घरी सोडतो असं सांगितलं. ते दोघं घरी येत होते तेव्हाच हा प्रकार घडला."

त्या दुर्दैवी घटनेबद्दल आणखी काही विचारलं तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. "तुमच्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत, तुम्हीच काय घडलं ते शोधून काढा," असं त्या चिडून बोलल्या.

मी घरातून बाहेर पडत असतानाच त्या पुन्हा बोलू लागल्या. माझी मुलगी या धक्क्यातून सावरेल असं त्या विश्वासाने सांगत होत्या. त्या पुढे बोलू लागतात, "माझ्या मुलीची काय चूक आहे,तिला कोण काय बोलेल. तिनं मन लावून अभ्यास करायला हवा. शिकून डॉक्टर झाली तर लोक सगळ्या गोष्टी विसरून जातील."

सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी

आईला भेटून बाहेर पडल्यावर त्यांचे शेजारी परछू रविदास यांना मी भेटलो. सरकारनं पीडित मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलायला हवा. तिच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी, जेणेकरून ती तिचं शिक्षण पूर्ण करू शकेल, अशी मागणी त्यांनी केली आहे.

एक आरोपी फरार

25 एप्रिलला हा प्रसंग घडला. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बिहार पोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमनं छेडछाड आणि व्हीडिओ व्हायरल करण्याच्या आरोपांखाली 13 पैकी 12 जणांना अटक केली.

पीडित मुलीला आपल्याबरोबर बाईकवर घेऊन जाणारा मुलगा मात्र फरार आहे. या प्रकरणाची आम्ही कसून चौकशी करत असून या आरोपीलाही लवकरच पकडू असं जहानाबादचे एस.पी. मनीष यांनी बीबीसीला सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)