कबुतरांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात : भूतदया पडतेय महागात?

फोटो स्रोत, Sagar Kasar/BBC
- Author, सागर कासार
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुणे
तुम्ही पक्षीमित्र आहात का? किंवा भूतदया म्हणून कबुतरांना दाणे टाकायला तुम्हाला आवडतं का? सावधान... कारण कबुतरांना खाद्य टाकायची सवय जीवावर बेतू शकते. कबुतरांमुळे न्यूमोनियाचा फैलाव वाढत असल्याच्या निरीक्षणाची नोंद घेऊन पुणे महापालिका कबुतरांना खाद्य टाकण्याबाबत धोरण निश्चित करत आहे.
कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे न्यूमोनिया होण्याचं आणि फैलावण्याचं प्रमाण पुणे आणि मुंबईत प्रमाण वाढत आहे, असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. याची दखल घेऊन यासंदर्भात अधिक अभ्यास करण्याचं पुणे महापालिकेनं ठरवलं आहे.
"पुणे शहरातल्या नदीपात्रालगतचा परिसर, ओंकारेश्वर मंदिर, ओपोली थिएटर चौक आणि नाना पेठेतल्या महावितरण ऑफिस समोरील चौक या चार ठिकाणी कबुतरांचा वावर मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कबुतरांच्या विष्टा आणि पिसांमुळेच हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया आजाराचे रुग्ण वाढले आहेत का? याचा आम्ही अभ्यास करत आहोत. यासाठी त्या भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणी करण्यात येईल आणि कबुतरांना नागरिकांनी खाद्य टाकू नये, यासाठी विशिष्ट धोरण करण्याबाबत विचार करीत आहोत", अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.अंजली साबणे यांनी बीबीसी मराठीला दिली.
पुणे शहरातील ओंकारेश्वर मंदिर, सारसबाग, नदीपात्र रस्ता, केईएम हॉस्पिटल जवळील काही भागात कबुतरांना खाद्य टाकणारे नागरिक दररोज दिसतात.

फोटो स्रोत, Sagar Kasar/BBC
"या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता पुणे महापालिका कबुतरांना खाद्य टाकण्याबाबत एक धोरण निश्चित करण्यात येत आहे", असं महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितलं.
बीबीसीच्या या प्रतिनिधीनं या परिसरात फेरफटका मारून इथल्या नागरिकांना कबुतरांमुळे काही समस्या जाणवताहेत का हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
केईएम रुग्णालया जवळ अपोलो थिएटर येथील चौकात मागील 10 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर कबुतरं येऊन बसत आहेत, अशी माहिती इथल्या स्थानिकांनी दिली..
या भागात फुलांचा व्यवसाय करणारे संतोष घारे म्हणाले, "अपोलो थिएटरजवळ आमचा फूल विक्रीचा व्यवसाय 40 वर्षांपासून आहे. मात्र गेल्या आठ वर्षांपासून कबुतरं इथे येण्याचं प्रमाण वाढलं आहे. कारण नागरिक सकाळपासून सायंकाळपर्यँत ज्वारी, बाजारी आणि मका यासारखं खाद्य टाकून जातात."

फोटो स्रोत, Sagar Kasar/BBC
"याचा परिणाम आमच्या आरोग्यावर होत आहे. हा चौक रहदारीचा असल्याने गाड्यांची सततची वर्दळ असते. मोठी वाहनं वेगात आल्यावर इथे जमलेली कबुतरं एकदम उडून जातात. त्यामुळे धूळ उडते. ती नाकातोंडात जात असते. कबुतरांच्या विष्ठेच्या वासाने तर बसणं देखील मुश्किल झालं आहे", असं घारे म्हणाले.
या कबुतरांमुळे श्वास घेण्यास कधी कधी त्रास होतो, अशी तक्रार त्यांनी केली. "प्रशासनाने कबुतरांसाठी एखादं स्वतंत्र पार्क केल्यास आमची यातून सुटका होईल", असं त्यांनी सांगितलं.
या चौकात दररोज कबुतरांसाठी खाद्य टाकायला येणारे रोनित जाहगीर यांच्याशीही बीबीसीनं संवाद साधला. जहागीर म्हणाले, "कबुतरांना खाऊ घालायला मी नेहमी येतो. मुक्या पक्ष्यांना कोण जेवण देणार या भावनेतून मी येतो आणि येत राहीन."

फोटो स्रोत, Sagar Kasar/BBC
"प्रशासन इथे कबुतर खाद्य टाकण्यावर बंदी आणणार असेल, तर मी जिथे कबुतरं असतील तिथे खाद्य टाकेन. मात्र यात खंड पडू देणार नाही", असंही ते म्हणाले.
महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की, "पुणे शहरातील काही ठिकाणी कबुतरांना दररोज धान्य टाकत असल्यानं कबुतरांची संख्या वाढली आहे. ही संख्या काही हजारांहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. या कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे नागरिकांना आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करिता महापालिका प्रशासनामार्फत कबुतरांना खाद्य टाकण्यावर बंदी घालण्याच धोरणावर विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








