'पायाभूत सुविधा द्या आधी, मग खेळा बुलेट बुलेट'

प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पावरून महाराष्ट्र, विशेषतः मुंबईमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

लोकांच्या मते, सर्वप्रथम रेल्वेच्या पायाभूत सुविधा द्या आणि त्यानंतर मोठे प्रकल्प आणा. बीबीसी मराठीने सोशल मीडियावर वाचकांना प्रश्न विचारला होती की, मुंबईच्या रेल्वे समस्यांशी बुलेट ट्रेनचा संबंध जोडण योग्य आहे का? वाचकांनी यावर भरभरून मतं व्यक्त केली.

अनेक लोकांनी बुलेट ट्रेनऐवजी लोकल सुधारा या अर्थाची मतं मांडली. तर काही जण मात्र बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प आवश्यक आहेत आणि त्यावरचा खर्च इतरत्र वळवता कामा नयेत, अशाही मताचे आहेत.

सुनील पाटील म्हणतात की, जर लोकल ट्रेन्सच्या सामान्य गरजा व सुरक्षा पूर्ण होऊ शकत नाही, तर बुलेट ट्रेन येऊनदेखील हेच प्रश्न निर्माण होतील.

वृषाली पाटील म्हणतात की, "बुलेट ट्रेनचा जेवढा फायदा गुजरातला आहे तेवढा मुंबईला नाही आहे."

"त्यासाठी वापरण्यात येणारा पैसा हा मुंबईच्या विकासासाठी वापरता येईल. नाहीतर बुलेट ट्रेनही मोनोरेलसारखी शोभेची वस्तू बनून राहील."

किरण घुगे म्हणतात, "घाटकोपर स्टेशन वर पाऊस चालू असताना फिरून दाखवा. शॉवर चालू असतो पत्र्यांमधून."

"बुलेट ट्रेन आणून आमच्या जीवनात असा काय आमूलाग्र बदल आणणार आहे? ज्या गोष्टींची आम्हाला गरज आहे त्या आधी पुरवा मग विकासावर बोलू", असं ते सांगतात. सागर पाटील यांचंसुद्धा हेच मत आहे.

"पायाभूत सुविधा द्या म्हणावं आधी, मग खेळा बुलेट बुलेट", असं मनोज चौधरी म्हणत आहेत. पँट फाटलेली असताना नवीन शर्ट घ्या म्हणून आग्रह करण्यासारखं आहे हे, असं मयूर अग्निहोत्री म्हणतात. संदीप दिवेकरांना वाटतं की, नागरिकांच्या मूळ समस्या आधी सोडवायला हव्यात.

नंदिनी शहासने म्हणतात की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन योग्य नाही.

काही लोकांचे म्हणणं असंही आहे की, मुंबईच्या रेल्वे समस्यांशी बुलेट ट्रेनचा संबंध जोडणं योग्य नाही.

दिनेश पोटनिस म्हणतात, "बुलेट ट्रेनसाठी कमी व्याजात कर्ज उपलब्ध असेल तर बुलेट ट्रेनचा प्रकल्प हाती घेण्यात काहीच गैर नाही."

शैलेंद्र पाटील यांच्या मते, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.

संजय साळुंखे म्हणतात की, "जेव्हा एखादा प्रोजेक्ट बनतो तेव्हा आवश्यक खर्च त्यावर करावाच लागतो. हे सिंपल लॉजिक आहे. बुलेट ट्रेनचा पैसा दुसऱ्या ठिकाणी वापरू शकत नाही. एक तर प्रोजेक्ट घ्या किंवा सोडून द्या."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)