पाहा फोटो : शेतकरी लाँग मार्च - भेगाळलेल्या अन् जखमी पायांची हक्कांसाठी चाल

फोटो स्रोत, Prashant Nanaware
भारतीय किसान सभेनं आयोजित केलेल्या शेतकऱ्यांच्या नाशिक ते मुंबई लाँग मार्चनं आता मुंबईत प्रवेश केला आहे. नाशिक ते मुंबई हा जवळपास 180 किलोमीटरचा प्रवास ऐन ऊन्हात पुरुष, स्त्रिया, युवक हे स्लिपर, तुटक्या चपला आणि अनवाणी पायानं करत आहेत. चालूनचालून जखमा झाल्यानं त्यांच्या पायांच्या भेगा अधिकच गडद झाल्या आहेत. पण न थांबता न थकता हे शेतकरी हजारोंच्या संख्येनं मुंबईतील विधान भवनाकडे कूच करत आहेत.

फोटो स्रोत, Prashant Nanaware
नाशिकहून निघालेल्या या शेतकऱ्यांच्या पायात असलेल्या चपला या नावापुरत्याच असल्याने मुंबईपर्यंतचं अंतर चालल्यावर त्याचे परिणाम त्यांच्या पायावर दिसून येत आहेत.

फोटो स्रोत, Prashant Nanaware
शेतकऱ्यांच्या या लाँग मार्चनं मुंबईत प्रवेश केला असून 12 मार्चला हे शेतकरी मुंबईतील नरीमन पॉईंट इथल्या विधान भवनाला घेराव घालणार आहेत.

फोटो स्रोत, Prashant Nanaware
रस्त्यावर पायी चालल्यानं अनेकांच्या पायाला जखमा झाल्या असून पायातल्या चपलाही तुटल्या आहेत. मात्र, विधान भवनाला घेराव घालेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं मत शेतकऱ्यांनी त्यांच्याशी केलेल्या चर्चेवेळी नोंदवलं.

फोटो स्रोत, Prashant Nanaware
"सरकारनं वेगळा मार्ग अवलंबला तर शहीद म्हणून घरी येऊ. मागण्या मान्य झाल्या शिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही," असं ठाम मत भारतीय किसान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, Prashant Nanaware
पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियाही या लाँग मार्चमध्ये आगेकूच करत असून त्यांनी देखील पायावरील जखमांची आणि तुटलेल्या चपलांची वाटचाल पुढे चालू ठेवली असल्याचं दिसून येत आहे.

फोटो स्रोत, Prashant Nanaware
नाशिक ते मुंबईपर्यंतचा प्रवास पायी चालून झाल्यावर आपल्या भेगाळेल्या पायांना काही क्षणांची विश्रांती देणारा हा शेतकरी.

फोटो स्रोत, Prashant Nanaware
नाशिक ते मुंबई अशा लाँग मार्चद्वारे हजारो शेतकरी मुंबईत पोहोचले आहेत. त्यांचे करुण चेहरे आणि थकलेले पाय त्यांच्या या मेहनतीची साक्ष देत आहेत. १२ मार्चला विधान भवनाला घेराव घालण्याचं लक्ष्य पुरं करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचं दिसत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








