जेव्हा अकलूजमध्ये एका तरुणाने केलं होतं दोन जुळ्या बहिणींशी लग्न

हिमाचल प्रदेशमध्ये एका तरुणाने दोन सख्ख्या भावांशी विवाह केला आहे. याची चर्चा आहे. महाराष्ट्रात दोन बहिणींनी केलेल्या लग्नाची देखील त्यावेळी चर्चा होती. ही बातमी पुन्हा शेअर करत आहोत.

सोलापुरातील अकलूजमध्ये 2 डिसेंबर 2022 रोजी एका तरुणाने जुळ्या बहिणींसोबत एकाच मांडवात लग्न केलं होतं.

हे प्रकरण आता संसदेपर्यंत पोहोचलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी या विवाहाचा मुद्दा काल (14 डिसेंबर) संसदेत मांडला होता.

अशा प्रकारचा विवाह भारतीय संस्कृतीसाठी धक्कादायक असून असे विवाह रोखणारा कोणताही नियम किंवा कायदा अस्तित्वात नाही. असे विवाह रोखण्याच्या दृष्टीकोनातून नियम, कायदे तयार केले जावेत, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केली आहे.

सोलापूरच्या अकलूजमध्ये अतुल अवताडे या तरुणाने रिंकी आणि पिंकी पाडगावकर या जुळ्या बहिणींशी एकाच मंडपात विवाह केल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

दरम्यान, या प्रकरणात चौकशी करण्याची पोलिसांची मागणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. खटल्यात तक्रारदार हा पीडित पक्ष म्हणजेच संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य असावा, असं न्यायालयाने म्हटलं होतं.

हाच मुद्दा नवनीत राणा यांनी संसदेत उपस्थित करून त्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं.  

तरुणाला दिलासा

दोन जुळ्या बहिणींशी लग्न केल्याप्रकरणी अतुल अवताडेवर नोंदवण्यात आलेल्या अदखलपात्र गुन्ह्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अकलुज पोलिसांनी याचिका दाखल केली होती. सोलापूर जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही याचिका फेटाळून लावली आहे, अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांनी याप्रकरणाची माहिती दिली आहे. जुळ्या बहिणींशी लग्न केलेल्या व्यक्तीविरुद्ध नोंदवलेल्या अदखलपात्र गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार मिळविण्यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेतली होती.

मात्र सीआरपीसीच्या कलम 198 चा हवाला देऊन न्यायदंडाधिकाऱ्यांनी अदखलपात्र खटल्याची चौकशी करण्याची परवानगी नाकारली आहे, असे शिवपुजे यांनी सांगितले.

खटल्यातील तक्रारदार हा पिडीत पक्ष म्हणजेच संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य असावा. या खटल्यात तक्रारदार पीडित पक्ष नसल्याने या याचिकेची दखल घेऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात अतुलवर कोणतीही कारवाई होणार नसल्याच आता स्पष्ट झालं आहे. तसेच त्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

महिला आयोगाने पाठवली होती नोटीस

सोलापूरच्या अकलूजमधील तरुणानं मुंबईतील जुळ्या बहिणींशी केलेलं लग्न सोशल मीडियावर चर्चेत आलं असलं, तरी ते आता कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चौकशीअंती कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत.

चाकणकरांनी ट्विटरवरून माहिती दिलीय की, "सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत.

"भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे.तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्तबाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 चे कलम 12 (1) व 12 (2) अन्वये तात्काळ सादर करावा."

सोलापुरातील अकलूज परिसरात तरुणाने एकाच मंडपात दोन जुळ्या बहिणींशी लग्न गेलं आहे. या विवाहाचे फोटो आणि व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

टीव्ही, सोशल मीडियावर या विवाहाचे फोटो आणि व्हिडिओ दिसत आहेत. भारतात दोन लग्न करता येतात का, कायद्याने दोन विवाह करण्याची परवानगी आहे का असे प्रश्न देखील अनेक जण उपस्थित करत आहेत.

कसं झालं लग्न?

हा विवाह कसा संपन्न झाला याविषयी माहिती, अकलूज पोलीस स्टेशनचे पो. नि. अरुण सुगावकर यांनी दिली.

"मुंबईतल्या पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींनी अतुलशी लग्न केलं. जुळ्या असल्याने दोघी एकसारख्याच दिसतात. लहानपणापासून लग्न करुन एकाच घरी जायचं असं त्यांनी ठरवलं होतं.

"एकाच तरुणाशी लग्न करायचं असं या दोघींनी खूप आधीपासून ठरवलं होतं. त्यांच्या कुटुंबाने या विवाहाला मान्यता दिली," असं सुगावकर म्हणाले.

सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज इथे वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल इथे हे लग्न झालं.

अतुलचं मूळ गाव माळशिरस आहे. तो मुंबईत ट्रॅव्हल्सचा बिझनेस करतो. तर, रिंकी आणि पिंकी आयटी इंजिनियर आहेत. त्या दोघी आईबरोबर राहत होत्या. त्यावेळी अतुलची दोघींशी ओळख झाली.

ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. एकदा पाडगावकर कुटुंबातील आई व दोन्ही मुली आजारी पडल्यावर अतुल यांच्याच कारमधून त्या दवाखान्यात जात असत. अतुलने पाडगावकर कुटुंबाची आजारपणात सुश्रुषा केल्याने त्यांच्यातील जवळीक वाढली होती.

'आम्ही सज्ञान आहोत'

हा विवाह झाल्याबाबत खात्री पटवण्यासाठी बीबीसी मराठीने अकलूज येथील हॉटेल गलांडेचे मालक नाना गलांडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.

नाना गलांडे यांनी आपल्या हॉटेलात सदर विवाह झाल्याचं मान्य केलं. याविषयी अधिक माहिती देताना नाना गलांडे म्हणाले, "शुक्रवार, दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी हा विवाह आमच्या हॉटेलात पार पडला. विवाह समारंभाचं आयोजन करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला आमच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी आम्हालाही त्याचं नवल वाटलं होतं.

विवाहाचं नियोजन झाल्यानंतर मी हॉटेल मालक म्हणून सर्वप्रथम त्या मुलींशी बोललो. त्या दोन्ही मुली उच्च शिक्षित आहेत. आम्ही सज्ञान आहोत. आम्ही आमच्या मर्जीने या मुलासोबत विवाह करण्याचा निर्णय एकत्रितपणे घेतला आहे, असं त्या मुलींनी सांगितलं.

"अखेरीस, त्या दोघांचीही मर्जी असल्याची खातरजमा करून मी त्या सर्वांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आदी डिटेल माझ्याकडे जमा करून घेतले. त्यानंतर हा विवाह आमच्या हॉटेलात करण्याची परवानगी देण्यात आली."

तक्रार दाखल

या लग्नानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आणि अकलूज येथील पोलीस स्टेशनमध्ये एका युवकाने याबाबत तक्रार नोंदवली. अकलूज पोलीस स्टेशनचे पो. नि. अरुण सुगावकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

अतुल उत्तम अवताडे या मुलाने 2 डिसेंबर रोजी अकलूज इथे रिंकी मिलिंद पाडगावकर आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या जुळ्या मुलींशी लग्न केलं. भारतीय दंड संहिता 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात या मुलाविरोधात राहुल फुले याने तक्रार दाखल केली आहे. पुढे या प्रकरणात काय कारवाई होईल असे विचारले असता पो. नि. सुगावकर म्हणाले की "आम्ही या प्रकरणात तपास करत आहोत. त्यानंतरच या प्रकरणावर भाष्य करणे योग्य राहील."

बीबीसी मराठीने सदर अतुल अवताडेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण अद्याप संपर्क होऊ शकला नाही. संपर्क झाल्यावर बातमीत अपडेट करण्यात येईल.

कायदा काय सांगतो?

भारतीय दंड विधान 494 नुसार पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करता येत नाही. पती किंवा पत्नी जिवंत असताना ज्याही जोडीदाराने दुसऱ्याशी लग्न केल्यास ते लग्न कायद्याने ग्राह्य धरले जात नाही. असं झाल्यास दुसरं लग्न करणाऱ्या पतीला किंवा पत्नीला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते आणि दंड देखील होऊ शकतो.

बीबीसी मराठीने द्विभार्या प्रतिबंधक कायद्याबाबत एक बातमी केली होती. त्या बातमीत अॅड. दिलीप तौर यांनी द्विभार्या प्रतिबंधक कायद्यासंदर्भात माहिती दिली होती."द्विभार्या प्रतिबंधक कायदा म्हणजेच - Bombay prevention of hindu bigamous marriages act 1946. या कायद्यानुसार हिंदू विवाहित पुरुष, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करू शकत नाही. हा स्वतंत्र कायदा आहे आणि प्रत्येक राज्याने असा कायदा तयार केलेला आहे. शीख, ख्रिश्चन, पारशी आणि जैन धर्मासाठीही हेच तत्वं सांगणारे स्वतंत्र कायदे आहेत."

अकलूज येथील प्रकरण समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीने ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधला.

जर स्वखुशीने दोन्ही पत्नी राहत असतील तर तो गुन्हा ठरत नाही असं मत अॅड. सरोदे यांनी व्यक्त केलं आहे.

ते सांगतात, "भारतात द्विभार्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. पण समजा दोन्ही पत्नी स्वखुशीने आणि सहमतीने जर नांदत असतील तर हा गुन्हा ठरत नाही. कारण देशातील अनेक भागात दोन लग्नांची पद्धत दिसून येते. जर त्या मुली एकाच पतीसोबत राहण्यास तयार असतील तर इतर व्यक्ती त्यात काही हस्तक्षेप करू शकत नाही." असीम सरोदे सांगतात, "एक बायको असतांना दुसऱ्या स्त्रीशी विवाहासारखे संबंध ठेवणे याविरोधात एक तर कायदेशीर पत्नी तक्रार करू शकते किंवा विवाहाशिवाय सहजीवनासारखे संबंध असलेली स्त्री तक्रार करू शकते." दुसऱ्या विवाहामुळे महिलांचे हक्क डावलले जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये यासाठी हा कायदा आहे, असं देखील अॅड. सरोदे स्पष्ट करतात.

हे वाचलंत का?