'मी माझ्या पत्नीची कौमार्य चाचणी होऊ देणार नाही'

    • Author, विवेक तमाईचिकर
    • Role, सामाजिक कार्यकर्ते

परवा रात्री माझ्या मित्रांना मारहाण झाली. का तर ते जातपंचायतीच्या विरोधात बोलले म्हणून. हे आमच्यासाठी नवीन नाही. कंजारभाट समाजातले जे-जे विरोधात बोलतात त्यांना मारहाण केली जाते, जातीच्या बाहेर काढलं जातं. सामाजिक बहिष्कार टाकला जातो.

गेल्या आठवड्यात मी जिथे राहतो त्या अंबरनाथमध्ये माझ्या वस्तीत जातपंचायत भरली होती. माझ्यासारख्या काही तरुणांनी 'Stop The V Ritual' हे अभियान सुरू केल्याने महाराष्ट्रातल्या जातपंचायतीसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या चळवळीवर दबाव आणण्यासाठी समाजातल्या लोकांची माथी भडकवण्याचा प्रकार सुरू झालाय.

अंबरनाथला वांद्रापाडा परिसरात 19 जानेवारीला जातपंचायत बसली होती. त्यावेळी 'Stop The V Ritual' चळवळीतल्या सदस्यांवर मानहानीचे गुन्हे दाखल करणं आणि वेळप्रसंगी स्त्रियांनी आमच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करणं, असे निर्णय घेण्यात आले.

या जातपंचायतीत मला माघार घेण्यासाठी 5 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मी माघार घेतली नाही तर 10 फेब्रुवारीला महाराष्ट्रात जिथे-जिथे आमच्या वस्त्या आहेत, तिथल्या पोलीस ठाण्यांमध्ये माझ्यावर मानहानीचे गुन्हे दाखल करण्यात येतील.

माझ्यावर थेट बहिष्कार टाकलेला नाही, पण चळवळीतल्या माझ्यासारख्या अनेकांना बहिष्कृत केल्याचा अनुभव येतोय. कंजारभाट समाजाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये आम्हाला सहभागी होऊ दिलं नाही. मी अंबरनाथचा रहिवासी असूनही मला तिथल्या जातपंचायतीत बोलू दिलं जात नाही. आतातर बोलावलंही जात नाही. पण माझ्या बाजूने राज्य सरकारचा सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा उभा राहील, अशी आशा वाटते.

'कौमार्य चाचणी' म्हणजे नेमकं काय?

आमच्या अभियानाचा पाया हा संवाद साधत चर्चा करणं हा आहे. कंजारभाट समाजातल्या जातपंचायतीच्या अनिष्ठ, अन्यायकारी आणि अघोरी प्रथांविरोधातल्या संघर्षाला सुरुवात झाली ती मी लहान असताना.

इयत्ता सातवीत असताना माझ्याच एका नातेवाईकाच्या लग्नात मी गेलो होतो. मोठ्या दिमाखात लग्न पार पडलं. पण दुसऱ्याच दिवशी त्या नवऱ्या मुलीला चपलेने मारहाण करण्यात आली. पुढे जसजसं कळू लागलं तसं भयानक सत्य समोर आलं.

कंजारभाट समाजाताली स्त्री 'व्यभिचारी' आहे की नाही, हे ठरवणारी कौमार्य चाचणी लग्नानंतर घेतली जाते. अरेंज मॅरेज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही कौमार्य चाचणी द्यावी लागते. कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे.

हिंदू वैदिक पद्धतीने लग्न झाल्यानंतर त्याच लग्नमंडपात लगेचच पंचायत भरवली जाते. तिथे नवविवाहित जोडप्याला कौमार्य चाचणीसाठी मानसिकदृष्ट्या तयार केलं जातं. त्यानंतर कंजारभाट समाजाच्या 'प्रतिसंविधानातील' कलम 38 (1,2,3,4) चा आधार घेत त्या दोघांना लॉजवर घेऊन जातात. त्यांच्यासोबत दोन्हीकडचे नातेवाईक उपस्थित असतात. इजा करणारी कोणतीही टोकदार वस्तू नाही याची शहानिशा करण्यासाठी त्या रूमची अतिशय बारकाईने तपासणी केली जाते.

मग खरा खेळ सुरू होतो, पांढऱ्या चादरीवर रक्ताच्या डागाचा तमाशा पाहणारा खेळ.

खासगीपणा अधिकाराला पायदळी तुडवत, वधू आणि वराला अर्ध्या तासाचा वेळ देत, नातेवाईक मंडळी बाहेर बसलेली असतात. सर्व नीट सुरू आहे ना, अशी कधी-कधी बाहेरून विचारणाही केली जाते.

काही वेळेस मुलगा दारू पिणारा असेल तर त्याला दारू पाजली जाते, कधी औषधांचा तर कधी ब्लू फिल्मचाही वापर केला जातो. हे सर्व त्या मुलीला निमूटपणे सहन करावं लागतं. याविरोधात कोणी सहसा जात नाही, कारण जातपंचायतीचा कंजारभाट समाजात धाक आहे.

कौमार्य चाचणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवऱ्यामुलीच्या दारात पंचायत भरते. तिथे सगळ्या समाजासमोर पंचमंडळी नवऱ्यामुलाला प्रश्न विचारतात, "तुझा माल कसा होता? खरा की खोटा?"

त्याहूनही अतिशय घृणास्पद भाषेत विचारलं जातं. "तुला जी गोण दिली होती ती फाडलीस की आधीच फाडली होती?" त्यानंतर नवऱ्यामुलाने उत्तर देताना त्याचा तीनवेळा पुनरोच्चार करावा लागतो.

पहिलं बंड 22 वर्षांपूर्वी

1996 साली कौमार्य चाचणीविरोधात कृष्णा इंद्रेकर आणि अरुणा इंद्रेकर या कंजारभाट समाजातल्या जोडप्याने आवाज उठवला होता. खरंतर 22 वर्षांपूर्वीच कंजारभाट समाजात क्रांतिकारी पाऊल उचललं गेलं होतं. 'लव कम अॅरेंज मॅरेज' असल्यामुळे कृष्णा यांनी अरुणा यांना विश्वासात घेतलं.

समाजातील कुप्रथांच्या विरोधातलढण्यासाठी इंद्रेकर जोडप्याने कोर्ट मॅरेज केलं. पण त्यानंतर त्यांना समाजाने वाळीत टाकलं. त्यांना आजही समाजाकडून बहिष्काराचा सामना करावा लागतोय. एकदा तर अरुणा यांना समाजाच्या एका सार्वजनिक कार्यक्रमातून हात पकडून बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी पोलीस तक्रारही झाली.

कृष्णा इंद्रेकर महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्तालयात संचालकपदी आहेत. हे इंद्रेकर कुटुंब आमची प्रेरणा आहेत. माझ्यासाठी ते रोल मॉडेल आहेत.

आजही कंजारभाट समाजाची खोटी इभ्रत स्त्रीच्या योनीभोवतीच आहे. मुलीचं कौमार्य शाबूत असणं म्हणजे आपल्या खानदानाची अब्रू राखली, असा समज या समाजात वाढीला लागला आहे.

स्त्रीचं कौमार्य इतर अनेक कारणांनी जाऊ शकतं, हे मानायला ही मंडळी तयार नाहीत. स्त्री आपल्या बंधनात राहावी असाच, हा हेतू या कौमार्य चाचणीमागे आहे.

कंजारभाट समाजाचं प्रतिसंविधान

कंजारभाट समाज भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरला आहे. पूर्वी भटकत काम करणारा हा समाज स्वातंत्र्योत्तर काळात रोजगार मिळाल्यानंतर टोळक्याने स्थायिक झाला. मौखिक स्वरूपातल्या रूढी-परंपरांना लिखित स्वरूप मिळण्याची गरज काही बुजूर्गांनी व्यक्त केली.

काही ज्येष्ठ पंचमंडळींनी 2000 साली शिर्डीमध्ये अखिल भारतीय सहंसमल समाजाचं अधिवेशन भरवलं होतं (कंजारभाट समाजाला सहंसमल, छारा, सांसी अशीही नावं आहेत). याच अधिवेशनात कंजारभाट समाजाचं लिखित स्वरूपातलं प्रतिसंविधान जन्माला आलं.

प्रतिसंविधानात काय लिहिलंय?

  • जुन्या चालीरीतीचे नियम आणि अंमलबजावणी
  • मार्गदर्शक तत्त्वामध्ये कौमार्य चाचणी कशी घ्यावी याविषयी माहिती
  • आंतरजातीय विवाह केलेल्या मुलीला समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दंड आकारण्यात येतो
  • मुलाने आंतरजातीय विवाह केला तर पंचमंडळींना विशिष्ठ रक्कम दंड म्हणून दिली जाते
  • विवाहबाह्य संबंध असलेल्या स्त्री-पुरूषांचं 'शुद्धीकरण' केलं जातं. भर पंचायतीत लग्न लावून अर्धनग्न करून 150 पावलं चालवलं जातं. त्यांच्यावर गरम पिठाचे गोळे फेकले जातात आणि दूधाने आंघोळ घालत 'शुद्धीकरण' केलं जातं
  • चोरीचा आळ असणाऱ्यांवर गोळा पद्धत वापरली जाते. म्हणजे गोळा किंवा लोखंडी कुऱ्हाड निखाऱ्यांवर रात्रभर तापवली जाते. चोरीचा आरोप असणाऱ्याच्या हातात रूईचं पान देऊन त्यावर गोळा किंवा कुऱ्हाड हातात देऊन सात पावलं चालायला लावतात. हात भाजला तर चोर नाही तर पवित्र
  • प्रत्येक सणा-समारंभाला बसणाऱ्या जातपंचायतीच्या बैठकीला पंचाना काही रक्कम देण्याची 'खुशी' पद्धत प्रचलित आहे. खुशीची रक्कम 3000 ते 50 हजार अशी असू शकते

कंजारभाट समाजातले पंच धनाढ्य कुटुंबातले, वारसा हक्काने चालत आलेले असतात. पंच नेमण्याची विशिष्ठ पद्धत नाही.

कंजारभाट समाजाचा इतिहास

कंजारभाट समाजाचं मूळ राजस्थानमध्ये आहे. पंजाबमधल्या राजा रणजित सिंहाच्या सैन्यात शस्त्राला धार काढणारी जमात असा उल्लेख आमच्या मौखिक परंपरांमध्ये सापडतो. उत्तरेत हरियाणापासून दक्षिणेत कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्येही ही जमात आहे. भटक्या-विमुक्त जमातीमध्ये मोडणाऱ्या कंजारभाट जमातीला गुजरातमध्ये छारा किंवा सहसंमल, राजस्थानमध्ये सांसी म्हणूनही ओळखलं जातं.

जिथे काम मिळेत तिथे स्थायिक होणाऱ्या या समाजाचा इतिहास आहे. शहरं वसल्यानंतर शहरांच्या वेशीवर कंजारभाट समाजाच्या वस्त्या दिसतात. अनेक वर्षं दारू गाळण्याच्या धंद्यात असल्याने मुंबई-पुण्यात आजही शिकले सवरलेले लोक दारूचाच धंदा करताना दिसतात.

महाराष्ट्रात कंजारभाट समाजाची लोकसंख्या साधारण 18 हजारांच्या घरात आहे. आजही 50 टक्के समाज गरीब आहे. पण शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे आमच्या समाजात शासकीय कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर, उद्योगपती आणि बागाईतदारही आहेत.

माझा लढा

जातीतल्या प्रथांविरोधातला लढा आपल्यापासूनच सुरू करावा म्हणून घरच्यांशी बोलायला सुरुवात केली. पण घरातल्या सर्वांकडून तीव्र विरोध झाला.

येत्या मे महिन्यात माझं लग्न आहे. पत्नी ऐश्वर्याही कायद्याचं शिक्षण घेतेय. माझा साखरपुडा झाला त्यावेळी जातपंचायत बसली होती. 'खुशी' या गोड नावाखाली वर आणि वधू पक्षाकडून प्रत्येकी 4000 रुपये रक्कम घेण्यात आली. शिवाय लग्नाची तारीख काढण्यासाठी प्रत्येकी 3500 रुपये घेण्यात आले. या अशा प्रकारच्या आर्थिक शोषणालाही माझा आणि माझ्या होणाऱ्या पत्नीचा विरोध आहे. जात पंचायतीच्या व्यवस्थेलाच आम्हाला मूठमाती द्यायची आहे.

मी माझ्या होणाऱ्या पत्नीला ऐश्वर्याला विश्वासात घेऊन कौमार्य चाचणी करायची नाही, यावर तिची सहमती घेतली. तिने कौमार्य चाचणीविषयी घरच्यांशी संवाद साधला. पण त्यांची समाजाच्या विरोधात जायची तयारी नसल्याने मी आणि ऐश्वर्याने समविचारी लोकांना घेऊन लढा द्यायचं ठरवलंय.

मी जाहीरपणे आमच्या प्रथांच्या विरोधात फेसबुकवर लिहू लागलो, तसं अनेक जण मला पुढे येऊन साथ देऊ लागले. आता ही लढाई वैयक्तिक न राहता समविचारी लोकांची झाली आहे.

आमच्या समोरील आदर्श कंजारभाट समाजाचं प्रतिसंविधान नाही तर भारताचं संविधान आहे. आम्ही सर्वांनी मिळून 'Stop The V Ritual' हा व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू केलाय. त्यात 50हून अधिक तरुण जोडले गेले आहेत.आमच्या लढ्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाठिंबा दिलाय. हे बळ खूप मोलाचं आहे.

कंजारभाट समाजाच्या प्रथांविषयी प्रबोधन, समुपदेशन आम्ही करतोय. इतकंच नाही तर लैंगिक शिक्षणाविषयीही जागृती करतोय. पण आता या तरुणांच्या पालकांना बहिष्कृत करण्याची भाषा सुरू आहे; याची मला चिंता वाटतेय.

माझी चुलतबहीण प्रियंका तमाईचिकर हिला सतत धमक्या येत असतात. 'Stop The V Ritual' मधली ती धडाडीची कार्यकर्ती आहे. ज्या वस्तीत रविवारी प्रशांत इंद्रेकरला मारहाण झाली त्याच वस्तीत ती राहाते. आजही तिला धमक्या आल्या आहेत. पण ती या गोष्टींना भीक घालत नाही.

तिच्यावर तथाकथित पंचांनी आरोप लावले आहेत. तिचं चारित्र्यहनन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिच्या कुटुंबाला अप्रत्यक्षपणे वाळीत टाकण्यात आलंय. तिच्यासह आम्हीही या बहिष्काराविरोधात लढणार आहोत.

सध्या मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून मास्टर्स करतोय. त्याआधी कायद्याची पद्वी घेतली असल्यानेच मला जातीमधल्या प्रथेविरोधात लढण्याचं बळ मिळालं.

माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा लढा केवळ पंचांशी नाही तर त्यांच्या शोषक प्रवृत्तींशी आहे, बुरसटलेल्या मानसिकतेशी आहे. माझं मुख्य ध्येय हेच आहे की त्यांनी समोर यावं आणि या अमानुष जातीप्रथांना बंद करावं.

कंजारभाट समाजातल्या लोकांच्या मनावरचं जळमट दूर करायचंय. फक्त कायदा असून उपयोग नाही तर मानसिकता बदलायला हवी. मला नवा समाज घडवायचा आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)