हृषी वेड्स विन : यवतमाळमधल्या 'गे' लग्नाची गोष्ट
- Author, हृषिकेश साठवणे
- Role, बीबीसी मराठीसाठी
आयुषमान खुराणाचा 'शुभमंगल ज्यादा सावधान' हा गे लग्नावर चितारलेला सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. पण महाराष्ट्रात अशा प्रकारचं लग्न 2 वर्षांपूर्वीचं झालं आहे.
माझं नाव हृषिकेश साठवणे. मी 44 वर्षांचा आहे आणि मी अमेरिकेत एका टेक्नॉलॉजी कंपनीत काम करतो. लहानपणापासून मला ही जाणीव होती की मी इतरांपेक्षा वेगळा आहे.
वेगळा आहे म्हणजे नेमकं काय, हे मलाही कळत नव्हतं. कारण, माझ्या भावना समजून घेईल आणि मला समजावून सांगेल असं समोर कुणीही नव्हतं.
मीही दुर्लक्ष केलं आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. पुढे इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी IIT ला गेल्यावर मानसशास्त्राच्या एका तासाला समलैंगिकता हा प्रकार मला पहिल्यांदा समजला. पण, तरीही मी गे आहे, असं मला वाटलं नव्हतं.
अमेरिकेत पुढचं शिक्षण घेत असताना मी समलैंगिकांसाठीच्या मदत केंद्रात गेलो. तिथे मला पहिल्यांदा कळलं की मी गे आहे. 1997 मध्ये मी लगेचच माझ्या आई-वडिलांना स्वतःविषयी सांगितलं. तेव्हा मी 22 वर्षांचा होतो.
त्यांना ते स्वीकारणं अर्थातच कठीण होतं. त्यासाठी जवळजवळ त्यांना चार वर्षं लागली. आधी त्यांनी सत्य नाकारण्याचा प्रयत्न केला. मग त्यांना अपराधी आणि मग हतबल वाटलं. दु:ख, रडणं आणि बरंच काही घडलं.

फोटो स्रोत, Hrishi Sathavane
त्यांना वाटलं मी मुलीशी लग्न केलं तर सगळं सुरळीत होईल. मी मात्र नकार दिला. मला दुसऱ्या मुलीचं आयुष्य बरबाद करायचं नव्हतं. आई-वडिलांना माझी परिस्थिती समजावून सांगण्यात माझ्या बहिणीने मला मदत केली.
सुरुवातीच्या विरोधानंतर आई-बाबांनी माझं 'गे' असणं स्वीकारलं. नंतर तर ते दोघं अमेरिकेत आले होते. तेव्हा त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या 'गे परेड'मध्येही भाग घेतला. मला त्यांचा प्रचंड अभिमान वाटला.
लग्नाची गोष्ट
पुढे मला विन भेटला. गे डेटिंग साईटवर ऑक्टोबर 2016 मध्ये मी त्याच्याशी पहिल्यांदा बोललो. दोन दिवसांनंतर आम्ही एकत्र डिनर डेटवर गेलो. विनचा जन्म व्हिएतनाममध्ये झालाय. 1990 मध्ये तो 8 वर्षांचा असतानाच त्याचं कुटुंब अमेरिकेत रहायला आलं.

फोटो स्रोत, Hrishi Sathavane
आम्ही आणखी काही वेळा एकत्र फिरलो. डिसेंबर 2016 मध्ये आम्ही एकत्र ऑस्ट्रेलियाला गेलो. प्रत्येक वीकेंडला भेटत राहिलो. आणि आमच्यात प्रेमाचा बंध तयार झाला. अखेर एप्रिल 2017 मध्ये मी विनला लग्नासाठी प्रपोज केलं.
यवतमाळमध्येच लग्न
लग्न कसं झालं पाहिजे यावर मी ठाम होतो. ते माझ्या मूळ गावी यवतमाळमध्ये झालं पाहिजे असा माझा आग्रह होता. माझे कित्येक मित्र तिथे आहेत.
काही कुटुंबांशी आमची पिढ्यान् पिढ्यांची मैत्री आहे. माझ्या आयुष्यातला सर्वांत मोठा सोहळा मला त्यांच्या साक्षीने करायचा होता. त्यामुळे लग्न यवतमाळमध्येच व्हायला हवं होतं.
विनलाही कल्पना आवडली. तो प्रगत आणि स्पष्ट विचारांचा आहे. त्याच्याविषयी हीच गोष्ट मला आवडते. गे असण्याबद्दल त्याला वेगळं वाटत नाही आणि तो ही गोष्ट खुलेपणाने मान्य करतो.
माझ्या आईवडिलांना समजावणं मात्र कठीण गेलं. आमचं नातं त्यांनी स्वीकारलं. पण लग्न भारतात करायचं म्हटल्यावर - का? भारतात कशाला? यवतमाळमध्ये नको अशा प्रतिक्रिया उमटल्या.
शेवटी आई तयार झाली. तिने वडिलांनाही समजावलं. तरीही बाबा लग्नात त्रयस्थासारखेच वावरत होते.

फोटो स्रोत, Getty Images
मी लग्न माझ्या मनासारखं पार पडावं यासाठी प्रयत्न करत होतो. मी फेसबुकवर सक्रिय आहे आणि गे असल्याचं कधी लपवलंही नाही. त्यामुळे माझे मित्र, नातेवाईक यांना ते माहीत होतं. त्यांना ते कधी खटकलं नाही. अशा नातेवाईकांनाच आम्ही लग्नाला बोलावलं.
माझे आईवडील धास्तावलेलेच होते. कुणाला आमंत्रण द्यायचं म्हटलं, लग्नात काही करायचं म्हटलं की पहिला त्यांचा नकार ठरलेला. मग कशीबशी त्यांची समजूत काढायचो.
शिवाय आणखीही काही समस्या होत्या. आम्हाला वेडिंग डान्स हवा होता. त्यासाठी डान्स क्लास लावला. त्यांनी दोन हिरो असलेली बॉलिवुड गाणी सुचवली. अर्थातच ती गाणी रोमँटिक नव्हती.
जेव्हा मी त्यांना सांगितलं, गाणं रोमँटिक हवं तेव्हा त्यांचा प्रश्न होता - मुलगी कुठे आहे? मी निक्षून सांगितलं, गाणं माझ्यासाठी आणि विनसाठी हवं आहे आणि ते रोमँटिकच हवं. त्यांच्या चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह होतं. पण शेवटी त्यांना समजलं.

फोटो स्रोत, Hrishi Sathavane
बाकी सगळं सुरळीत झालं. गे कार्यकर्त्यांना विचारून लग्न समारंभ करता येईल ना, याची मी खात्री करून घेतली. आम्ही लग्न नाही तर कमिटमेंट समारंभ करत होतो. तो कायद्यात बसत होता. त्यामुळे पोलिसांचा त्रास नव्हता. लोकांचा विरोध नको म्हणून मी हॉटेल व्यवस्थापकांना हॉलबाहेर सुरक्षारक्षक नेमायला सांगितले. पण सुदैवाने त्याची गरज पडली नाही.
विनला हा पारंपरिक कार्यक्रम खूप आवडला. लोकांशी तो इंग्रजीत संवाद साधत होता. आम्ही दोघांनी एकत्र केलेला डान्सही त्याला आवडला. अर्थात ते त्याच्या सवयीचं नव्हतं. लग्नाचे पारंपरिक विधी पार पाडताना तो थोडासा कंटाळला होता. पण माझ्यासाठी त्याने ते सहन केलं.
असं लग्न हे माझं स्वप्न होतं, हे त्याला ठाऊक होतं. तो मला एकच प्रश्न विचारत होता - हा फेटा मी कधी काढू शकेन? त्याचं वजन त्याला सहन होत नव्हतं!
लग्न झालं, पुढे काय?
विन आणि माझे संबंध काही महिन्यांचे आहेत. लग्नानंतर हनिमूनची वेगळी गरज आम्हाला वाटली नाही. आता आम्ही अमेरिकेत परतलो आहोत.
आम्ही इथे लवकरच कायदेशीर लग्न करणार आहोत. हळूहळू मुलं दत्तक घेऊन कुटुंब वाढवायचं, असं आम्ही ठरवलं आहे. आम्हाला बायोलॉजिकल मुलं नको आहेत. त्यामुळे दत्तक घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

फोटो स्रोत, Hrishi Sathavane
त्यासाठी आम्ही पालकत्वाच्या क्लासलाही जात आहोत.
भारतात गे नातेसंबंध हा विषय अजूनही उघडपणे बोलला जात नाही. पण तुम्हाला जर चांगला जोडीदार मिळाला आणि दोघंही नात्याबद्दल गंभीर असतील, तर हे नातंही दीर्घकाळ टिकतं.
गे जोडप्यांना समाजाचा रोष सहन करावा लागतो हे खरं आहे. पण त्यातून तुम्ही एकमेकांच्या जास्त जवळ येता असं मला वाटतं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)










