'कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की आम्ही तुमचा लेख प्रसिद्ध करू शकत नाही!'

फोटो स्रोत, ASIF SAUD
- Author, गीता पांडेय
- Role, बीबीसी हिंदीसाठी
लहानपणापासून त्यांना पत्रकार व्हायचं होतं. त्या खटाटोपात त्यांनी स्वतःचं सत्यनारायण हे मूळ नाव बदलून 'रिग्रेट अय्यर' असं करून घेतलं. रिग्रेट म्हणजे पश्चात्ताप, खेद किंवा दिलगिरी. पण त्यांनी असं का केलं? आणि या नामांतराचा त्यांना कधी पश्चात्ताप झाला का?
बेंगळुरूला राहणारे 67 वर्षांचे रिग्रेट अय्यर हे स्वत:ची ओळख लेखक, प्रकाशक, छायाचित्रकार, पत्रकार, व्यंगचित्रकार अशी करून देतात.
लिखाणाची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. सत्तरीच्या दशकात कॉलेजमध्ये असताना 'मी कोण आहे?' या तरुण मुलांना भेडसवाणाऱ्या प्रश्नावर त्यांनी एक लेख लिहिला होता.
कॉलेजच्या मासिकात तो लेख प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्यांना शाबासकी दिली होती.
पुढं त्यांनी वर्तमानपत्रं आणि मासिकांच्या संपादकांना पत्रं लिहायला सुरुवात केली. त्यापैकी बहुतेक पत्रं छापूनही आली, असं त्यांचं म्हणणं आहे. सध्याच्या ऑनलाईनच्या जगात अशा पत्रांची जागा ई-मेल आणि ऑनलाइन कमेंट्सनी घेतली आहे.
अय्यर मग महत्त्वाकांक्षी झाले आणि बिजापूर शहराच्या इतिहासावर त्यांनी एक लेख लिहिला. त्यांनी तो प्रसिद्ध कन्नड वर्तमानपत्र 'जनवाणी'ला पाठवला.

फोटो स्रोत, ASIF SAUD
काही दिवसानंतर त्यांना जनवाणीच्या संपादकांनी एक पत्र पाठवलं. संपादकांनी आधी आभारानं पत्राची सुरुवात करत "तुमचा लेख प्रसिद्ध करू शकलो नाही" म्हणून दिलगिरी व्यक्त केली.
"मला वाईट वाटलं, पण मी हार मानली नाही," अय्यर म्हणतात.
पुढं काही वर्षं त्यांनी कन्नड आणि इंग्रजी वर्तमानपत्रांना अनेकानेक लेख, पत्रं, कार्टून, फोटो आणि कविताही पाठवणं सुरूच ठेवलं.
मंदिरांविषयी माहिती, प्रेक्षणीय स्थळं अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी लिहिलं. कधीकधी लोकांच्या तक्रारी, ढिसाळ लोकल बस सेवा, रस्त्यांवरील कचऱ्याविषयीच्या तक्रारीही त्यांनी या पत्रातून दिल्या.
एका वरिष्ठ पत्रकारानं सांगितलं की सत्तर आणि ऐंशीच्या दशकात अय्यर यांनी अशी पत्रं पाठवून संपादकांना सळो की पळो करून सोडलं होतं.
काही प्रमाणात त्यांचं लिखाण वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धही झालं. पण बहुतेकवेळा त्यांच्या पदरी 'साभार परत' हा शिक्काच यायचा.
अशा प्रकारचा साभार परतीचा शिक्का असलेली तब्बल 375 पत्रं त्यांच्या घरी जमा झाली. यामध्ये फक्त राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पत्रांचाही समावेश आहे.

फोटो स्रोत, ASIF SAUD
"माझ्या घरी 'क्षमस्व', 'साभार परत' अशा पत्रांचा अक्षरश: पाऊस पडला," ते सांगतात.
"मला समजत नव्हतं की माझं लिखाण का नाकारलं जात आहे. माझ्या लिखाणात काय त्रुटी आहेत, यावर विचार करायला सुरुवात केली. मात्र एकाही संपादकानं माझ्यासारख्या लेखकाला किंवा छायाचित्रकाराला मजकुरात काय उणिवा आहेत याविषयी कधीही सांगितलं नाही.
ढिसाळ लिखाणामुळे अय्यर यांचं लिखाण नाकारण्यात यायचं, असं ज्येष्ठ पत्रकार नागेश हेगडे यांनी सांगितलं. असं म्हणतात की त्यांनीच सत्यनारायण अय्यर यांना 'रिग्रेट अय्यर' हे टोपणनाव दिलं.
"ते बातम्या काढण्यात माहीर होते. पण कष्टानं मिळवलेली बातमी त्यांना व्यवस्थित मांडता येत नव्हती," असं हेगडे यांनी सांगितलं.
कन्नड भाषेतील 'प्रजावाणी' या अग्रगण्य वृत्तपत्रात हेगडे स्तंभलेखन करायचे. त्यावेळी अय्यर यांचं लिखाण साभार परत पाठवण्याची वेळ हेगडे यांच्यावर यायची.
हेगडे सांगतात, "अय्यर यांनी पिच्छा पुरवू नये म्हणून त्यांचा एखादा लेख मी छापायचो."
सतत मिळणाऱ्या नकारांना कंटाळून 1980 मध्ये अय्यर यांनी एकेदिवशी प्रजावाणीचं ऑफिस गाठलं. आतापर्यंत नाकारलेल्या लेखांचा त्यांनी पाढाच वाचला.
"मी त्यांना 'याचा पुरावा काय? असं विचारल्यावर दुसऱ्या दिवशी अय्यर साभार परत पत्रांच्या चळतीसह परतले.
हेगडे यांनी पुढचा लेख "रिग्रेट अय्यर" याच नावानं लिहिला.

फोटो स्रोत, ASIF SAUD
"एखाद्यानं ओशाळून ही पत्रं लपवून ठेवली असती, पण हे तर अभिमानानं सांगत होते." महत्त्वाकांक्षी अय्यरांनी याच गोष्टीचा फायदा घेत संधीचं सोनं केलं.
"संपादकांनी मला वेगवेगळी नावं सुचवली पण त्यापैकी 'रिग्रेट अय्यर' हे टोपणनाव वापरण्याचं मी पक्कं केलं. त्याचवेळी मला लेखणी तलवारीपेक्षा धारदार असते हे समजलं" असं ते सांगतात. दिवाणी न्यायालयात जाऊन त्यांनी नावही बदललं.
मी माझ्या पासपोर्ट, बँक खातं, लग्नपत्रिकेतही माझ्या नावात बदल करून घेतला.
सुरुवातीला सगळेजण मला हसायचे. हा माणूस वेडा झाला आहे, असं म्हणायचे. पण माझ्या वडिलांनी मला साथ दिली म्हणून मी स्वत:ला खूप नशिबवान मानतो. "तरुण असताना वडिलांनीच सांभाळ केला. राहणीमान साधं होतं. पुढं त्यांनीच माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला."

फोटो स्रोत, ASIF SAUD
दरम्यान हळूहूळ अय्यर यांचं आयुष्य पालटलं. त्यांची बहुतेक पत्रं, फोटो प्रकाशित होऊ लागले. कर्नाटकमधील इंग्रजी आणि कन्नड वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध होत राहिले.
"मी एकटाच कॅमेरा, पेन, स्कूटर, हेल्मेट आणि 'रिग्रेट अय्यर' लिहिलेला टी-शर्ट घालून फिरायचो." आता, त्यांची पत्नी आणि दोन मुलंही त्यांच्या नावात 'रिग्रेट अय्यर' असं लिहितात.
हेगडे यांच्या मते, रिग्रेट अय्यर यांना कर्नाटकचे नव्हे तर संपूर्ण देशातले पहिलेवहिले 'सिटीझन जर्नलिस्ट' म्हणता येईल.
"आमच्यासाठी ते म्हणजे एक प्रकारचा उपद्रव होता, पण वाचकांना त्यांचं लिखाण भरपूर आवडायचं. वर्तमानपत्रं किंवा मासिकामध्ये वाचक सगळ्यात आधी मजेशीर गोष्टी शोधतात. त्यांचं लिखाण असंच होतं. विशेष म्हणजे अय्यर चिकाटीनं काम करतात," असं हेगडे पुढं सांगतात.
सामान्य पत्रकार एखाद्या ठिकाणी जाऊन बातमी करून ऑफिसला परतात. पण अय्यर मात्र बातमीचा पूर्ण छडा लागेपर्यंत त्याच ठिकाणी तळ ठोकून असत. एवढंच नव्हे तर कचऱ्याच्या डब्यामागे लपून विशेष बातमी मिळवण्याचा प्रयत्न करायचे. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाचा धसकाच घेतला होता.

फोटो स्रोत, ASIF SAUD
"ते सदैव त्यांच्या बरोबर एक कॅमेरा ठेवत. तोतया भिकारी, रस्त्यावर पडलेली झाडे, पोलिसांची दादागिरी, पाणी गळती आणि कचऱ्याच्या ढिगाचे फोटो आपल्या कॅमेरात टिपायचे."
एवढ सगळं अपयश आलं तरी त्यांनी हार मानली नाही. कारण अपयशाशी त्यांचं घनिष्ठ नातं होतं. त्यांच्यासाठी अपयश हीच यशाची पहिली पायरी ठरली.
साभार परत या शिक्क्यासह साहित्य परत आलेल्या लेखक-कवींचं आंतरराष्ट्रीय मंडळ स्थापन करण्याचा अय्यर यांनी प्रयत्न केला. पण कुणीही प्रतिसाद दिला नाही. कारण अपयश कुणालाच नको असतं, असं ते म्हणाले.
नाव बदलण्याच्या निर्णयाचा पश्चाताप होतो का? असं विचारल्यावर अय्यर ठामपणे नाही सांगतात.
''साभार परत ही संकल्पनाच काही दिवसात नामशेष होईल. आताच्या डिजिटल जगात दिलगिरी अर्थात साभार परतीचं पत्र काय असतं? असं काहीजण मला विचारतात. एखाद्या दिवशी इंटरनेट सेवा विस्कळीत झाली तरीही ही साभार परतीची अर्थात दिलगिरीची पत्रं माझ्या कपाटात सुरक्षित असतील'', असं रिग्रेट अय्यर समाधानानं सांगतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








