श्रीदेवी : 'चांदनी'च्या 'जुदाई'चा 'सदमा'!

    • Author, वंदना
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

हिंदी सिनेसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री सुपरस्टार ठरलेल्या श्रीदेवी यांची अचानक एक्झिट धक्कादायक ठरली. एक परिपूर्ण कलाकार म्हणून ओळख असलेल्या श्रीदेवी सर्वच प्रकारच्या भूमिकेत फिट बसत होत्या. कॉमेडी, अॅक्शन, नृत्य, ड्रामा अशा सर्व प्रकारच्या भूमिका त्यांनी लिलया पेलल्या होत्या. 54 वर्षी त्यांचं निधन झालं, यात त्यांचं फिल्मी करीअर होतं तब्बल 50 वर्षांचं.

श्रीदेवी बरोबर मिस्टर इंडिया सिनेमा बनवणारे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी या सिनेमाच्या वेळी त्यांच्या उडालेल्या गोंधळाचं जे वर्णन केलं आहे त्यातून श्रीदेवी यांची जादू कशी होती, याची कल्पना येते.

ते म्हणतात, "हवाहवाई गाण्याचं शूटिंग सुरू होतं. त्यावेळेस मला समजत नव्हतं की श्रीदेवीचा क्लोजअप शूट करू की दूरवरून नृत्य शूट करू. त्यांचा चेहरा, चेहऱ्यावरील भाव, त्यांचे डोळे इतके सुंदर होते की श्रीदेवीला फक्त बघतच बसावं असं वाटत होतं."

ते पुढे म्हणतात, "त्यांचा चेहरा शूट करायचा तर क्लोजअप घ्यावा लागणार होता. पण त्यामुळे त्यांचं नृत्य कॅमेऱ्यातून सुटण्याची भीती होती. त्यांचं नृत्य इतकं मोहक होतं की वाटायचं दूरवरून कॅमेऱ्यात त्यांची प्रत्येक अदा टिपून घ्यावी."

प्रत्येक सिनेमामध्ये श्रीदेवीचं वेगळी होती.

'सदमा'मध्ये त्यांनी 20 वर्षांची अशी मुलगी साकार केली होती, जी आपलं आधीचं जीवन पूर्णपणे विसरली आहे. कमल हासन बरोबर त्यांच्या घरात राहताना एका सात ते आठ वर्षाच्या लहान मुलीमध्ये दिसणारं बालपण त्यांनी त्यात साकारलं होतं.

रेल्वे स्टेशनवरचा श्रीदेवी रेल्वेत बसलेली आहे, हा सीन आठवतो का? तिची स्मृती परत आलेली असते. कमल हासनला भिखारी समजून ती रुक्षपणे पुढे निघून जाते तर हतबल कमल हासन लहान मुलांचा अभिनय करून तिला जुन्या दिवसांची आठवण करून देण्याचा प्रयत्न करत असतो. कदाचित हिंदी सिनेमांतील अप्रतिम अभिनयांतील एक उत्तम नमुना म्हणजे हा सीन ठरावा.

त्या अशा एक कलावंत होत्या, ज्या कुठल्याही भूमिकेत अगदी सहजपणे सामावून जायच्या. 11 वर्षांच्या असताना त्यांनी तेलुगू सिनेमात एका अंध मुलीची भूमिका केली होती.

शुभ्र वस्त्रांमध्ये अगदी सुंदर दिसणारी 'चांदणी' आठवते. कुणीतरी नाकारल्यानं ती दुःखी तर आहे पण त्याचवेळी दूसऱ्याबरोबर जीवन पुन्हा सुरू करण्याविषयी ती अडखळत नाही. भलेही तो प्रयत्न अयशस्वी ठरतो.

आपल्या वयापेक्षा दुप्पट वय असलेल्या व्यक्तीवर प्रेम करणारी 'लम्हे' सिनेमातील पूजा. किंवा 'चालबाज'मध्ये एक अगदीच साधीभोळी आणि एक आक्रमक दोन बहिणींची दुहेरी भूमिका.

'मॉम' सिनेमात आपल्या मुलीवर झालेल्या गँगरेपचा प्रतिशोध घेण्यासाठी घेतलेल्या आईचं ते रूप ज्यात ती विचारते, "अगर गलत और बहुत गलत में से चुनना हो तो आप किसे चुनेंगे?"

गेल्याच वर्षी श्रीदेवी यांच्या फिल्म करिअरची 50 वर्षं झाली. तर 54व्या वर्षी त्यांनी जीवनाला 'अलविदा' म्हटलं. म्हणजेच त्यांचं संपूर्ण जीवनच सिनेमामय होतं.

51 वर्षांपूर्वी एक चार वर्षांची मुलगी तामिळ सिनेमाच्या स्क्रीनवर दिसली. खरंतर पडद्यावर त्या मुलीनं एका लहान मुलाची भूमिका केली होती. या मुलीचं नाव होतं श्रीदेवी.

तामिळ आणि तेलुगू सिनेमांमध्ये चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करत त्या हिंदी सिनेमांमध्ये आल्या. 1975मध्ये जुली सिनेमात बाल कलाकाराची भूमिका त्यांनी केली होती.

याच श्रीदेवी पुढे हिंदी सिनेमांच्या सुपरस्टार झाल्या. नायिका म्हणून त्यांनी सर्वांत आधी रजनीकांत यांच्याबरोबर 1976मध्ये तामिळ सिनेमात काम केलं होतं. यात कमल हासनची यांची खास भूमिका होती.

1978मध्ये भारती राजाच्या 'सोलवां सावन' या सिनेमातून श्रीदेवी यांचं हिंदी पडद्यावर पदार्पण झालं. पण त्याकडं कुणाचं लक्ष वेधलं गेलं नाही. श्रीदेवी यांचं वजन त्यावेळेस 75 किलो होतं आणि लोक त्यांनी 'थंडर थाइज' म्हणायचे. मग 1983मध्ये हिंमतवाला रिलीज झाला.

सुंदर नेत्रांच्या श्रीदेवीने हळूहळू आपल्या कामातून आणि अभिनयातून टीकाकारांची तोंडं बंद केली. त्याकाळात लोक त्यांना लेडी अमिताभ असंही म्हणायचे.

त्यांचे वडील के. अय्यपन हे वकील होते. त्यांच्या वडिलांनी काँग्रेसच्या तिकिटावर शिवाकाशीमधून निवडणूकही लढवली होती. त्यावेळी श्रीदेवी यांनी वडिलांच्या प्रचारातही भाग घेतला होता. श्रीदेवी यांच्या करीअरमध्ये त्यांच्या आईचा सुरुवातीपासून वाटा आहे.

श्रीदेवी यांचं कॉमिक टाईमिंग उत्तम असायचं.

'मिस्टर इंडिया'मध्ये त्या चार्ली चॅप्लिनचा गेटअप करून एका हॉटेलमध्ये जातात असा एक सीन आहे. हा सीन असा काही अफलातून जमला की त्यांनी सर्वांनाच चितपट केलं.

नृत्याच्या बाबतीत तर त्या नंबर वनच होत्या. 'हवाहवाई', 'मेरे हाथों मे नौ-नौ चुडियाँ', 'नैनो मे सपना', नागिन आणि नगिना सिनेमांतील नागीन नृत्य, अशी अनेक उदाहरण देता येतील.

एका मुलाखतीमध्ये त्यांनी एक आठवण सांगितली होती. नगिना सिनेमातील शेवटचं गाणं आणि नृत्य शूट करायचं होतं आणि सेट फक्त एक दिवसांसाठी उपलब्ध होता. सकाळी त्यांनी जेव्हा शूटिंगला सुरुवात झाली त्याचवेळी दुसरीकडं सेटच्या तोडफोडीचं कामही सुरू होतं आणि फक्त एक भिंत शिल्लक होती. त्यामुळे त्या भिंतीच्या हद्दीतच त्यांना नृत्य करावं लागलं. पण गाणं पाहताना हे कधीच जाणवत नाही.

त्यांच्या आवाजावरून त्यांना सुरुवातीला टीकाही सहन करावी लागली.

त्यांना वैयक्तिक आयुष्यात 90च्या दशकात बरेच चढउतार पाहावे लागले. विवाहित असलेल्या बोनी कपूर यांच्या बरोबर त्यांनी लग्न केलं. बोनी कपूर यांच्या बरोबर त्यांनी अनेक सिनेमे केलेले आहेत. 1997मध्ये त्यांचा जुदाई हा सिनेमा आला. या सिनेमानंतर त्यांनी एक दीर्घकालीन ब्रेक घेतला.

पण जेव्हा 2012मध्ये इंग्लिश विंग्लिश सिनेमातून त्यांनी पुनरागमन केलं, तेव्हा असं वाटलचं नाही की त्या कधी सिनेमापासून लांब गेल्या होत्या. गेल्यावर्षी आलेला 'मॉम' हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.

आपल्या दोन्ही मुलींवर त्यांचा फार जीव होता, जसा प्रत्येक आईचा असतो. सोशल मीडियावर त्या नेहमी त्यांच्या मुलींसोबतचे फोटो शेअर करत.

त्यांची मुलगी जान्हवीचा पहिला सिनेमा 'धडक' पाच महिन्यांनंतर 20 जुलै 2018ला प्रदर्शित होत आहे. श्रीदेवी यांच्या ट्विटर पेजवर गेलात तर तुम्हाला 'धडक' सिनेमा विषयीची पोस्ट अगदी टॉपवर मिळते.

'मदर इंडिया' हा त्यांचा ड्रीम रोल होता.

'मॉम' त्यांच्या करिअरचा शेवटचा आणि 300वा सिनेमा होता. मला गेल्या वर्षीचा एक इंटरव्ह्यू अजूनही आठवतो. जेव्हा त्यांचे पती बोनी कपूर यांनी मोठ्या गर्वानं सांगितलं होतं, "श्रीदेवी यांनी अॅक्टिंगची 50 वर्षं पूर्ण केली असून त्यांचा 300वा सिनेमा येत आहे. तुम्हाल असा कुणी दुसरा कलावंत माहीत आहे का?"

असे कलाकार असतीलही कदाचित. पण 'चांदनी'सारखा प्रकाश पसरवणारी, बोलक्या डोळ्यांची श्रीदेवी अगदीच वेगळी होती. ज्यांचे सिनेमे चेहऱ्यावर नेहमीच एक हास्य फुलवून जात असत.

चालबाज सिनेमामध्ये एका सीनमध्ये श्रीदेवीमुळे वैतागून रजनीकांत म्हणतात, "ये रोज रोज नाच गाना तेरे बस का नहीं है." या प्रश्नाचं उत्तर देतानाचा "तुझे तो मैं ऑल इंडिया स्टार बनकर दिखाऊँगी" हा डॉयलॉग श्रीदेवी यांनी त्यांच्या आयुष्यात खरा करून दाखवला.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)