स्पर्धा परीक्षेची तयारीच्या वेळी मानसिक अस्वस्थता वाढते का?

    • Author, भूमिका राय
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागण्याअगोदर अभिषेकचं जीवन खूप आनंदी होतं. कोणत्याही गोष्टीची चिंता नव्हती. पण परीक्षेच्या तयारी दरम्यान त्याला सतत टेन्शन यायचं. त्याला चिंतेनं ग्रासलं. या गोष्टी anxiety disorder म्हणजे अस्वस्थ मानसिकतेची लक्षणं आहेत.

"पहिल्या प्रयत्नात मी पूर्व परीक्षा पास झालो तेव्हा काही तणाव नव्हता. पुढे मुख्य परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. मी परीक्षेत पास होईन की नाही याची चिंता वाढत गेली," असं अभिषेक सांगतात. त्यांनी तीन वर्षं स्पर्धा परीक्षेची तयारी केली पण निवड न झाल्यानं आता ते दिल्लीमध्ये कोचिंग क्लास चालवत आहेत.

तीन वर्षं परीक्षेची तयारी करत असताना अभिषेक यांनी दोन वेळा स्वत:ला संपवण्याचा विचार केला होता. हे असं घडत असताना त्यांना काही सुचत नव्हतं.

'मनात सतत भीती वाढत राहते'

"परीक्षेची तयारी करताना एका मुलीशी मैत्री झाली. पण माझी परीक्षेची तयारी आणि ही मैत्री खूप दिवस एकत्र चालू शकली नाही. सुरुवातीला एकदम व्यवस्थित चाललं होतं. दरम्यान, परिस्थिती बिघडत गेली. मैत्रिणीच्या घरून लग्नासाठी दबाव वाढत गेला. तिची समजूत घालताना माझ्याही मनावर त्याचा परिणाम होत गेला," असं अभिषेक सांगतात.

"तिनं एकच तगादा लावला होता, यावेळेस तुझी निवड झाली नाही तर दुसऱ्या परीक्षेचेही फॉर्म भर. अभ्यास करणारे सर्वच IAS होत नाहीत. सतत तिच्या अशा बोलण्यामुळं माझ्या मनात भीती वाढत गेली. आत्मविश्वास ढासळत गेला," असं असं ते म्हणाले.

विशाल यांच्या (नाव बदललं आहे) बाबतही असंच घडलं आहे. त्यांनी कॉलेज संपल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना एक गर्लफ्रेंड होती. ती डिझाइनिंगचा कोर्स करत होती.

ते सांगतात, "परीक्षेची तयारी करण्यासाठी मी प्रतापगढहून (राजस्थान) दिल्लीला आलो. आणि माझ्या गर्लफ्रेंडनं तिथंच राहायचं ठरवलं. तिचा क्लास सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत असायचा आणि माझ्या अभ्यासाची वेळ वेगळी असायची. मी रात्रभर अभ्यास करून दिवसा झोपायचो. त्यामुळं आमचं बोलणं कमी होत गेलं आणि भांडणं वाढत गेली."

"त्यानंतर मी इतका तणावात राहू लागलो की, पुढे काही दिवस अभ्यासच करू शकलो नाही. रुममध्ये एकटाच राहायचो. खूप दिवस अंघोळही केली नाही. परीक्षेत पास नाही झालो तर घरी काय सांगू? या एकाच विचारानं मनाच्या कोपऱ्यात भीती दाटून यायची. दिवसभर मोबाईलवर प्रेरणादायी विचार वाचायचो, पण फारसा फायदा व्हायाचा नाही," असं विशाल यांनी सांगितलं.

विशाल सांगतात, "स्वत:ची लाज वाटू लागली. घरच्या लोकांशी बोलणं कमी होत गेलं. शेवटी एक दिवस गर्लफ्रेंडशी ब्रेक-अप करून टाकलं. अजून परीक्षेची तयारी सुरूच आहे. खूप वेळा एकाकी वाटतं. डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतं पण हे आता फक्त अभ्यासाच्या तणावामुळं होत असावं. सध्याकाळी क्लासला गेल्यावर मित्रांबरोबर आवर्जून गप्पा मारतो."

मानसिक अस्वस्थता वाढते का?

नाव न सांगण्याच्या अटीवर स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं की, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा क्वचितच असेल जो अस्वस्थ मानसिकतेचा शिकार झाला नसेल.

"तुमच्या आजूबाजूला इतकी स्पर्धा असते की, तुम्ही शांत राहावंसं वाटूनसुद्धा राहू शकत नाही. अभ्यासात मागे पडण्याची भीती वाटत राहते. कोणत्याही कार्यक्रमाला जाता येत नाही. या सगळ्या गोष्टी सतावत राहतात," असं त्यांनी सांगितलं.

दर सहावी व्यक्ती अस्वस्थ

मानसोपचारतज्ञ डॉ. प्रवीण त्रिपाठी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मानसिक अस्वस्थता हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. दर सहावी व्यक्ती या आजाराला बळी पडते. याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि विविध पातळ्या असतात. एखाद्या गोष्टीची खूप भीती वाटणं (Phobia) हा प्रकार नेहमीचा आहे."

यामध्ये सद्य परिस्थितीची किंवा भविष्यकाळातल्या एखाद्या गोष्टीची खूप भीती वाटत राहते. या आजारानं ग्रासलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात असा प्रकार या अगोदर कधीही घडलेला नसतो.

नक्की काय होत असतं?

डॉ. त्रिपाठी याच्या मते, "वास्तवात हा प्रकार एवढा भयानक नसतो पण ती व्यक्ती तसा विचार करू लागते. अशा समस्येनं ग्रासलेल्या व्यक्तीच्या हालचालींवरून हे लक्षात येऊ शकतं."

त्यांच्या मते, "अशी व्यक्ती लोकांत मिसळायला कचरते, एकटं राहायला घाबरते, घाम फुटत राहतो, चेहरा लाल होतो, अंग थरथरायला लागतं, सारखं वॉशरुमला जावं लागते. असं घडत असेल तर ती व्यक्ती कदाचित या समस्येनं ग्रासलेली असावी."

तसं पाहिलं तर मनाची अस्वस्थता ही सरसकट चिंतेची गोष्ट नाही. थोडी फार मनाची अस्वस्थता ही फायद्याची असते पण हा प्रकास सतत होत असेल तर याकडं गाभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे.

समजा परीक्षेच्या अगोदर तुमच्या मनाची अस्वस्थता वाढल्यानं अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू लागलात तर ही चांगली गोष्ट आहे. पण, मनाच्या अस्वस्थतेमुळं तुमचा अभ्यास होत नसेल तर ही समस्या होऊन बसते, असं तज्ज्ञ सांगतात.

डॉक्टरांच्या मते, असे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून अस्वस्थ होत असतात. नळाला पाणी नाही आलं, बस वेळेवर नाही आली यावरून चिडचिड होत असेल तर ही मानसिक अस्वस्थता आहे.

याचा उपचार कसा करायचा?

या समस्येच्या तीन पातळया आहेत. Mild, Middle, Severe. कोणत्याही मानसिक अस्वस्थतेचा उपचार दोन प्रकारे केला जातो. एक, फार्मियोथेरपी म्हणजे औषोधपोचार आणि दुसरं काऊन्सेलिंग. तसेच औषोधपोचार आणि काऊन्सेलिंग एकत्र केलं तर लवकर उपचार होऊ शकतो.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

हे वाचलं का?