ब्लॉग : 'पद्मावत' पद्मावतीच्याच विरोधात आहे, कारण...

फोटो स्रोत, VIACOM18MOTIONPICTURES
- Author, दिव्या आर्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली
पद्मावत पाहून मी सिनेमा थिएटरबाहेर पडले तर असं वाटत होतं जणू माझंच सर्वांग जळत आहे. माझ्या हृदयात आणि डोक्यात आग भडकली आहे असं वाटू लागलं होतं. काहीसा राग आणि काहीसा संभ्रम अशी माझी अवस्था होती. या चित्रपटात दाखवलेल्या हिंसक दृश्यांनी माझ्या मनावर आघात झाले असं वाटू लागलं होतं.
सिनेमाच्या शेवटच्या 15 मिनिटांत शेकडो रजपूत महिलांना पद्मावती जोहरमध्ये उडी मारायला प्रवृत्त करते. आगीचे भडकणाऱ्या ज्वाळा, अंगभरून दागिने आणि गडद लाल साड्या घातलेल्या बायका, त्यामध्ये एक गर्भवती स्त्री देखील असते.... आणि या सगळ्यांच्या मागे क्रूर, हपापलेला आणि रागानं डोळे लाल झालेला अलाउद्दीन खिलजी.
काळे कपडे, केस मोकळे सो़डून धापा टाकत किल्ल्याच्या पायऱ्या चढत खिलजी येतो आणि मग शेवटचं ते जोहरचं दृश्य.
जोहर या प्रथेचं उदात्तीकरण
आपला समाज आणि नवऱ्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी आगीत उडी घेणाऱ्या पद्मावतीला पाहणं हे एक बलात्कारासारखा लैंगिक अत्याचार पाहण्यासारखंच क्रूर वाटतं.
हा सगळा हिंसक प्रकार चुकीचा किंवा बुरसटलेला जुना विचार असं न दाखवता, उलट या सिनेमात जोहरला एक महान त्यागाचं प्रतीक करून ठेवलं आहे. जोहरचं उदात्तीकरण केलं आहे.
युद्धात जिंकलेल्या विजेत्यापासून आपलं रक्षण करण्यासाठी पराभव झालेल्या पतीच्या बायका आगीत उडी मारून नाईलाजानं जीव द्यायच्या म्हणजे 'जोहर' करायच्या, त असं इतिहासामध्ये नमूद केलं आहे, हे खरं.
सती प्रथेसारखाच हा स्त्रियांनी स्वतःने घेतलेला निर्णय नसून हे त्या काळच्या सामाजिक दबावातून नाईलाजानं उचललेलं पाऊल आहे. या प्रथेचं गुणगान करणं हे सती किंवा केशवपन प्रथेचं गुणगान करण्यासारखंच आहे.

फोटो स्रोत, PADMAVAT/FACEBOOK
समाजाच्या प्रतिष्ठेचं ओझं स्त्रियांवर टाकून ती राखण्यासाठी स्त्रियांनी आगीत उडी मारावी, असं म्हणणाऱ्यांचं मला आश्चर्य वाटतं. स्त्रियांवरच पुन्हा प्रतिष्ठेचं ओझं टाकणाऱ्या प्रथेचं गुणगान गातात म्हणून याला विरोध होत नाहीये, याचं मला आश्चर्य वाटतं.
स्त्रीचं अस्तित्व
अशा खोट्या प्रतिष्ठेसमोर स्त्रियांच्या जिवाची काहीही किंमत नाही. एवढंच नव्हे तर जोहरसाठीसुद्धा राणी पद्मावतीला पतीची परवानगी घ्यावी लागते!
सिनेमातील पद्मावतीच्या पात्रावरून वाद नक्की व्हायला पाहिजे पण, त्यासाठीची माझी कारणं करणी सेनेच्या अगदी उलट आहेत.
सिनेमा पाहिल्यावर असं वाटतं पद्मावतीचं काही अस्तित्वचं नाही. तिला एखाद्या सुंदर वस्तूसारखं दाखवण्यात आलं आहे.
एक राजानं तिला मिळवलंय आता तिचं रक्षण करू पाहतोय तर दुसरा तिला मिळवण्यासाठी युद्ध करतोय. लग्नानंतर तिचं काहीच अस्तित्व नाही. तिचं जीवन फक्त पती आणि त्याच्या जातीय अस्मितेच्या अवतीभोवती फिरताना दाखवलं आहे.
चुकीच्या कारणासाठी विरोध?
एका ऐतिहासिक काव्यावर बनवलेल्या या सिनेमात रुढीवाद खच्चून भरलेला आहेत. स्त्री हे युद्धाचं कारण, युद्धाची किंमत आणि युद्धात जिंकलेला एक नजराणा आहे असा संदेश या सिनेमातून दिला जातो.
राणीचं रूप हेच तिचं अस्तित्व आहे असं वाटतं. माझं म्हणणं इतकंच आहे की स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका संकुचित ठेऊ नका. करणी सेनेचे तर समर्थक विनाकारण घाबरत होते. रजपूतांच्या प्रतिष्ठेला या सिनेमामुळं धक्का पोहोचलाच नाही.

फोटो स्रोत, PADMAVAT/FACEBOOK
'पद्मावत'मध्ये हिंदू राणी आणि मुस्लीम राजामध्ये प्रत्यक्षात किंवा स्वप्नदृश्यात प्रेमप्रसंग दाखवलेला नाही. राणी पद्मावतीने खिलजी असो वा इतर कुणीही अनोळखी पुरुषासमोर नृत्य केलेलं दाखवलेलं नाही. राणीचं अंग दिसेल असे कपडेही तिनं परिधान केलेले दाखवलेले नाहीत.
स्त्रीची प्रतिष्ठा
खरंतर भीती आणि राग यांचं मूळ काय यांच्या व्याख्येतच काही गडबड आहे. स्त्रीकडे सौंदर्यापलीकडेही काही आहे असा विचार न केल्याचं हे फलित आहे असं मला वाटतं.
झाकलेलं शरीर, घुंघट, पदर आणि चार भिंतीमध्ये कोंडलेली राणी पाहून माझ्याच मनाची घुसमट झाली. सर्व प्रकारचे सिनेमे व्हायला पाहिजेत आणि त्यावर चर्चाही व्हायला पाहिजे, हे खरं. पण एखाद्या स्त्रीच्या नावावर जर चित्रपट काढला असेल तर स्त्रीची खरी प्रतिष्ठा आणि दर्जा खऱ्या अर्थाने रुपेरी पडद्यावर साकारला गेला तर किती चांगलं होईल!
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








