प्रेस रिव्ह्यू : उघड्यावर लघुशंकेला गेल्यामुळं जल संवर्धन मंत्री राम शिंदेंवर टीका

महाराष्ट्राचे जल संवर्धन मंत्री राम शिंदे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. रस्त्याच्या कडेला लघुशंका करत असल्याचा त्यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोलापूर-बार्शी या मार्गावरून गाडीने जात असताना ते लघुशंकेसाठी थांबले होते. आपली प्रकृती ठीक नसल्यामुळं लघुशंकेसाठी थांबावं लागलं असं त्यांनी पीटीआयला सांगितलं.

"जलयुक्त शिवाराच्या कामासाठी मी गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे माझी प्रकृती ठीक नव्हती," असं ते वृत्तसंस्थेला म्हणाले.

"सततच्या प्रवासामुळं मला तापही आला होता. त्यामुळं मला नाइलाजानं रस्त्याच्या कडेला जावं लागलं," असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

'पद्मावती' दीपिकाचा शिरच्छेद करणाऱ्याला हा भाजप नेता देणार 10 कोटी!

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने अभिनेक्षी दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. कारण त्यांच्या येऊ घातलेल्या 'पद्मावती' सिनेमाने या नेत्याच्या "भावना दुखावल्या आहेत".

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार हरियाणातले भाजप नेते सूरज पाल अमू यांनी जाहीर केलं आहे, "दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटींचं बक्षीस देऊ."

चित्रीकरणादरम्यान आधीच हिंसेचं गालबोट लागलेल्या या सिनेमाची रिलीज तारीख निर्मात्यांनी पुढं ढकलली आहे.

काही ठराविक माध्यमांनाच्या प्रतिनिधींना भंसाळी यांनी हा चित्रपट आधीच दाखवल्यामुळे सेंसर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी भंसाळी यांच्यावर टीका केली.

गुजरात निवडणूक: काँग्रेसची पहिली यादी जाहीर

गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपली पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं 77 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत, असं वृत्त NDTVनं दिलं आहे.

काँग्रेसनं जाहीर केलेल्या या यादीमध्ये 19 पाटीदार समाजाच्या उमेदवारांचा समावेश आहे. त्यापैकी दोन जण हे हार्दिक पटेल यांचे निकटवर्तीय आहेत.

"ही निवड आम्हाला न विचारताच करण्यात आली," असं म्हणत पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांना गदारोळ केला.

त्यांची निवड करण्यापूर्वी समितीच्या लोकांसोबत चर्चा आवश्यक होती. हार्दिक पटेल यांच्या अनुपस्थितीत ही निवड झाल्यामुळं हा गदारोळ झाल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, हार्दिक पटेल हे काँग्रेससोबत असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. पाटीदार समाजाला इतर मागासवर्गीय या प्रवर्गात आरक्षण मिळण्याच्या अटीवर हार्दिक पटेल हे काँग्रेससोबत जाणार आहे, असं वृत्त देण्यात आलं आहे.

लिंग परिवर्तन केल्यास गमवावी लागेल नोकरी

बीड जिल्ह्यातल्या महाराष्ट्र पोलीसच्या एका महिला काँस्टेबलने लिंग परिवर्तन करण्यासाठी पोलीस मुख्यालयाकडे परवानगी मागितली होती. तिचा अर्ज फेटाळून लावण्यात आल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

"लिंग परिवर्तन केलं तर पुरुष काँस्टेबल म्हणून काम करता येणार नाही," असं अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंदर सिंह यांनी म्हटलं आहे.

"याआधी आमच्याकडे या प्रकारचा अर्ज आला नव्हता. महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासात हे प्रथमच झालं. अशी परवानगी देण्यासाठी कायदेशीर तरतूद नाही," असं पोलीस महासंचालकांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं.

आधारधारकांची माहिती 200हून अधिक सरकारी साइट्सवर उघड

200 हून अधिक सरकारी वेबसाइट्सनी आधारधारकांची वैयक्तिक माहिती आपल्या वेबसाइट्सवर दिल्याचं युनिक आयडेंटिफेशन ऑथोरिटी ऑफ इंडियानं (UIDAI किंवा आधार) म्हटलं असल्याचं वृत्त 'बिजनेस टुडे'नी दिलं आहे.

आधारधारकांचा नाव आणि पत्ता, फोन नंबर आणि 12 आकडी आधार नंबर, ही सगळी माहिती सरकारने काही वेबसाइट्सवरच खुली ठेवली होती.

UIDAI ने त्यांना फटकारल्यानंतर ही माहिती वेबसाइट्सवरून काढण्यात आली.

माहिती अधिकाराच्या अंतर्गत एका अर्जाला उत्तर देताना हे उघड झालं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)