'डार्क वेब' म्हणजे काय? जिथे कोकेन, हेरॉईन आणि LSD सहज विकत मिळतं..

डार्क वेब

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रज्ञा मानव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"डार्क वेबबद्दल मी पहिल्यांदा 2010ला ऐकलं. मी एक सिनेमा पाहिला होता. 2014ला माझ्या वाढदिवशी मी ठरवलं की काही तरी वेगळं केलं पाहिजे, कारण आयुष्य कंटाळवाणं झालं होतं. मग काय उचलला लॅपटॉप आणि दिली ऑर्डर."

"एलएसडी, मेथाफेटामीन, कोकेन, हेरॉईन, एमडीएमए, डीएमटी किंवा इतर कोणत्याही प्रिस्क्रिप्शनची औषधं. कशाचीही ऑर्डर द्या, अगदी घरपोच डिलिव्हरी मिळते."

तरंग उत्साहात सांगत होता की डार्कवेब किती सोपं आणि एक्साईटिंग आहे. इथं कोकेन, हेरॉईन सारखे अंमली पदार्थ भाजीसारखे विकले जातात, अगदी घरपोच डिलिव्हरीच्या सुविधेसह.

त्यांनी सांगितलं, "वेबसाईटच्या डिलरनं आम्हाला विचारलं की, तुम्हाला ही डिलिव्हरी कशी हवी आहे? त्यांनी मला सुचवलं की खाण्याच्या किंवा खेळण्याच्या डब्यातून डिलिव्हरी घ्यावी. आम्ही खेळण्यांच्या डब्यांचा प्रस्ताव स्वीकारला."

तरंग सांगतो, "आम्हाला ना कोणता फोन आला ना कोणता प्रश्न विचारण्यात आला. डिलिव्हरी कधी द्यायची याची वेळ विचारण्यासाठी फक्त एक इमेल आला. अगदी वेळेवर आम्हाला डिलिव्हरी मिळाली होती. तोपर्यंत आम्हाला वाटलं होतं की, आम्ही लुटलो गेलो आहोत आणि कसलीही डिलिव्हरी मिळणार नाही. पोलीस चौकशी करतील, अशी भीतीही वाटली होती. पण जेव्हा ऑर्डर आली तेव्हा आम्ही वारंवार ऑर्डर द्यायला सुरुवात केली."

डार्क वेब काय आहे?

डार्क वेब इंटरनेटचा असा कोपरा आहे जिथं सर्व काळेधंदे चालतात. आपण जे इंटरनेट वापरतो तो वेबच्या एकूण जगाचा फारच लहान भाग आहे. एक अंदाज असा आहे की जवळपास 90 टक्के इंटरनेट हे लपलेलं म्हणजेच डीप वेब आहे.

डीप वेबमध्ये अशा सर्व प्रकारच्या वेबपेजचा समावेश आहे जे सर्च इंजिन शोधू शकत नाही. उदाहरणात डेटाबेस, स्टेजिंगच्या पातळीवरची वेबसाईट, पेमेंट गेटवे इत्यादी.

डार्क वेब

फोटो स्रोत, Getty Images

डार्क वेब अशाच डीप वेबचा एक कोपरा आहे जिथं हजारो वेबसाईट अनोळखी राहून काळेधंदे करत असतात.

इथं किती वेबसाईट आहेत, किती डीलर आहेत, खरेदी करणारे किती आहेत याची माहिती मिळवणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळेच डार्क वेबवर चालणाऱ्या या कारभाराचा पसारा किती आहे याचा अंदाज करता येत नाही.

परंतु अमेरिकेतल्या एका विद्यापीठाच्या हवाल्यानं देण्यात आलेल्या एका वृत्तानुसार 2015ला डार्क वेबवरील अंमली पदार्थांचा व्यवसाय अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचला होता.

डार्क वेबची सुरुवात कधी झाली?

डार्क वेबची सुरुवात 1990च्या दशकात झाली. अमेरिकी लष्करानं त्यांची गोपनीय माहिती कुणाच्या हाती लागू नये यासाठी डार्क वेबची सुरुवात केली.

डार्क वेबवर सायनाईड सारखं विष आणि इतर अंमली पदार्थ तर घरपोच मिळतातच. त्याचबरोबर स्फोटकं, बाँब, बंदूक आणि इतर हत्यारंसुद्धा मिळतात. इतकंच काय कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणजेच भाड्यानं मारेकरी सुद्धा उपलब्ध होतात.

प्रत्येक देशातील कायदे, पोलीस यंत्रणांची कार्यपद्धती आणि पोलिसांच्या दक्षतेची पातळी यात फरक आहे. त्या त्या देशांतल्या परिस्थितीनुसार या बेकायदेशीर व्यवसायांची कार्यपद्धती बदलत असते.

फसवेगिरी करणारे सुद्धा डार्क बेव वापरत असतात. इथं खोटे पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना आणि इतर आयडी प्रुफसुद्धा मिळतात.

दहशतवाद्यांना रुची

डार्क वेबमध्ये गुप्त माहिती आणि सरकारी डेटा हॅक करण्याची क्षमता असणारे हॅकरही मिळतात.

डार्क वेब

डार्क वेबवर दहशतवाद्यांच्या अस्तित्वाची बातमीसुद्धा येत असते. असं सांगितलं जातं की स्वतःला इस्लामिक स्टेट म्हणून घेणारी संघटना डार्क वेबवर निधी गोळा करत असते शिवाय संदेशांची देवाणघेवाण करते.

डार्क वेबला अॅक्सेस करण्यासाठी खास ब्राउजर असतात. या ब्राउजरना कांद्यांची उपमा देता येऊ शकते. कांद्यासारखे या ब्राउजरला सुरक्षेच्या लेअर असतात.

लॉगइन केल्यानंतर कंप्युटरचा आयपी सतत बदलत असतो. त्यामुळे कोण कुठं बसून काय विकत आहे, कोण कुठे बसून काय विकत घेत आहे, काय पाहत आहे, काय दाखवत आहे याचा कोणालाच पत्ता लागत नाही. याच कारणामुळे पोलीस यावर पूर्णपणे निर्बंध लावू शकत नाहीत.

लक्ष ठेवणं कठीण

ओपन इंटरनेट आणि सर्वसामान्य सर्च इंजिनवर होणाऱ्या कामांवर लक्ष ठेवणं सोपं असतं. वेब पोर्टल तुमची हिस्ट्री सेव्ह करत असतं. गुप्तचर संस्था कीवर्डवरून कोणतीही माहिती मिळवू शकतात. पण डार्कवेबवर लक्ष ठेवण अतिशय कठीण काम असतं.

याच कारणांमुळे डार्क वेब बेकायदेशीर घडामोडींचा अड्डा बनलं आहे.

व्यवहारासाठी बिटकॉईनचा उपयोग

डार्क वेब एकप्रकारे डिजिटल मार्केट आहे. पण ज्या वस्तू बेकायदेशीर आहेत, त्यांची खरेदी विक्री इथं होत असल्याने ते बेकायदेशीर आहे.

डार्क वेब

फोटो स्रोत, Getty Images

ई-कॉमर्सवर ज्या प्रकारे विविध ऑफर दिल्या जातात तशाच ऑफर डार्क वेबवरही असतात. यावर तुम्ही इतर युजर्सशी चॅटिंगही करू शकता.

भारतात डार्क वेबचा वापर मुख्यतः अंमली पदार्थांची खरेदी, चाईल्ड पॉर्न, पायरसी, मानवी तस्करी, खुनाची सुपारी देणे आणि दहशतवादाचा प्रसार यासाठी होत असतो.

व्यवहारांसाठी पैशांची देवाणघेवाण क्रिप्टोकरन्सीनं केली जाते. हे डिजिटल चलन आहे, त्याचाही ट्रॅक ठेवणं महाकठीण असतं. त्यामुळेच बेकायदेशीर व्यवसायांसाठी त्याचा वापर होत आहे.

युवकांना का आकर्षित करतं डार्क वेब?

भारतात 7 कोटींपेक्षा जास्त लोक अंमली पदार्थांच्या आहारी गेले असल्याचं सांगितलं जातं. पण याची कोणतीही सरकारी आकडेवारी नाही.

2016 मध्ये सामाजिक न्याय मंत्रालयानं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेससोबत एक सर्व्हे करत असल्याचं सांगितलं आहे. याचा अहवाल यंदाच्या वर्षात मिळणार आहे.

डार्क वेब, बिटकॉइन

फोटो स्रोत, Getty Images

डार्क वेब युवकांना तीन बाबी देतं. ते म्हणजे ओळख लपवण्याची सोय, अॅडव्हेंचर आणि वैविध्य. उदाहरणार्थ तरंग याला वयाच्या 14व्या वर्षी सहजपणे अंमली पदार्थ मिळाले होते.

तो सांगतो, "अंमली पदार्थ शाळा कॉलेजच्या बाहेरही मिळतात. पानच्या टपरीवरही मिळतात. पण डार्क वेब खासगी आणि थ्रिलिंग आहे."

2011 नंतर वाढ

2013 मध्ये एफबीआयनं डार्क वेबचा एक काळा बाजार असलेल्या सिल्क रोडचा पर्दाफाश केला होता. 2014मध्ये ते संपवण्यासाठी युरोपोलनं एफबीआयला मदत केली होती.

गेल्या वर्षी डच नॅशनल पोलीस, एफबीआय आणि डीईए यांनी डार्क वेबचे हंसा आणि अल्फाबे हे बाजार बंद केल्याचा दावा केला होता.

या टास्कफोर्सच्या अधिकाऱ्यांच्या मते त्यांना डीलर्स आणि खरेदीदारांचा डेटाबेस मिळाला होता.

पण, तज्ज्ञ मात्र याबद्दल उत्साही नव्हते. पायरसी आणि पॉर्न बंद करण्यासारखं हे आहे. दहा साईट बंद केल्या तर 20 नव्या सुरू होतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. गेल्या वर्षी सिल्क रोडची नवी अवृत्ती आल्याची चर्चा होती.

आव्हान खडतर असलं तरी पोलीस आणि गुप्तचर संस्था प्रयत्न करत आहेत. 19 फेब्रुवारीला ब्रिटनमध्ये डार्क वेबवर लहान मुलांना ब्लॅकमेल करून त्यांचं शोषण करणाऱ्या मॅथ्यू फॉल्डर याला 32 वर्षांची शिक्षा झाली होती.

डार्क वेब

फोटो स्रोत, Christopher Furlong/Getty Images

अनेक वर्षं गुंगारा देणाऱ्या फॉल्डरला पकडण्यासाठी एफबीआय, होमलॅंड सिक्युरिटी, युरोपोल शिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इस्राईल यांनीही ब्रिटनची मदत केली होती.

भारतीय पोलीस काय करत आहेत?

भारतात डार्क वेबशी लढण्यासाठी विशेष कायदा नाही. अशा स्थितीत पोलीस काय करत आहेत?

आंतरराष्ट्रीय सार्वजनिक धोरणाच्या जाणकार सुबी चतुर्वेदी सांगतात, "आपल्या पोलिसांची अडचण अशी आहे की, अशा गुन्हेगारांना शोधण्यासाठी कोणतीच कायदेशीर तरतूद नाही. आपल्याकडे CRPC आणि IT अॅक्ट आहे जो अशा लोकांना लागू होऊ शकतो. पण अशा लोकांना शोधल्याशिवाय त्यांचं नेटवर्क क्रॅक कसं करणार. शिवाय कोणतही स्पेशल युनिट नाही. फक्त 9 सायबर सेल आहेत. आपल्याला मोठ्या प्रमाणावर साधनं आणि गुंतवणुकीची आवश्यकता आहे."

सुबी यांच्या मते, "डार्क वेब आपलं तंत्रज्ञान आणि कोड नेहमी सुधारत असतात. त्यामुळे निव्वळ पोलीस आणि गुप्तचर संस्था यावर निर्बंध आणू शकत नाहीत. समाज आणि पालकांची भूमिका सर्वांत मोठी आहे. ही कामं घरात बसून होत आहेत. मुलं इंटरनेटवर आहेत आणि मुलांना आईवडिलांपेक्षा जास्त तांत्रिक माहिती आहे. त्यामुळे पालकांना अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे.

पुणे सायबर सेलचे डीसीपी सुधीर हिरेमठ म्हणतात, "कोणत्याही दाव्यावरून डार्क वेबचा आकार किती मोठा असेल याचा अंदाज करता येत नाही. जेव्हा एफबीआयनं 'सिल्क रोड' बंद केला त्यावेळी याचा कारभार 120 कोटी अमेरिकन डॉलर होता, असा अंदाज वर्तवण्यात आला होता."

'सिल्क रोड' डार्क वेबवर चालणारा अंमली पदार्थांचा सर्वांत मोठा व्यापार होता. एफबीआयनं 2013ला 'सिल्क रोड बंद' केला होता.

डार्क वेब

हिरेमठ सांगतात, "इथं सर्व प्रकारची शस्त्रास्त्र आणि कॉन्ट्रॅक्ट किलर्सही मिळतात. या शिवाय मालवेअर पाठवणे, खंडणी वसुली यासाठी डार्क वेबचा वापर केला जातो. भारतात डार्क वेबचा अंमली पदार्थ, चाईल्ड पॉर्न, पायरसी यासाठी जास्त वापर होतो."

"ओपन इंटरनेट आणि सर्वसामान्य सर्च इंजिनवर जे चालतं त्यावर लक्ष ठेवता येतं. गूगल तर आपल्यावर सर्वत्र लक्ष ठेऊन असतं. पण डार्क वेबवर लक्ष ठेवणं कठीण असतं. डार्क वेबसाठी विशेष प्रकारचे सॉफ्टवेअर वापरले जातात, त्यामुळे कंप्युटरचा आयपी लपवला जातो. आयपी न सापडल्यामुळे खऱ्या युजरपर्यंत पोहोचणं कठीण होऊन बसतं."

व्हिसल ब्लोअरही वापरतात

डार्क वेबचा वापर इतर कामांसाठीही होतो. अमेरिकेतील व्हिसल ब्लोअर एडवर्ड स्नोडेन यांनी डार्कवेबवर अमेरिकेतल्या गुप्तचर संस्था लोकांच्या खासगी बाबींबर कसं लक्ष ठेवतात, याची माहिती जाहीर केली होती.

विकीलिक्सच्या ज्युलियन असांजे यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना त्यांच्या कामात डार्क वेबचा मोठा लाभ झाल्याचं म्हटलं होतं.

मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील काही देशांतले कार्यकर्ते त्यांच्या देशांची माहिती देण्यासाठी डार्क वेबचा वापर करत असतात.

(हे वृत्त दिल्लीतील एका युवकानं दिलेल्या माहितीवर आधारीत आहे. त्यानं बीबीसीला सांगितलं की तो डार्क वेबवर ड्रग्ज मागवतो आणि अशा युवकांची संख्या जास्त आहे. त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात आलं असून बातमीतलं त्याचं नाव बदलण्यात आलं आहे. या बातमीचा उद्देश डार्क वेब, अंमली पदार्थ आणि इतर बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहित करण्याचं नाही. डार्क वेबवरील धोक्यांची माहिती लोकांना व्हावी, जेणे करून ते स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला आणि मुलांना यापासून वाचवू शकतील हाच आमचा उद्देश आहे.)

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)