पहलगाम हल्ला : भारताच्या निर्णयांना पाकिस्तानचं प्रत्युत्तर; भारतीय विमानांना प्रवेश बंदीसह 'हे' महत्त्वाचे निर्णय

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (CCS) बैठक पार पडली.

या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह सुरक्षा समितीचे सदस्य उपस्थित होते.

कॅबिनेट सुरक्षा समितीने घेतले 'हे' 5 मोठे निर्णय :

1) 1960चा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येईल, जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलिकडच्या दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील.

2) अटारी बॉर्डर तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल. ज्या नागरिकांनी वैध कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडली आहे त्या पाकिस्तानी नागरिकांना 1 मे 2025 पर्यंत यामार्गाने भारत सोडण्याचे आदेश.

3) पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजना (SVES) या योजनेखाली भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याआधी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले कोणतेही असे व्हिसा रद्द मानले जातील. सध्या सार्क व्हिसा योजनेअंतर्गत भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आली.

4) नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण/लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना 'पर्सना नॉन ग्राटा' घोषित करण्यात आलं. त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून भारताच्या संरक्षण/नौदल/हवाई सल्लागारांना परत बोलावण्यात आलं. संबंधित उच्चायोगांमधील ही पदे रद्द मानली जातात. दोन्ही उच्चायोगांमधून सेवा सल्लागारांचे पाच सहाय्यक कर्मचारी देखील काढून घेतले जातील.

5) 1 मे 2025पर्यंत आणखी कपात करून उच्चायुक्तालयात काम करणाऱ्यांची संख्या 55 ​​वरून 30 पर्यंत कमी केली जाईल.

पाकिस्तानचे भारताला प्रत्युत्तर

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी (24 एप्रिल) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीची बैठक घेतली.

या बैठकीत प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. तसंच भारतानं घेतेलेले निर्णय एकतर्फी असल्याची टीका यावेळी समितीनं केली. तसं पाकिस्ताननंही काही निर्णय घेतले असून भारतीय विमानांसाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश मनाई करण्यात आली.

हल्ल्यातील पर्यटकांच्या मृत्यू आणि त्यानंतर भारताकडून उचलण्यात आलेल्या पावलांमुळं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीनं चिंता व्यक्त केली. भारतानं घेतलेले निर्णय हे एकतर्फी, अन्यायकारक, राजकीय हेतूने प्रेरित आणि अत्यंत बेजबाबदार असल्याचंही समितीनं म्हटलं. तसंच या निर्णयांना कायदेशीर आधार नसल्याचंही म्हटलं.

पाकिस्तानने घेतलेले निर्णय

  • सिंधू जल करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानने फेटाळला. सिंधू जल करारानुसार पाकिस्तानच्या हक्काचं पाणी थांबवल्यास हे युद्धासमान कृत्य समजून त्याला सर्व शक्तीने प्रत्युत्तर दिलं जाईल, असं पाकिस्ताननं म्हटलं.
  • भारत जोवर पाकिस्तानात दहशत पसरवणं, आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन थांबवत नाही, तोवर पाकिस्तान शिमला करारासह भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करणार असल्याची पाकिस्तानकडून घोषणा.
  • वाघा सीमा त्वरित बंद करणार. या मार्गावरील भारतातून होणारी सर्व वाहतूक त्वरित थांबवणार. परवान्यांसह गेलेले लोक 30 एप्रिल 2025 पर्यंत परत येऊ शकतील.
  • SAARC व्हिसा योजनेअंतर्गत भारतीय नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा त्वरित रद्द केले. शीख धर्मीय यात्रेकरूंना अपवाद देणार. पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांनी (शीख यात्रेकरूंशिवाय) 48 तासांत देश सोडावा, असं सांगण्यात आलं.
  • पाकिस्तानमधील भारतीय संरक्षण, नौदल व हवाई सल्लागारांना 30 एप्रिल 2025 पर्यंत देश सोडण्याचे निर्देश. त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही परतण्याचे आदेश.
  • इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या 30 वर आणणार. (30 एप्रिल 2025)
  • भारताच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद.
  • भारताशी, तसेच भारताच्या माध्यमातून इतर देशांशी होणारा सर्व व्यापार त्वरित स्थगित.

भारत सरकारच्या दबावामुळं जम्मू आणि काश्मीरमध्ये अशाप्रकारे लोकांचा संताप समोर येत असल्याचं समितीनं म्हटलं. अल्पसंख्याकांच्या छळाबरोबरच भारत सरकार असा घटनांचा राजकीय फायदा घेत असल्याचा आरोपही पाकिस्ताननं केला.

काहीही पुरावा नसताना या हल्ल्याशी पाकचा संबंध जोडला जात असल्याचं ते म्हणाले. पाकिस्ताननं दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा ठामपणे निषेध केला. भारत अशा प्रकारांतून त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भारतावर पाकिस्तानात अशांतता पसरवण्याच्या आरोपाचा पुनरुच्चारही त्यांनी केली.

पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू

पहलगाममधील कट्टरतावादी हल्ल्याच्या क्षणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक पर्यटक उपस्थित होते. त्यातील 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर काहीजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी मृतांची नावे आहेत. पनवेलमधील एक तर पुण्यातील दोन जणांचा मृतांच्या यादीत समावेश आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी पर्यटकांवर सशस्त्र हल्ला झाला आहे. अधिकाऱ्यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, 'सशस्त्र कट्टरतावाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 26 लोकांचा मृत्यू झाला आहे.'

पनवेलच्या दिलीप देसले (वय 60) यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यांच्या सोबत असलेले सुबोध पाटील (वय 42) हे जखमी असून त्यांच्यावर सध्या श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जगदाळे यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यावेळी एक नागपूरचे कुटुंबसुद्धा तिथे होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरुन उड्या मारल्या आणि त्यात घसरुन सिमरन रुपचंदानी या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यांच्यासमवेत तिलक आणि गर्व रुपचंदानी हेसुद्धा आहेत. तिघेही सुखरुप आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असून, त्यांना सर्व ती मदत पुरवण्यात येत आहे.

सध्या उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, रायगडमधील दिलीप देसले, ठाणे जिल्ह्यातील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

राज्यातील मृतांचे पार्थिव शरीर मुंबई आणि पुण्यात विमानाने आणले जाणार आहे. चार जणांचे पार्थिव शरीर मुंबईत येणार आहे तर दोन जण जणांचे पार्थिव शरीर पुण्यात आणले जाईल. या व्यतिरिक्त हल्ल्यात सुमित परमार, यतिश परमार या दोन जणांचा समावेश आहे. त्यांचे पार्थिव शरीर मुंबईत आणले जाणार आहे.

संजय लेले साधारण 50 वर्षांचे होते. ते मुंबईतील एका फार्मा कंपनीत कामाला होते. त्यांना साधारण 18 वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे चुलत बंधू कौशिक लेले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्हाला काल रात्री कळालं. कुटुंबीयांना धक्का बसला. मन सुन्न करणारी घटना आहे. आपण पर्यटनाला तिकडे जातो आणि असं काहीतरी होतं हे दुर्देवी आहे."

43 वर्षीय संजय मोने हे डोंबिवली पश्चिम येथील ठाकूरवाडी येथे राहायचे. दोन दिवसांपूर्वी मोने यांचं संपूर्ण कुटुंब काश्मीरला पर्यटनासाठी गेलं होतं. अतुल मोने मध्य रेल्वेत सीनीयर सेक्शन इंजिनिअर म्हणून काम करत होते. पत्नी आणि 18 वर्षीय मुलीसह ते काश्मीरला गेले होते.

सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मोदी भारतात

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या कट्टरतावादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून भारतात परतले आहेत.

पंतप्रधान मोदी मंगळवारी सौदी अरेबियाला दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले होते.

पहलगाममधील हल्ला हा 'दहशतवादी हल्ला' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना सोडलं जाणार नाही', असंही त्यांनी म्हटलं आहे.

दिल्लीला पोहोचताच त्यांनी सध्याच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी एक इमर्जन्सी ब्रीफिंग मीटींग घेतली.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत सध्यपरिस्थितीबाबत चर्चा झाली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील काश्मीरला रवाना झाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

पहलगाम हल्ल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रूथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, "काश्मीरमधून अत्यंत दु:खद अशी बातमी येत आहे. दहशतवादाविरोधातील या लढाईमध्ये अमेरिका भारतासोबत उभी आहे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि जखमी लोक लवकरात लवकर बरे होवोत, अशी आम्ही प्रार्थना करतो. पंतप्रधान मोदी आणि भारतातील लोकांप्रती आम्हाला मनापासून सहानुभूती आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. तसेच, या हल्ल्याला जबाबदार लोकांना सोडलं जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, अलीकडच्या वर्षांमध्ये सामान्य नागरिकांना लक्ष्य करत करण्यात आलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे.

या हल्ल्यामध्ये अनेक लोक जखमी झाले असल्याचीही माहिती मिळाली आहे.

काश्मीरपासून ते दिल्लीपर्यंत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियातील दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत.

त्यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालदेखील आहेत.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर दिल्लीमधील संरक्षण व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दिल्ली पोलिसांनी या हल्ल्यानंतर संपूर्ण शहराची सुरक्षा वाढवलेली आहे.

खासकरुन पर्यटन स्थळे आणि शहराच्या सीमेवर कठोर तपासणी आणि देखरेख केली जात आहे, जेणेकरुन कोणतीही संशयास्पद हालचाल असल्यात तातडीने कारवाई करता येईल.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून जागोजागी वाहनांची तपासणी केली जात आहे, तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडींग करण्यात आलं आहे.

जम्मू-काश्मीरच्या अनेक भागामध्ये या हल्ल्याविरोधात करण्यात आलेल्या निदर्शनांचे फोटो आणि व्हीडिओदेखील आता समोर येत आहेत. पहलगाममध्येही काही लोकांनी कँडल मार्च काढून या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला आहे.

पहलगाममध्ये नेमकं काय घडलं?

पहलगामला 'भारताचं स्वित्झर्लंड' म्हटलं जातं. इथं भारत आणि जगभरातून पर्यटक फिरण्यासाठी येत असतात.

बीबीसीचे प्रतिनिधी माजिद जहांगीर यांनी गुजरातमधून आलेल्या पर्यटकाशी बातचित केली. पर्यटकांच्या ज्या गटावर हल्ला झाला होता, त्या गटामध्येच हा पर्यटकदेखील होता.

या पर्यटकानं सांगितलं की, "अचानक हल्ला झाल्यामुळे तिथे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येकजण ओरडत, रडत तिथून पळू लागला."

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या कट्टरतावादी हल्ल्याच्या ठिकाणी महाराष्ट्रातील नागपूरचं एक कुटुंब उपस्थित होतं. हे कुटुंब जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलं होतं.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना नागपूरच्या या कुटुंबाने आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, "आम्ही तिथे फिरायला गेलो होतो. तेथून बाहेर पडताना गोळीबारचा आवाज आमच्या कानावर पडला. या आवाजानं सर्वजण सैरावैरा पळायला लागले. आम्हीही मागे वळून न पाहता, तिथून कसंबसं बाहेर पडलो. या गोंधळात माझ्या पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत."

महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू - मुख्यमंत्री फडणवीस

पहलगाममधील हल्ल्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी माहिती देताना म्हटलं की, "पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत माहिती दिली. फडणवीस म्हणाले, "जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील सहा पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत."

"स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे," अशीही माहिती फडणवीसांनी दिलीय.

तर पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. मुंबई पोलीस आयुक्तालयाने सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि उपायुक्तांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

'हल्लेखोरांना सोडणार नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममधील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'एक्स'वर म्हणाले की, "पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडलं जाणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल. त्यांचा अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा संकल्प अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल."

या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत.

अमित शाह म्हणाले की, "या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडलं जाणार नाही आणि त्यांना पूर्ण ताकदीनं उत्तर दिलं जाईल."

अमित शाह पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींना या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आहे."

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, "दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट आहे. सरकारनं जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याच्या थापा मारण्यापेक्षा योग्य ते पाऊल उचलून कारवाई करावी. जेणेकरुन अशा घटनांना आवर घालता येईल आणि निर्दोष भारतीयांना आपला जीव गमवावा लागणार नाही."

पुढे या हल्ल्यासंदर्भात राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बातचित केली आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भातील माहिती आपल्या 'एक्स' अकाऊंटवरुन दिली आहे.

त्यांनी म्हटलंय की, "मी गृहमंत्री अमित शाह, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लाह आणि जम्मू काश्मीर पीसीसीचे अध्यक्ष तारिक हमीद कर्रा यांच्यासोबत चर्चा केली. या हल्ल्यासंदर्भातील सगळी माहिती घेतली."

कंट्रोल रूमचे इमर्जन्सी नंबर

जम्मू-काश्मीरच्या माहिती आणि जनसंपर्क विभागानं इमर्जन्सी कंट्रोल रूमचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध केले आहेत.

श्रीनगरमधील इमर्जन्सी कंट्रोल रूम :

  • 0194-2457543
  • 0194-2483651
  • 7006058623 (आदिल फरीद, ADC श्रीनगर)

अनंतनाग इमर्जन्सी कंट्रोल रूम :

अनंतनागमध्ये पर्यटकांच्या माहितीसाठी विशेष डेस्क तयार करण्यात आलाय. खालील संपर्क क्रमांकावर संपर्क करता येईल.

  • 01932222337
  • 7780885759
  • 9697982527
  • 6006365245

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)