न्या. लोयांच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण?

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CBIच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रजगोपाळ हरिकिशन लोया यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

लोया यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं द कॅराव्हॅन या मासिकानं त्यांच्या लेखात म्हटलं होतं. लोया यांच्या कुटुंबीयांशी बोलून ही बातमी प्रकाशित करण्यात आली होती.

हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर माजी न्यायाधीश, वकील तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सोमवारी इंडियन एक्स्प्रेसनं द कॅराव्हॅनमध्ये प्रसिद्ध लेखातील मुद्दे कागदपत्रांनिशी खोडून काढले आहेत.

लोया यांचा मृत्यू नागपूर शहरात 1 डिसेंबर 2014ला झाला होता. एका सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी न्यायाधीश लोया नागपूरला रवाना झाले होते. ते लग्नसोहळ्यात सहभागी झाले. त्याचदिवशी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

द कॅराव्हॅननं दिलेल्या वृत्तानुसार, न्यायाधीश लोया यांना रिक्षातून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त हृदयविकाराचा झटका आलेल्या लोया यांची ECG चाचणी का करण्यात आली नाही? असा प्रश्न लोया यांच्या बहिणीनं उपस्थित केला होता.

इंडियन एक्स्प्रेसनं ECG अहवाल प्रसिद्ध केला आहे. लोया यांना दांडे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दांडे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी न्यायाधीश लोया यांची ECG चाचणी झाल्याचं स्पष्ट केलं.

मात्र त्याचवेळी द कॅराव्हॅनचे राजकीय संपादक हरतोष सिंह बादल यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. 'इंडियन एक्स्प्रेसनं छापलेल्या ECG अहवालावर 30 नोव्हेंबर अशी तारीख आहे. न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधीची ही तारीख आहे', असे बादल यांनी सांगितलं.

इंडियन एक्स्प्रेसनं द कॅराव्हॅननं मांडलेल्या तथ्यांचं खंडन केलं आहे. एक्स्प्रेसनं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई आणि सुनील शुक्रे यांच्याशी बातचीत केली. या दोघांच्या मते न्यायाधीश लोया यांचा रुग्णालयात मृत्यू झाला तेव्हा ते उपस्थित होते.

लोया यांचा मृत्यू संशयास्पद नसल्याचं या दोन न्यायाधीशांचं म्हणणं आहे. न्यायाधीश लोया यांना रिक्षातून रुग्णालयात नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. न्यायाधीश बरडे यांनी स्वत:च्या गाडीतून लोया यांना रुग्णालयात दाखल केलं. कॅराव्हॅननं दिलेल्या वृत्तानुसार लोया यांना रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आल्याचं म्हटलं होतं.

लातूर बार असोसिएशनचा मोर्चा

लातूर शहरातील बार असोसिएशननं लोया यांच्या मृत्यू प्रकरणात न्यायालयीन आयोगाची स्थापना करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून सगळं प्रकरण समोर येऊ शकेल.

सोमवार 27 नोव्हेंबरला लातूर जिल्हा न्यायालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून लातूर बार असोसिएशननं आपलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.

चौकशीची मागणी

लातूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी बीबीसीशी बातचीत करताना सांगितलं की, CBI न्यायाधीशांच्या मृत्यूप्रकरणात मुंबई उच्च न्यायालय आणि भारताच्या मुख्य न्यायाधीशांना एक पत्र पाठवलं जाईल. त्या पत्रात उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी आयोग स्थापना करण्याची मागणी केली जाईल.

अण्णाराव सांगतात, "या मृत्यूची चौकशी व्हायला हवी कारण न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेला धोका आहे."

'द कॅराव्हॅन' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मृतकाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, त्यानंतर काही अशा घटना घडल्या की त्यांना या मृत्यूत काहीतरी काळंबेरं असल्याची शंका आली. मात्र भीतीपोटी मौन बाळगल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.

न्या.लोया सतत दबावाखाली होते

जेव्हा बीबीसीनं न्या. लोया यांचे वर्गमित्र असलेले बार असोसिएशनचे सदस्य अॅड. उदय गवारे यांना आतापर्यंत गप्प राहण्याचं कारण विचारल्यावर त्यांनी "यावर शंका होती कारण लोया एनकाऊंटर प्रकरणाची सुनावणी करत होते, तेव्हापासून ते दबावाखाली होते."

गवारे सांगतात, "त्यांच्या अंतिम संस्काराला आम्ही गेलो होतो. तिथे चर्चा होती की हा मृत्यू नैसर्गिक नाही. काहीतरी गडबड नक्की आहे. त्यांचे कुटुंबीय दबावाखाली होते आणि ते काही बोलत नव्हते. मासिकानं दिलेल्या बातमीवर जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे संशय निर्माण होणं स्वाभाविक होतं. तीन वर्षानंतर या प्रकरणावर चर्चा का करू नये?"

लातूर हे लोयांचं मूळगाव होतं. ते मुंबईत राहत होते. पण, लातूरला त्यांच येणंजाणं होतं.

गवारे सांगतात की 2014 मध्ये लोया दिवाळीत त्यांच्या घरी आले होते. "नेहमी हसतमुख असणार लोया तेव्हा थोडे तणावात होते. संवेदनशील खटल्याची सुनावणी करत आहे म्हणून फोन करू नका असं त्यांनी सांगितलं होतं."

सोहराबुद्दीन शेख एनकाऊंटर प्रकरणात सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची 2014 साली बदली करण्यात आली. त्यांच्या जागी लोया यांना न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.

गवारे यांना लोया यांनी सांगितलं होतं की, एनकाऊंटर प्रकरणात एक मोठं आरोपपत्र त्यांच्याकडे आलं आहे. त्या आरोपपत्रात त्यांना लक्ष घालायचं आहे.

अण्णाराव आणि गवारे दोघंही सांगतात की, न्या. लोया एक अतिशय प्रामाणिक आणि सक्षम व्यक्ती होते. त्यांच्या मृत्यूचा घटनाक्रम संशयास्पद आहे म्हणून चौकशी होणं गरजेचं आहे.

तुम्ही हे पाहिलं का ?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)