You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजेश खन्ना : जेव्हा सुपरस्टार 'काका'ला लोक रक्ताने पत्र लिहायचे...
1969 ते 1976 या काळात ते हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या राजेश खन्ना यांचा आज (29 डिसेंबर) जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा.
राजेश खन्ना यांना लोक प्रेमानं काका म्हणायचे. 1960 आणि 1970च्या दशकात रोमान्सला एक नवी ओळख देणारे राजेश खन्ना होते.
राजेश खन्नांना हिंदी सिनेमात सगळ्यांत पहिल्यांदा सुपरस्टारचा किताब मिळाला. हिंदी सिनेसृष्टीत जेव्हा दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर या तीन लोकांचा दबदबा होता तेव्हा राजेश खन्ना एका टॅलेंट हंट स्पर्धा जिंकून चित्रपटसृष्टीत आले होते.
ही स्पर्धा युनायटेड फिल्म प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आली होती. अशा प्रकारे अमृतसरमध्ये जन्माला आलेले जतीन खन्ना चित्रपटनगरीत आले आणि राजेश खन्ना या नावाने ओळखले जाऊ लागले.
कौंटुबिक पार्श्वभूमी
राजेश खन्ना यांचा विवाह मार्च 1973 साली डिंपल कपाडिया यांच्याशी झाला. डिंपल यांचा पहिला चित्रपट 'बॉबी' रिलीज होण्याच्या सहा महिन्यांआधी त्यांचा विवाह झाला.
कालांतराने ते वेगळे झाले, पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही. राजेश खन्ना यांच्या शेवटच्या आजारपणात डिंपल यांनी त्यांची खूप काळजी घेतली होती.
राजेश खन्ना आणि डिंपल यांच्या रिंकू आणि ट्विंकल बॉलिवूडमध्ये आहेत. ट्विंकल खन्ना आणि त्यांचे पती सुपरस्टार अक्षय कुमार यांचं राजेश खन्ना यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.
यशाची चढती कमान
राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीत ते कायम वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसले पण 1969 ते 1976 या काळात ते हिंदी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार होते. त्यांचं चालणं, बोलणं, त्यांचा पोशाख यावर लोक प्रचंड फिदा होते.
राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीची सुरुवात 'आखिरी खत', 'बहारों के सपने' आणि 'राज' अशा चित्रपटांनी झाली. पण 1969 साली आलेल्या 'आराधना' चित्रपटानं त्यांना रातोरात स्टार बनवलं.
त्यानंतर आलेल्या 'खामोशी' मध्ये त्यांच्या अभिनयाची प्रचंड स्तुती झाली आणि चित्रपट समीक्षक त्यांना सुपरस्टार म्हणू लागले.
राजेश खन्ना यांनी 1969 ते 1972 या काळात लागोपाठ 15 हिट चित्रपट दिले. काही जाणकार सांगतात की, हा विक्रम अजूनही अबाधित आहे.
'कटी पतंग', 'अमर प्रेम' 'अपना देश', 'आपकी कसम', 'नमक हराम', 'फिर वही रात', 'अगर तुम ना होते', 'आवाज', 'प्रेम नगर', 'अवतार', 'आनंद', 'हम दोनों' अशा चित्रपटांनी आजही चित्रपट रसिकांना मोहिनी घातली आहे.
मुमताज यांच्याबरोबर त्यांची जोडी हिट झाली होती. दोघांनी आठ चित्रपट एकत्र केले आणि सर्व चित्रपट गोल्डन ज्युबिलीपर्यंत गेले. पण शर्मिला टागोर, आशा पारेख, झीनत अमान या अभिनेत्रींबरोबरचे त्यांचे चित्रपटसुद्धा गाजले होते.
चित्रपटापासून ते राजकारणापर्यंत
पण 1976 नंतर त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटू लागले. अमिताभ बच्चन यांच्या 'अँग्री यंग मॅन'च्या उदयाचा हाच काळ! चित्रपटसृष्टीवर अमिताभ बच्चन नावाचं गारूड पडलं आणि राजेश खन्ना त्या झंझावातात मागे पडले.
देशभरात सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतरं होत होती. तरुणांना 'मैं आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता' म्हणणारा अमिताभ जास्त आपलासा वाटत होता. पण त्या आधीचं दशक निर्विवादपणे राजेश खन्ना आणि त्यांच्या चित्रपटांनी गाजवलं.
1980 च्या दशकात राजेश खन्ना यांचे अनेक चित्रपट आले. टीना मुनीम यांच्याबरोबर 'फिफ्टी फिक्टी', 'सौतन', 'आखिर क्यों', 'बेवफाई'. 'अधिकार', यासारखे अनेक हिट चित्रपट दिले.
पण 1990 च्या दशकात मात्र राजेश खन्ना यांनी चित्रपटसृष्टीला रामराम केला आणि राजकारणात प्रवेश केला. ते काँग्रेसच्या तिकीटावर 1991 साली दिल्ली मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पण काँग्रेससाठी मात्र ते आधीपासून प्रचार करायचे.
2000 साली मात्र ते चित्रपटांतून ते पूर्णपणे गायब झाले. त्यादरम्यान एखाद दुसरे चित्रपट केले. त्याशिवाय टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते.
शेवटचा चित्रपट
राजेश खन्ना यांचा 'रियासत' हा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2014 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा 'गॉडफादर' चित्रपटानं प्रेरित होती.
शुटिंगच्या वेळी राजेश खन्ना यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा देताना चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक त्यागी सांगतात, "त्यांना खूप मद्यपान करण्याची सवय होती. पण शुटिंगदरम्यान ते दारूला ते स्पर्शदेखील करत नसत. पण वेळ मिळाला की लगेच दारू प्यायला सुरुवात करत. याच कारणामुळे ते आपल्यातून दूर गेले."
राजेश खन्ना आजारी पडण्याआधी या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं. त्या चित्रपटात ते अत्यंत देखणे दिसत असल्याचंही राजेश त्यागी यांनी सांगितलं.
उतरती कळा लागण्याची कारणं
राजेश खन्ना यांच्या यशाचा आलेख उत्तुंग होताच पण त्यांचं अध:पतनसु्द्धा आश्चर्यकारक होतं.
ज्या सुपरस्टारची झलक बघण्यासाठी लोक रांगेत उभे असायचे, त्यांच्या कारवर लोक लिपस्टिकच्या खुणा करायचे, त्यांच्या कारकिर्दीचा शेवट दुर्देवी झाला.
राजेश खन्ना यांच्याबरोबर सुरुवातीला काम केलेल्या वहिदा रहमान सांगतात, "जेव्हा कोणी शिखरावर पोहोचतो त्यांना एक दिवस खाली यावंच लागतं. हे अत्यंत स्वाभाविक आहे."
राजेश खन्ना यांचं अध:पतन इतक्या वेगाने कसं झालं या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, " ते आपलं स्टारडम सांभाळू शकले नाही. जसं वय वाढतं त्याप्रमाणे बदलायला हवं. आता आपला आधीचा काळ राहिला नाही याचा स्वीकार करायला हवा. हे लक्षात घेऊन जर त्यांनी चित्रपटाची निवड केली असती, तर त्यांच्यावर ही वेळ ओढवली नसती. पण त्यांनी असं केलं नाही आणि आपल्या आधीच्या दिवसांत ते रममाण राहिले."
राजेश खन्ना यांच्याबरोबर तब्बल नऊ चित्रपटांत काम केलेले रजा मुरादसुद्धा असंच काहीसं मत मांडतात, "राजेश खन्ना अतिशय दिलदार होते. त्यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत मैफिली जमत म्हणून ते शुटिंगला उशीरानं पोहोचत असत. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांच्या अडचणींत वाढ झाली. रात्री उशीरापर्यंत जागरण आणि बेशिस्त जीवनशैली याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. त्यांचा चेहरा निस्तेज दिसू लागला आणि त्यानंतर त्यांच्या अपयशाचा सिलसिला सुरू झाला."
चित्रपट समीक्षक नम्रता जोशी सांगतात की कालानुरूप होणाऱ्या बदलांशी ते जुळवून घेऊ शकले नाही.
"प्रत्येक कलाकाराची एक वेळ असते पण काळ बदलत राहतो. राजेश खन्ना आपल्या जुन्या दिवसातच मश्गूल होते. 70 च्या दशकांत अमिताभ बच्चन यांचा उदय झाला होता. लोक रोमँटिक चित्रपटांना कंटाळले होते. तसंच राजेश खन्ना यांचे चिरपरिचित भाव बघूनसुद्धा लोकांना कंटाळा आला होता."
असं असलं तरी राजेश खन्ना यांचं स्टारडम निर्विवाद होतं. लोक त्यांना रक्ताने पत्रं लिहायचे. इतकं वलय कमावणारा अभिनेता तसा दुर्मिळच.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)