शंकराचार्य जयेंद्र सरस्वती : प्रभावी पण वादग्रस्त व्यक्तिमत्व का ठरलं?

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी बेंगळूरूहून

कांची कामकोटी पीठाचे प्रमुख श्री श्री जयेंद्र सरस्वती शंकराचार्य यांचं बुधवारी (28 फेब्रुवारी) सकाळी निधन झालं. तामिळनाडूच्या कांचीपुरममध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते.

या शंकराचार्यांनी रुढीवादी परंपरांना तोडलं आणि तामिळनाडूबाहेर देशभर मठ पोचवायचं काम केलं. पण तरीही हे शंकराचार्य वादग्रस्त व्यक्तिमत्व राहिले. मठाशी संबंधित एकाच्या खून प्रकरणात हैदराबादमध्ये स्वामींना अटकही झाली होती.

स्वामींनी रुढीवादी परंपरांना तोडत मठाच्या माध्यमातून समाजकल्याणासाठी काम केलं. दलितांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी काम केलं.

22 मार्च 1954ला चंद्रशेखेंद्र सरस्वती स्वामीगल यांनी त्यांना उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं होतं. त्यानंतर स्वामी 69वे मठाधिपती झाले होते.

"मठाला नवीन दिशा देण्याचं काम स्वामींनी केलं. पूर्वी मठ फक्त आध्यात्मिक कार्यांपुरता मर्यादित होता. त्यांनी धार्मिक संस्थांनांना सामाजिक कार्यासोबत जोडलं. यामुळेच ते देशभरात लोकप्रिय झाले," पत्रकार एस गुरुमूर्ती सांगतात.

एका मठाची देखभाल करणारे जयाकृष्णन यांच्या मते, "स्वामींचं कार्य समाजातल्या शेवटच्या स्तरावरील लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी होतं. पूर्वी मठ कांचीपुरम आणि राज्यापुरताच मर्यादित होता. पण स्वामी मठाला उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांपर्यत घेऊन गेले. या राज्यांत त्यांनी शाळा आणि दवाखाने सुरू केले."

"स्वामींनी मठाला समाजाशी जोडण्याचं काम केलं. सार्वजनिक कामांत रस घेतला आणि दुसऱ्या धर्मातल्या लोकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले," गुरुमूर्ती सांगतात.

वरिष्ठांशी मतभेद

मठाला सामाजिक कार्यांशी जोडण्याबाबत स्वामी आणि श्री श्री चंद्रशेखेंद्र सरस्वती स्वामीगल यांच्यामध्ये मतभेद होते, असं बोललं जातं. पण याबाबत गुरुमूर्ती असहमती दर्शवतात.

"स्वामींचे मतभेद वरिष्ठ स्वामींशी नव्हते तर मठ चालवणाऱ्या लोकांशी होते," असं ते सांगतात.

याच मतभेदांमुळे 1980 साली स्वामी कुणालाही न सांगता कांचीपुरम मठ सोडून कर्नाटकला निघून गेले. नंतर ते कांचीपुरमला परत आले.

तामिळनाडू पोलिसांनी 11 नोव्हेंबर 2004ला हैदराबादमध्ये स्वामींना अटक केली आणि ते पुन्हा चर्चेत आले. कांची मठाचे प्रबंधक शंकररमण यांची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

मंदिर परिसरात 3 सप्टेंबर 2004ला शंकररमण यांची हत्या करण्यात आली होती. संशयाच्या आधारावर पोलिसांनी स्वामींना अटक केली होती कारण शंकररमण त्यांच्याविरोधात मोहीम चालवत होते.

अटकेत जयललितांचा हात ?

यानंतर स्वामींसह इतर 22 लोकांना अटक करण्यात आलं. खटल्याची सुनावणी 2009मध्ये सुरू झाली ज्यात 189 साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

अपुऱ्या पुराव्यांमुळे पुदुच्चेरी कोर्टानं 13 नोव्हेंबर 2013ला सर्व आरोपींची सुटका केली होती.

"ही एक राजकीय घटना होती. याबद्दल कोणताही पुरावा मिळाला नव्हता. मला नाही वाटत की तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी जाणूनबुजून असं काही केलं असेल. हत्येच्या विरोधात डीएमकेचे नेते निदर्शनं करत होते त्यामुळे वातावरणात तणाव असल्यानं पोलिसांनी स्वामींना अटक केली असावी," गुरुमूर्ती सांगतात.

"स्वामींच्या अटकेमुळे लोकांमध्ये प्रचंड रोष होता. स्वामी निर्दोष आहेत असं लोकांना वाटत होतं. मला नाही वाटत की, या प्रकरणामुळे स्वामींच्या प्रतिमेवर परिणाम झाला असेल," गुरुमूर्ती पुढे सांगतात.

स्वामींच्या अटकेनंतर तामिळनाडूपेक्षा उत्तर भारतात अधिक निदर्शनं झाली होती. "तामिळनाडूमध्ये सामाजिक आंदोलनं होऊ शकतील पण हिंदूच्या समर्थनार्थ प्रदर्शनं मात्र होणार नाही," गुरुमूर्ती सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)