'आंदोलक पोहोचू नयेत म्हणून सरकार गाड्या अडवतंय'

23 मार्चच्या शहीद दिनाचं औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे दिल्लीतल्या रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत.

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि लोकपाल या दोन प्रमुख विषयांवर हे उपोषण केंद्रित असल्याचं सांगितलं जात आहे. या आंदोलनाची बीबीसी मराठीनं टिपलेली दृश्य.

सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनाला सुरुवात झाली. 10 वाजता राजघाट इथे जाऊन अण्णांनी महात्मा गांधींना अभिवादन केलं. त्यानंतर शहीद पार्कवर जाऊन त्यांनी शहिदांना अभिवादन केलं.

सकाळी 11 वाजता अण्णा रामलीला मैदानावर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी नेते राजपाल पुनिया, नागेंद्र शेखावत, राजेंद्र सिंग, विजय तालियान उपस्थित होते.

लाखभर लोक आंदोलनाला उपस्थित राहतील अशी आयोजकांनी इच्छा व्यक्त केली असली तरी दुपारी 1 वाजेपर्यंत पाचशे-सातशे निदर्शक उपस्थित होते.

राजस्थान येथील शेतकऱ्यांच्या पारंपरिक नृत्यानंतर 12 वाजता अण्णांनी भाषणाला सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आपण शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत असल्याचं सांगत सरकारवर जोरदार टीका केली. भाषणात त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर त्यांनी भर दिला.

अण्णांच्या प्रमुख मागण्या काय?

अण्णांच्या सकाळच्या भाषणातले प्रमुख मुद्दे :

1. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, कारण कृषिमूल्य आयोगावर सरकारचा दबाव आहे. म्हणून कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता द्या ही आमची मागणी आहे.

2. कृषिप्रधान देशाच्या पंतप्रधानांना मी गेल्या 4 वर्षांत 43 पत्रे लिहिली, पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली.

3. शहीद दिनाला आंदोलनाला मी सुरुवात केली, कारण भगत सिंगांना देशात लोकशाही हवी होती. पण आज कुठे आहे लोकशाही? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोरे गेले आणि काळे आले एवढाच काय तो फरक झाला.

4. उपोषण करू नका म्हणून सरकार मागे लागलंय. तुमच्या मागण्या मान्य करू असं त्यांचं म्हणणं आहे. पण गेल्या 4 वर्षांत यांनी कोणत्या मागण्या मान्य केल्या? नुसती आश्वासन दिली. म्हणून आता शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नाही.

5. जनलोकपालची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार चर्चा करणार असेल तर तीही करण्यात येईल. पण जोवर सरकारकडून ठोस पावलं उचलण्यात येत नाही तोवर माझं उपोषण सुरूच राहील.

आंदोलकांनी उपोषणस्थळी पोहोचू नये म्हणून सरकार गाड्या आणि रेल्वे अडवून ठेवत आहेत, असा आरोप अण्णांनी यावेळी केला.

गेल्या दोन दिवसांपासून सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रीय कृषिमंत्री, राज्यातले अनेक मंत्री माझी मनधरणी करत आहेत पण मी स्वस्थ बसणार नाही, असं अण्णा यावेळी म्हणाले.

अण्णा हजारे यांनी उपोषणाबाबत बीबीसी मराठीशी चर्चा केली. त्यांची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)