बिहार : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला भागलपूर दंगल प्रकरणी अटक

भागलपूर

फोटो स्रोत, facebook

    • Author, मनीष शांडिल्य
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांचा मुलगा अर्जित शाश्वत यास अटक केल्याची माहिती पाटणा पोलिसांनी दिली आहे. भागलपूरच्या नाथनगर भागात धार्मिक तेढ वाढवणं आणि हिंसाचार भडकण्यासाठी चिथावणी देण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 24 मार्च रोजी त्यांच्याविरोधात न्यायालयानं अटक वॉरंट काढलं होतं.

"अर्जित यांना पाटणा स्टेशनच्या गोलंबरजवळ रात्री एक वाजता अटक करण्यात आली. पुढील कारवाईसाठी त्यांना भागलपूर पोलीस घेऊन जातील," अशी माहिती पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी दिली.

भाजप

फोटो स्रोत, Manish shandilya

24 तारखेला अटक वॉरंट निघाल्यावरही पोलिसांनी त्यांना अटक केली नव्हती. 25 तारखेला रामनवमीच्या उत्सवात ते सहभागी झाले होते आणि त्यांनी माध्यमांसोबत संवाद देखील साधला होता.

आत्मसमर्पण केल्याचा अर्जित यांचा दावा

अटक होण्याच्या काही वेळापूर्वी अर्जित यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले न्यायालयाचा मान ठेवून मी आत्मसमर्पण करत आहे. माझ्यावर कुठलाही दबाव नाही. मी हनुमानाच्या पाया पडण्यासाठी आलो होतो आणि त्यानंतर मी आत्मसमर्पण केलं आहे. मी न्यायालयाला शरण आलो आहे.

रामनवमी

फोटो स्रोत, facebook

"माझा अंतरिम जामीन न्यायालयानं फेटाळला असल्याची बातमी मला संध्याकाळी मिळाली. त्यानंतर मला वाटलं न्यायालयाचा सन्मान व्हायला हवा," असं त्यांनी माध्यमांना सांगितलं.

अर्जित यांनी नाथनगर पोलिसांच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

काही लोकांनी यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देखील दिल्या होत्या.

काय आहे प्रकरण?

हिंदू नववर्षाच्या आरंभी, 17 मार्च रोजी भारतीय जनता पक्षानं भागलपूरच्या सैंडिस कंपाउडपासून एक मिरवणूक काढली होती. त्याचं नेतृत्व अर्जित यांनी केलं होतं. ही मिरवणूक काढण्यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. जेव्हा ही मिरवणूक भागलपूरच्या नाथनगर भागात आली तेव्हा एक वादग्रस्त गाणं लावण्यात आलं. दोन गटांमध्ये तेढ निर्माण होऊन दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या.

पोलीस

फोटो स्रोत, Manish shandilya

यामध्ये पोलीस आणि एक जवान जखमी झाले होते. या घटनेनंतर दोन FIR दाखल झाल्या होत्या. या प्रकरणात अर्जित यांच्यासह आणखी 12 जणांवर आरोप ठेवण्यात आला आहे.

त्यानंतर पोलिसांनी अर्जित यांच्यासोबत 9 लोकांच्या अटकेचं वॉरंट मिळवलं.

अर्जित यांना अटक होण्यासाठी उशीर लागत होता म्हणून विरोधी पक्षातील लोक संतापले होते. केवळ विरोधी पक्षच नाही तर सत्तेत सामील असलेल्या इतर पक्षांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली होती. अर्जित यांचे वडील अश्विनी चौबे यांनी आपला मुलगा निर्दोष आहे असं म्हटलं होतं. FIR हा केवळ एक रद्दीचा तुकडा आहे असं ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्यासोबत अनेक भाजप नेते अर्जित यांच्या समर्थनार्थ उतरले होते. पण त्याच वेळी सत्ताधारी आघाडीतील जनता दल युनायटेडच्या नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त करत न्यायालयाचा मान राखावा असं म्हटलं होतं.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)